बहुभाषाकोविद ‘सौरभ’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2021   
Total Views |

Sourabh Bondre_1 &nb
 
 
 
‘मिले सूर मेरा...’ या १४ भारतीय भाषांतील गीताचे बोल जिज्ञासा जागृत करतात. तशीच ठाण्यातील सौरभ बोंद्रे या बहुभाषाकोविद युवकाची वाटचाल प्रेरणादायी आहे.
 
 
गात भारत हा असा अद्वितीय बहुभाषिक देश आहे की, ज्याच्या २२ अधिकृत भाषा अन् हजारांहून अधिक बोलीभाषा आहेत. पण, जाणीवपूर्वक वेगवेगळ्या भाषा शिकून त्या आत्मसात करणे म्हणजे दिव्यच! अन् हे दिव्य १३ भाषा शिकून युवावस्थेतच पार पाडलंय ठाण्यातील सौरभ बोंद्रे या युवकाने.
 
 
कोल्हापुरात जन्मलेला सौरभ बालपणापासून ठाण्याचा रहिवासी. त्याची मातृभाषा मराठी तरीही इंग्रजी माध्यमातून संपूर्ण शिक्षण घेतले. लहानपणी ‘डबलडेकर सिंहगड एक्सप्रेस’ने पुण्याला जाताना अन्यभाषक सहप्रवाशांच्या गप्पा ऐकून सौरभचे कुतूहल जागे झाले. तेथूनच त्याचा बहुभाषिक प्रवास सुरू झाला. हिंदी, संस्कृत अनिवार्य विषय असल्यामुळे अभ्यास करतानाच तो चार भाषा शिकला. त्याच्या इमारतीमधील तामिळ कुटुंबाकडे तामिळ, तर कानडींकडून कन्नड शिकला.
 
 
भारतीय भाषा शिकण्याला त्याकाळी फारसं ‘ग्लॅमर’ अथवा मानमरातब नव्हता. त्यामुळे या विचित्र छंदाला शाळेत तसेच घरीदेखील विरोध व्हायचा, ओळखीचे लोक ‘हे कसलं खूळ!’ असे शेरे मारायचे. पण, सौरभने जिद्द सोडली नव्हती. कॉलेजमध्ये असताना थोडं स्वातंत्र्य मिळालं. ठाणे-मुंबई पालथी घालत धारावीतील तामिळी, चेंबूर-माटुंग्यातील दाक्षिणात्य, ठाण्यातले बंगाली, मुलुंडमधील गुजराती, या सर्वांशी ओळख आणि मैत्री करत या भाषाविश्वात वावर वाढवला. त्यातूनच त्याला कर्नाटक संगीताची आवड लागली आणि तो मँडलिन श्रीनिवास यांचे शिष्य सुरेशकुमार यांच्याकडे कर्नाटकी गायन शिकला. मालती श्रीराम यांच्याकडे सरस्वती वीणा, मुकुंद मराठे यांच्याकडे हिंदुस्थानी गायन आणि पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडे प्राथमिक रुद्र वीणावादन शिकला.
 
 
‘बी.कॉम.’ होईपर्यंत सौरभने चार भाषांखेरीज तामिळ, कन्नड, उर्दू, तेलुगू, मल्याळम, बांगला, गुजराती भाषा लिहा-वाचायला आणि व्यावहारिक संभाषण करण्याइतक्या शिकला. ठाण्यातले डॉ. बा. रा. दीक्षित यांच्याकडे संस्कृतचे उच्चारण आणि देवनागरी लिपीशास्त्राचा त्याने सखोल अभ्यास केला. ‘नागर लेखन परिषदे’तर्फे देवनागरी लिपीत विशेष संशोधन केलं, वडिलांच्या आग्रहाखातर जपानी भाषेचा अभ्यास करून तीन आंतरराष्ट्रीय परीक्षा दिल्या.
 
