इस्लामिक ऐक्याचे आभासी वास्तव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2021   
Total Views |

islamic_1  H x
 
 
 
अमेरिका, युरोपीय महासंघ, संयुक्त राष्ट्रांपासून इस्लामिक सहकार्य संस्थेपर्यंत अनेकांकडून हे युद्ध थांबावे, यासाठी प्रयत्न चालले असले तरी जोपर्यंत ‘हमास’ ठरवत नाही आणि इस्रायल ‘हमास’चे लष्करी तळ उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत ते थांबण्याची शक्यता नाही.
 
 
इस्लामिक दहशतवादी संघटना ‘हमास’ने १० मे रोजी इस्रायलविरुद्ध रॉकेट हल्ले सुरू केल्यानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर म्हणून हाती घेतलेल्या कारवाईला दहा दिवस पूर्ण होत आले आहेत. या कालावधीत ‘हमास’ने इस्रायलवर ३,१५०हून अधिक रॉकेटचा मारा केला. पहिल्यांदाच जेरुसलेमवरील आकाशात ‘हमास’ची रॉकेट्स पोहोचली. तेल अविवच्या उत्तरेला असलेल्या हदेरा ते दक्षिणेकडील सर्वात मोठे शहर बीर शेवापर्यंत सर्वत्र ‘हमास’ रॉकेट डागत असून, इस्रायलची सुमारे तीन चतुर्थांश लोकसंख्या रॉकेट हल्ल्यांच्या सावटाखाली बॉम्ब प्रतिरोधक तळघरं आणि खोल्यांच्या भरवशावर आहे. इस्रायलची ‘आयर्न डोम सिस्टीम’ अवघ्या मिनीटभराच्या अवधीत येणार्‍या रॉकेटचा मार्ग आणि लक्ष्य यांचा अचूक अंदाज बांधून नागरी वस्तीवर आदळणारी सुमारे ९० टक्के रॉकेट हवेतल्या हवेत निष्भ्रम करत असली, तरी लक्ष्यांवर आदळणार्‍या सुमारे १० टक्के रॉकेटमुळे आतापर्यंत दहा निरपराध लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात भारतीय परिचारिका सौम्या संतोष यांचादेखील समावेश आहे. ‘हमास’ गाझा पट्टीतील शाळा, रुग्णालयं आणि निवासी इमारतींच्या आडोशातून रॉकेट डागत असून जाणीवपूर्वक इस्रायलच्या नागरी वस्तीला लक्ष्य करत आहे. खरं तर हा दुहेरी युद्धगुन्हा आहे. पण, ‘हमास’ ही दहशतवादी संघटना असून गाझा पट्टीवर बळजबरीने राज्य करत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा संघर्षाचाच भाग आहे. इस्रायलला ‘हमास’च्या हल्ल्यांविरोधात कारवाई करताना पराकोटीची काळजी घ्यावी लागते. गाझा पट्टीतील युद्ध हे काही अफगाणिस्तान किंवा इराकप्रमाणे मोकळ्या मैदानात होत नाहीये. केवळ ४० किमी लांबी आणि सुमारे दहा किमी रुंदी असलेल्या या भागात २० लाखांहून अधिक लोक राहतात. त्यामुळे दाटीवाटीने वसलेल्या