
भारतामध्ये 1891 पासून चक्रीवादळांची नोंद सुरु झाली. देशाच्या पूर्वेकडील बंगालचा उपसागर हा सुरुवातीपासूनच चक्रीवादळांचा केंद्रबिंदू राहिला आहे. या उपसागरात दरवर्षी सामान्यपणे दोन किंवा तीन चक्रीवादळांची निर्मिती होत असते. या चक्रीवादळांच्या तडाख्याखाली पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू ही राज्य येत असतात. मात्र, आता चक्रीवादळांचा हा केंद्रबिंदू भारताच्या पश्चिम किनार्यावरील अरबी समुद्रामध्ये निर्माण होत आहे. गेल्या काही दशकांमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या निर्मितीची वारंवारता वाढली आहे आणि यामागचे एकमेव कारण म्हणजे हवामान बदल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इंटरगर्व्हमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’च्या मते, अरबी समद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढत आहे. गेल्या 40 वर्षांपासून यामध्ये वाढ होते आहे. एक ते दोन अंश सेल्सिअस थंड असलेले अरबी समुद्राचे तापमान उष्ण होत आहे. परिणामी, गेल्या चार वर्षांपासून अरबी समुद्रामध्ये मान्सूनपूर्व चक्रीवादळांच्या निर्मितीमध्ये वारंवारता निर्माण झाली आहे. उष्णतावाढीमागे हवेच्या अभिसरणासंबंधित अनेक कारणे आहेत. अरबी समुद्र हा हिंद महासागराचा एक भाग आहे. हिंद महासागर हा इतर महासागरांच्या तुलनेत उत्तरेकडील बाजूने भूपृष्ठाने व्यापलेला आहे. उष्णता वाढण्यामागे हे एक कारण आहे. उत्तरेकडील बाजूने भूपृष्ठाने व्यापलेला असल्याने उष्णता ही बाहेर पडत नाही. परिणामी, महासागराचे तापमान वाढत आहे. ही तापमानवाढ चक्रीवादळांच्या तीव्रतेमध्ये वाढ करत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासारख्या उष्णकटिबंधीय समुद्रात 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान चक्रीवादळाच्या निर्मितीला कारणीभूत ठरते. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना चक्रीवादळांचा सामना करावा लागत आहे. आजपर्यंत नोंद झालेले सर्वात मोठे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ हे ‘गोनू’ असून ते 2007 साली ओमानमध्ये धडकले होते. ज्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू आणि कोट्यवधी डॉलरचे नुकसान झाले. हवामानबदलांमुळे अरबी समुद्रातील चक्रीवादळे ही अधिक तीव्र होणार असून, त्यामध्ये वारंवारता निर्माण होणार आहे. त्यामुळे यापूर्वी अद़ृश्य स्वरूपात जाणवणार्या हवामानबदलांच्या परिणामांनी द़ृश्य रूप धारण केले आहे. त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही.
बदलणारा अरबी समुद्र
1891 ते 2000 सालापर्यंत 48 चक्रीवादळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीक्षेत्रामध्ये निर्माण झाली. त्यामधील 24 वादळे ही तीव्र स्वरूपाची होती. बंगालच्या उपसागरामध्ये वर्षाकाठी चार चक्रीवादळ निर्माण होण्याची सरासरी 2018 पर्यंत कायम होती. त्याच वर्षी अरबी समुद्रामध्ये तीन चक्रीवादळे तयार झाली. मात्र, 2019 मध्ये अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरालाही याबाबतीत मागे टाकले. त्या वर्षी भारतामध्ये एकूण आठ चक्रीवादळे आली. त्यामधील पाच चक्रीवादळे ही अरबी समुद्रामध्ये निर्माण झाली होती. 1902 नंतर 2019 मध्ये अरबी समुद्रामध्ये वर्षाकाठी पाच चक्रीवादळांची नोंद झाली. 2014 ते 2019 या दरम्यान अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळांच्या संख्येत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दशकभरामध्ये ‘फयान’, ‘अम्फान’, ‘महा’, ‘कयार’, ‘निसर्ग’ आणि आता ‘तोक्ते’ ही अरबी समुद्रामध्ये तयार झालेली तीव्र चक्रीवादळे आहेत. मुंबईने सोमवारी ‘तोक्ते’ चक्रीवादळाचे थैमान अनुभवले. 2021 मध्ये अरबी समुद्रामध्ये तयार झालेले हे पहिलेच चक्रीवादळ होते. यावेळी मुंबईमध्ये वार्याचा वेग ताशी 114 किमी नोंदवण्यात आला, तर सांताक्रुझ वेधशाळेने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 194 मि.मी. पावसाची नोंद केली. ही नोंद मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसाची 1974 सालानंतरची सर्वाधिक नोंद ठरली. हे चक्रीवादळ मुंबईपासून समुद्रामध्ये 130 किमी अंतरावर घोंघावत होते. याउलट ‘निसर्ग’ चक्रीवादळ हे मुंबईपासून 100 किमी अंतरावर होते. तरीही, ‘निसर्ग’पेक्षा ‘तोक्ते’ चक्रीवादळाने मुंबईची अधिक हानी केली. असे का? तर याला वार्याचा वेग कारणीभूत ठरला. ‘निसर्ग’ चक्रीवादळापेक्षाही वार्याचा अधिक वेग सोमवारी मुंबईमध्ये नोंदवण्यात आला. शिवाय, पावसाचा जोरही होता. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर चक्रीवादळांच्या निर्मितीचे प्रमाण 80 टक्क्यांनी वाढले आहे. मे ते जून महिन्यांदरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळे येतात आणि मान्सूननंतरची चक्रीवादळे ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांदरम्यान तयार होतात. अरबी समुद्रामध्ये मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर निर्माण होणार्या चक्रीवादळाचे प्रमाण 25 टक्के होते. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. पश्चिम किनारपट्टीवर यापूर्वी तयार झालेली चक्रीवादळे ही बहुतांश मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर कालावधीमधील आहेत. ‘निसर्ग’, ‘फयान’, ‘कयार’ आणि आता ‘तोक्ते’ ही त्याची उदाहरणे आहेत.
--
AKSHAY MANDAVKAR
Special Correspondent - Environment / Wildlife
दै. मुंबई तरुण भारत (महा MTB)
9768684031