पाली आम्हा सोयरी...

    17-May-2021   
Total Views | 1340
gecko _1  H x W


भारतीय समाजात पालींविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यांचे संशोधनही दुर्लक्षित राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये देशात पालींविषयी अभ्यास करणारी तरुण संशोधकांची फळी तयार झाली असून संशोधक अक्षय खांडेकर त्यामधील एक प्रतिनिधी आहेत. ते ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’मध्ये कार्यरत असून आजवर साधारण पालींच्या 35 नव्या प्रजातींचा शोध त्यांनी लावला आहे. पालींच्या विश्वातील अनेक अज्ञात प्रश्नांची उत्तरे देणारी खांडेकर यांची ही मुलाखत...
 
 
 
पर्यावरणीय परिसंस्थेमध्ये पालींचे महत्त्व काय? त्या अन्नसाखळीमध्ये कशा पद्धतीने भूमिका बजावतात?
 
 
बहुतांश पालीच्या प्रजाती या मांसाहारी असून कीटक आणि पृष्ठवंशीय प्राणी त्यांचे प्रमुख खाद्य आहे. रोगांचा प्रसार करणारे कीटक आणि लहान पृष्ठवंशीय प्राण्यांना खाऊन त्यांची संख्या नियंत्रणामध्ये ठेवण्याचे महत्त्वाचे काम पाली करतात (उदा. माशी, डास, झुरळ आणि कधीकधी उंदीर). पाली या पक्षी, लहान सस्तन प्राणी, इतर सरपटणारे प्राणी, मोठे कीटक यांचा प्रमुख अन्न स्त्रोत आहे. त्यामुळे अन्नशृंखलेतील समतोल राखण्यासाठी पाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पालींच्या काही प्रजाती या परागीभवनदेखील करतात. उदा. ’फेलसुमा’ कुळातील प्रजाती (आयलॅण्ड डे गेगो) या फुलांमधील मकरंद पितात. यावेळी त्यांचे खवलेदार शरीर हे ‘स्टीग्मा’ आणि परागकोशांच्या संपर्कात येतात. त्यावेळी परागण त्यांचा खवलेदार शरीराला चिकटतात. जेव्हा या पाली इतर फुलांवर किंवा झाडांवर जातात तेव्हा परागीभवनाची प्रक्रिया घडते. मधमाशा, फुलपाखरे आणि वटवाघुळांप्रमाणे पाली देखील परागीभवन घडवून आणतात.
 
 
देशामध्ये उभयचर आणि सरीसृप विषयातील संशोधन मागे राहिले आहे का? त्यामागची कारणे?
 
 
होय, हे अगदी खरे आहे की, उभयचर आणि सरपटणारे प्राणी सर्वसाधारणपणे जगातील सर्वात दुर्लक्षित पृष्ठवंशीय प्राण्यांमधील एक असून भारत देश त्याला अपवाद नाही. भारतात इतर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या तुलनेत शीत रक्ताच्या या प्राण्यांचा अभ्यास फार कमी प्रमाणात झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण उभयचर आणि सरपटणार्‍या प्राण्यांच्या नव्या प्रजातींच्या शोधाविषयीच्या बातम्या ऐकतो आणि वाचतो आहोत, जे यापूर्वी या प्राण्यांवर अभ्यास न झाल्याचे स्पष्ट करतात. वाघा-बिबट्यांसारखे महत्त्व सरीसृप आणि उभयचर प्राण्यांना नाही. ज्याप्रमाणे वाघ-बिबट्यांचे संरक्षण, संशोधन आणि संवर्धनासाठी योजना निर्माण केल्या जातात किंवा आर्थिक पाठबळ देण्यात येते, तसे कोणत्याही प्रकारचे पाठबळ सरीसृप आणि अभयचरांच्या संवर्धनासाठी मिळत नाही. शिवाय या प्राण्यांभोवती समाजात पिढ्यान्पिढ्या असलेल्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धाही त्यांना मारक ठरल्या आहेत. सरीसृप आणि उभयचरांच्या शरीरवैशिष्ट्यांमुळे घाणेरडे, विषारी अशी विशेषणे त्यांना मिळाली. त्यामुळेच या प्रजाती दुर्लक्षित राहिल्या. मात्र, आता परिस्थिती बदलली असून या प्राण्यांविषयी संशोधनाचे काम करणारी एक तरुण संशोधकांची फळी तयार झाली आहे.
 
 
gecko _1  H x W 
 

प्रदेशनिष्ठ (अ‍ॅण्डमिक) पालींचे स्थानिक पर्यावरणाच्या अनुषंगाने महत्त्व काय? त्यांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे?
 
