ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता प्रत्येक नागरिकाचे लसीकरण आवश्यक बनले आहे. मात्र, लसींची टंचाई लक्षात घेत मुंबई लगतच्या मोठ्या शहरांमध्ये आता लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकांना सूचना दिल्या आहेत.
ठाणे महापालिका मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरच्या धर्तीवर पाच लाख लसी खरेदी करणार आहे. एमएमआर प्रदेशातील सर्व महापालिकांनी अशाच प्रकारच्या प्रक्रीयेसाठी तयार रहाण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
केंद्र व राज्य सरकारतर्फे लसींचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने लसीकरण प्रक्रियेत खंड पडत आहेत. मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी ५० लाख लसींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) प्रक्रिया राबवली.
याच धर्तीवर एमएमआरमधील सर्व महापालिकांनी आपल्या शहरांमधील नागरिकांसाठी आवश्यक लसीचे प्रमाण आणि सरकारकडून होणारा पुरवठा याचा अंदाज घेऊन येणारी तूट भरून काढण्यासाठी लस खरेदी प्रक्रिया सुरू करावी,असे निर्देश मंत्री शिंदे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या महापालिकांना दिले आहेत.
ठाणे महापालिका आयुक्त नरमले !
दरम्यान, ग्लोबल टेंडर आवाक्याबाहेर असल्याची सबब सांगणाऱ्या ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी नगरविकास मंत्र्यांनी सूचना करताच ५ लक्ष लसी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तात्काळ ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.