इमारतींच्या मधोमध हल्ला करताना किंवा ‘हमास’कडून वापरले जाणारे भुयारी मार्ग उद्ध्वस्त करताना किंचितशी चूक झाली तरी त्यात निरपराध नागरिक मरण्याची भीती असते. दुसरीकडे इस्रायलची तीन चतुर्थांश लोकसंख्या सदासर्वदा रॉकेटच्या सावटाखाली राहू शकत नसल्यामुळे इस्रायलला कारवाई करण्यावाचून गत्यंतर नसते. इस्रायलच्या आजवरच्या कारवाईत ८२०हून अधिक हवाई हल्ले करण्यात आले असून, १३०हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. त्यात ‘हमास’ आणि ‘इस्लामिक जिहाद’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे. आजवर या युद्धात गाझातील ७०हून अधिक सामान्य नागरिक बळी पडले असले आणि त्यात मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली, तरी त्यास ‘हमास’ जबाबदार आहे. आपल्याच भागातील महिला आणि मुलांचा ढालीप्रमाणे वापर करणे भ्याडपणाचे लक्षण आहे. ‘हमास’ने इस्रायलवर डागलेल्या रॉकेटपैकी ४६० रॉकेट गाझातच कोसळली असून, त्यातही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. अमेरिका, युरोपीय महासंघ, संयुक्त राष्ट्रांपासून इस्लामिक सहकार्य संस्थेपर्यंत अनेकांकडून हे युद्ध थांबावे, यासाठी प्रयत्न चालले असले तरी जोपर्यंत ‘हमास’ ठरवत नाही आणि इस्रायल ‘हमास’चे लष्करी तळ उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत ते थांबण्याची शक्यता नाही. या मुद्द्यावर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींच्या प्रभावाखाली असलेल्या ‘इस्लामिक सहकार्य संस्था’ या ५७ मुस्लीम देशांच्या शिखर संस्थेने अध्यक्ष आणि पंतप्रधानांऐवजी सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आभासी बैठक बोलावली, यातूनच आखाती अरब देशांना हा प्रश्न फार मोठा होऊन द्यायचा नाही, हे स्पष्ट होते. ‘हमास’ला इराणचा सक्रिय पाठिंबा असून, त्यांच्या इस्लामिक बंधुत्वाच्या विचारधारेचा ‘राष्ट्र प्रथम’ या विचारधारेच्या अरब-मुस्लीम देशांनाही तितकाच धोका आहे. गेल्या वर्षभरात संयुक्त अरब अमिराती, बहारिन, सुदान आणि मोरक्कोसारख्या प्रमुख मुस्लीम देशांनी इस्रायलशी राजनयिक संबंध प्रस्थापित केले आहेत. अन्य काही देशांचेही यासाठी बंद दारामागे प्रयत्न सुरू आहेत. याचे कारण म्हणजे आज अनेक अरब-मुस्लीम देशांना इस्रायलहून इराण हा अधिक मोठा धोका वाटतो.
 
