वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून कोरोना लस द्यावी - आमदार संजय केळकर
ठाणे:- कोरोना काळातदेखील स्वतःचा जीव धोक्यात घालुन वृत्तपत्र विक्रेते ग्राहकांना सेवा देत असुन एकप्रकारे समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत.या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करून त्वरित कोरोना लस देण्यात यावी.अशी मागणी वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनच्या माध्यमातुन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासुन दुसऱ्या लाटेतही वृत्तपत्र विक्रेते कार्यरत आहेत.तेव्हा, ज्याप्रमाणे आरोग्य सेवक,पोलीस कर्मचारी,सफाई कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून अग्रक्रमाने लस देण्यात आली. त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेते घरोघरी वृत्तपत्र देण्याचे काम करतात व देशभरातील चाललेल्या घडामोडींची माहिती पोहोचवतात
.त्यामुळे वृत्तपत्रविक्रेतेही कोरोना योध्ये आहेत.यासाठी ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांकरीता वेगळा कॅम्प लावुन त्वरित कोरोना लस देण्यात यावी.अशी मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली.याप्रसंगी आमदार संजय केळकर, असोसिडाशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे व सहकारी वैभव म्हात्रे व गणेश शेडगे आदी उपस्थित होते.