अंबरनाथ : डोंबिवलीनंतर आता अंबरनाथमध्येही 'म्युकरमायकोसिस'चा पहिला रुग्ण आढळला आहे. संबंधित रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दै.'मुंबई तरुण भारत'ला दिली आहे.
कोरोनावर उपचार सुरू असतानाच एका ५० वर्षीय व्यक्तीला म्युकरमायकोसिसची लागण झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरपालिका प्रशासनानेही 'म्युकरमायकोसिस' रोगावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली असल्याचे डॉ. रसाळ यांनी सांगितले.
म्युकरमायकोसीस झालेल्या रुग्णांसाठी नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयाच्या आवारात या रोगाच्या निदानासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नाक, कान, घसा, आदी तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
प्रशासनातर्फे डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात पालिका प्रशासनाच्या व्यवस्थापनाखाली 'म्युकरमायकोसिस'च्या शस्त्रक्रिया करण्यासाठी शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ .नितीन राठोड यांनी दिली.