 
प्रदेशनिष्ठ प्रजाती या छोट्या क्षेत्रापुरत्या मर्यादित असतात आणि त्यांचा अधिवास विशिष्ट निवासस्थानांमध्येच असतो. प्रदेशनिष्ठ पाली या विशिष्ट अधिवास क्षेत्रामध्येच राहण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. त्यांची अन्नसाखळीदेखील त्या विशिष्ट छोट्या अधिवास क्षेत्रामध्येच तयार झाली आहे. त्यामुळे प्रदेशनिष्ठ पाली किंवा त्यांचा अधिवास नष्ट झाल्यास संपूर्ण अन्नसाखळीला धोका निर्माण होतो. ज्यामुळे व्यापक जैवविविधतेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच प्रदेशनिष्ठ प्रजाती या स्थानिक परिसंस्था आणि जैवविविधतेचे सूचक आहेत. या प्रजातींचे संरक्षण केल्याने पर्यावरणाची कार्यक्षमता संतुलित राहते.
 

पालींच्या नव्या प्रजातीचे संशोधन का महत्त्वाचे आहे? त्यामधून कोणती गोष्ट साध्य होते?
 
 
आपल्याला काही संवर्धित करायचे असेल, तर प्रथम आपण काय संवर्धित करत आहोत. हे माहीत असणे आवश्यक आहे. म्हणूनच पालींसह कोणत्याही प्रजातींचा शोध घेणे आणि त्यांचे वर्णन करणे, हे त्यांच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे. पालींच्या नवीन प्रजातींचा शोध घेतल्याने आणि त्यांच्या अधिवास क्षेत्राचा अभ्यास केल्याने पाली आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी योग्य योजना आखण्यास मदत मिळते. निसर्गात अशा बर्‍याच झाडांच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत, ज्या माणसासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायदेशीर आहेत. परंतु, त्यामध्ये आपल्याला ज्ञात नसलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रजाती असू शकतात. त्यामुळे कोणत्याही नव्या प्रजातींचा शोध घेणे आणि त्यांचे वर्णन करणे ही मूलभूत गरज आहे. पालींना उभ्या आणि आडव्या पृष्ठभागावर चिकटून राहण्याबरोबरच शरीरापासून शेपटी वेगळी करुन त्याठिकाणी पुन्हा नवीन शेपटी विकसित करण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक पालीच्या या पैलूंचे वैद्यकीय महत्त्व शोधून ते माणसाच्या विकसासाठी कसे वापरले जाईल, याबद्दल अभ्यास करत आहेत.
 
 

gecko _1  H x W 
 
 
पालींविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी काय करावे लागेल?
 
 
पालींविषयी अनेक गैरसमज पिढ्यान्पिढ्या कायम आहेत. एका मानवी पिढीकडून ते दुसर्‍या मानवी पिढीला सांगितले आहेत. आपल्या समाजामध्ये पाली या विषारी आहेत, त्या कुरुप-भयानक असल्याचा समज आहे. तसेच आपल्या देशातील काही भागांमध्ये पालींचा आवाज अशुभ संकेत मानला जातो. त्यामुळे पालींचे संवर्धन आणि संरक्षण करायचे असल्यास विशेषत: लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. मला हे स्पष्ट करावेसे वाटते की, एकही भारतीय पाल किंवा सरडा हा विषारी नाही. ते क्वचितच चावतात आणि जर ते चावल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण, त्यांचे चावणे हे धोकादायक नसते. संशोधनादरम्यान मला बर्‍याचदा पाली चावल्या आहेत. त्यामुळे त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. पाली या स्वच्छ असतात आणि त्यामधील कित्येक प्रजाती या सुंदर दिसतात. आपल्याला त्यांना मारण्याची किंवा घराबाहेर हकलवून देण्याची गरज नाही. त्यांच्यासोबत सहजीवनाची कला आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण, त्या रोगाच्या प्रसाराकरिता कारणीभूत असलेल्या माशा, डास आणि झुरळांना खातात आणि घर स्वच्छ ठेवतात.
 
’ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’कडून वन आणि प्रजाती संवर्धनाच्या अनुषंगाने पश्चिम घाटामध्ये कशापद्धतीने काम होणार आहे?
 
 
दुलर्क्षित राहिलेल्या प्रजातींविषयी अभ्यास करण्याचे ’ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’चे उद्दिष्ट आहे. आमचे लक्ष्य पश्चिम घाटामधील लहान पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्रजातींच्या विविधतेचे आणि वितरणाचे दस्तऐवजीकरण करणे आहे. तसेच आम्ही ज्ञात नसलेल्या प्रजातींचा ‘इकोलॉजिकल’ माहितीचे संकलन करतो, जे त्यांचे आणि त्यांच्या अधिवास क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
 
 
मुलाखत : अक्षय मांडवकर

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

"काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

(PM Narendra Modi On Waqf Amendment Bill) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यामुळे विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले”, असा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121