 
 
 
इस्रायलमध्ये अरब मुस्लीम लोकसंख्येचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक असून कायद्याने त्यांना समान अधिकार आहेत. अरब लोकांचे राजकीय पक्ष असून ते इस्रायलच्या निवडणुकांत संसदेतील दहा टक्क्यांहून अधिक जागा जिंकतात. राजकारणाच्या पलीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, साहित्य ते स्टार्ट-अप्स अशा अनेक क्षेत्रात मुस्लीमधर्मीय इस्रायली नागरिकांनी आपला ठसा उमटवला आहे. हे खरं आहे की, इस्रायली अरब आणि पॅलेस्टिनी लोकसंख्या एकाच समाजाचा भाग असून, त्यांच्यात परस्परांबाबत आत्मीयता आहे, तसेच रोटीबेटीचे संबंधही आहेत. हेही खरं आहे की, इस्रायली अरब आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ज्यूधर्मीय लोकांपेक्षा मागे आहेत. त्यांच्यात आणि उजव्या विचारसरणीच्या इस्रायली लोकांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर तीव्र मतभेद आहेत. गाझा पट्टीत बळजबरीने सत्ता प्राप्त केलेली ‘हमास’ शिक्षण, धर्मादाय कामं आणि इस्रायलविरुद्ध रक्तरंजित संघर्षाद्वारे वेस्ट बँक आणि इस्रायली अरबांच्या मनात इस्लामिक मूलतत्त्ववाद रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘हमास’कडून त्यासाठी अपप्रचार आणि अफवांचा रणनीती म्हणून वापर केला जातो. सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या आरंभापूर्वी सुमारे महिनाभर इस्रायल आणि पॅलेस्टिनी भागातील वातावरण ढवळून निघाले होते. वेस्ट बँकमध्ये ‘पॅलेस्टिनी ऑथोरिटी’कडून दीड दशकाच्या अवधीनंतर घेण्यात येणार्‍या निवडणुकांपूर्वी सत्ताधारी फताह पक्षात फाटाफूट झाली. पराभवाची चाहूल लागल्यामुळे ‘पॅलेस्टिनी ऑथोरिटी’चे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्याचा दोष इस्रायलवर टाकला. त्यामुळे पॅलेस्टिनी लोकांमध्ये अस्वस्थता होती. पूर्व जेरुसलेममधील शेख जाराह भागातील ज्यू आणि अरब यांच्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्तेच्या विवादात इस्रायलच्या स्थानिक न्यायालयाने ज्यूधर्मीयांच्या बाजूने निकाल दिला होता. इस्रायलचे सर्वोच्च न्यायालयही ज्यूधर्मीयांच्या बाजूने निकाल देताना अरबांशी जाणीवपूर्वक भेदभाव करेल आणि या निकालाच्या आधारे ठिकठिकाणी इस्रायलमधील अरब लोकांना त्यांच्या राहत्या घरांतून बाहेर काढले जाईल, अशी अफवा पसरवण्यात आली. यात भर म्हणून रमझानच्या महिन्याची अखेर आणि १९६७च्या युद्धाची वर्षगाठ, ज्यात इस्रायलने पूर्व जेरुसलेमवर विजय मिळवून ते स्वतःच्या देशाला जोडले होते, एकाच वेळेस आली. रमझान महिन्यान इफ्तारनंतर मुस्लीमधर्मीय मोठ्या प्रमाणात जेरुसलेमच्या दमास्कस दरवाजा भागात जमतात, तर ज्यूधर्मीय जेरुसलेम विजय दिवस साजरा करायला मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. त्यांच्यात दंगे होऊ नयेत म्हणून जेरुसलेमच्या पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. तेव्हा मुस्लीमधर्मीयांना मक्का आणि मदिनेनंतर सर्वात पवित्र अशा जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत प्रार्थना करायला इस्रायल बंदी घालणार, अशा अफवा पसरवण्यात आल्या. मुस्लीमधर्मीयांनी मशिदीत मोठ्या संख्येने एकत्र जमावे आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यास दगडफेक आणि जाळपोळ करून परिस्थिती चिघळवण्याचे प्रयत्न केले गेले. या परिस्थितीचा फायदा घेऊन आपणच काय ते पॅलेस्टिनी जनतेचे कैवारी, असा आव आणत ‘हमास’ने इस्रायलविरोधात रॉकेट हल्ला सुरू केला. २०१४ सालानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर चकमक घडत आहे. रणांगणातील युद्धाला अफवा आणि अपप्रचाराची जोड दिली गेल्यामुळे यावेळी इस्रायलमधील अरब-ज्यू मिश्र वस्ती असलेल्या अनेक शहरांतही दंगे घडले. ते थांबवण्यासाठी इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिवलीन यांना भावनिक आवाहन करावे लागले. पंतप्रधान नेतान्याहूंनी दंगेखोरांना इशारा दिला की, कायदा हातात घेणारा कोणत्याही धर्माचा असो, त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. सगळ्यात महत्त्वाचे इस्रायलमधील अरब पक्षाचे नेते मन्सूर अब्बास, जे स्वतः इस्लामिक विचारधारेचे आहेत, यांनी अरबांकडून जाळलेल्या यहुदी सिनेगॉगला भेट दिली. इस्रायलमधील परिस्थिती आजही तणावग्रस्त असली तरी या घटना ‘हमास’ आणि इस्लामच्या झेंड्याखाली स्वतःचा राजकीय अजेंडा राबवणार्‍या संघटना आणि देशांना चपराक आहे.
  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@