 
आपला बहुभाषिक छंद जोपासण्यासाठी सौरभने सुरुवातीला खासगी कंपन्यांमध्ये अकाऊंट्स, अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये काम केलं आणि त्यानंतर साडेचार वर्षे आंतरराष्ट्रीय कॉलसेंटर्समध्येही नोकरी केली. २००८ साली दीड महिना जपानमध्ये प्रशिक्षणार्थ राहून जपानी भाषेचा प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव घेतला. त्यानंतर भाषा हेच व्यावसायिक क्षेत्र ठरवून सौरभ वाटचाल करीत आहे. मुंबई विद्यापीठातून संस्कृतमध्ये ‘एम.ए.’ केलं. दिल्लीच्या ‘कौमी कौन्सिल’तर्फे उर्दूच्या परीक्षा दिल्या. मग त्याने जपानी शिकवायला आणि संस्कृत शिकवायला सुरुवात केली. चित्रपटांचे सब-टायटल्स करणे, मराठी, संस्कृत आणि हिंदी पुस्तकांचे मुद्रितशोधन करणे अशीही कामे केली.
 
 
समाजाला कशा प्रकारे योगदान देतोस? असं विचारल्यावर तो सांगतो की, “मी पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता नाही. माझ्या व्यवसायातून जमेल तितका वेळ समाजाकरिता देतो. १९९९-२००० मध्ये एका संस्थेतर्फे गोलमंदिराच्या आसपासच्या वेश्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या एका केंद्रात जाऊन इंग्रजी आणि गणित शिकवलं, महापालिकेच्या एका रात्रशाळेत कामगारांना इंग्रजी शिकवलेलं आहे. अजूनही शाळा-कॉलेजांतील काही गरीब विद्यार्थ्यांची फी त्यांची परिस्थिती पाहून माफ करतो. काही पोलिसांनाही दहशतवादी कारवाईतील संदेश व मजकूर कळवा यासाठी उर्दू शिकवले,” असे सौरभ सांगतो. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ‘एसएससी’ परीक्षेकरिता निःशुल्क मार्गदर्शन करतो. २०१० सालापासून मुंबईतील किन्नर व समैषी (यौनिक अल्पसंख्य) समाजासोबत काम करत आहे. या समाजाच्या मानवी हक्कांसाठी विशेष सभा, चर्चासत्रं, बोधसत्रं, पदयात्रांचं आयोजन करण्यात पुढाकार घेतो. यासाठी लागणारं लिखाण किंवा भाषांतर वगैरे विनामानधन करतो. कोरोनाकाळात स्वयंसेवी संस्थांतर्फे गरीब आणि स्थलांतरित मजुरांना शिधा व आर्थिक मदत मिळवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम केलं.
 
 
सध्या तो प्रामुख्याने संस्कृत, जपानी, तामिळ, उर्दू आणि कन्नड या भाषा क्लासेसमध्ये आणि खासगी स्वरूपात शिकवतो. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘बालभारती’ या पाठ्यपुस्तक मंडळाच्या संस्कृत पाठ्यपुस्तकांच्या समीक्षण समितीतही सौरभचा समावेश आहे. मुंबईतील ‘जे.जे. इन्स्टिट्यूट’ व ‘आयआयटी बॉम्बे’ येथून ‘टायपोग्राफी’ (अक्षरमुद्रणशास्त्र) शिकलेल्यांसाठी सौरभ भारतीय लिपी विषयक सल्लागार म्हणून काम करतो. ‘ग्राफिक डिझाईन’ व भारतीय लिपीचे ‘फॉण्ट’ बनवणाऱ्या ‘एक टाईप’, ‘व्हाईट क्रो’ या भारतीय कंपन्या, ‘अक्षराय’ नावाची अशासकीय संस्था, तसेच ‘गूगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘अडोब’ इत्यादी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकरिताही तो बहुभाषातज्ज्ञ आणि लिपीशास्त्रज्ञ म्हणून स्वायत्तपणे काम करतो. तसेच मुंबईतील काही ऑर्केस्ट्रांमध्ये तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि बांगला गाणी गाणारा तो एकमेव मराठी युवक आहे.
 
 
युट्यूबवरही सौरभचा बऱ्यापैकी संचार आहे. ‘बहुभाषिकतेचे विश्व’, ‘बारशाचा पाळणा’ आणि ‘नभोगहने’ हे संस्कृत भावगीत लोकांच्या पसंतीस उतरलंय. पंजाबी, मैतैलोन (मणिपुरी), अरबी आणि मांदारिन (चिनी) या भाषा शिकणे हे त्याचं पुढील लक्ष्य असल्याचे तो सांगतो. त्याच्या या बहुभाषिक प्रवासाकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे सौरभला मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
- दीपक शेलार
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@