गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या पुरातन संघर्षाची ठिणकी पुन्हा एकदा पेटली आहे. त्यामुळे केवळ इस्रायल-पॅलेस्टाईनच नाही, तर संपूर्ण मध्य पूर्व आशियेत युद्धाचे ढग पसरलेले दिसतात. तेव्हा, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आजची युद्धसदृश परिस्थिती याचा सविस्तर आढावा घेणारा हा अभ्यासपूर्ण लेख...
आपल्या पश्चिमेला असणारा, आशिया आणि आफ्रिका खंडांच्या मधला प्रदेश, ज्याला आपण ‘पश्चिम आशिया’, तर पाश्चात्त्य राष्ट्रे ‘मिडल ईस्ट’ म्हणजेच ‘मध्य पूर्व’ या नावाने ओळखतात; हा सदैव असंतोषाने अतिशय धुमसत असलेला प्रदेश आहे. सहसा इथे शांतता फार अनुभवायला मिळतच नाही. सध्या तर या प्रदेशात ‘गाझा पट्टी’ या नावाने ओळखल्या जाणार्या एक चिंचोळ्या भूप्रदेशांत इस्रायल आणि पॅलेस्टाईनी यांच्यात चकामकींचा भडका उडालेला आहे. सोमवारपासून चालू असलेल्या या धुमश्चक्रीत आतापर्यंत ११६ पॅलेस्टाईनी आणि आठ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय, शेकडो नागरिक जखमी झालेले आहेत. अजूनपर्यंत तरी या युद्धाचा शेवट दृष्टिपथात नाही. यातून आणखी काही मोठी लढाई सुरू होईल की काय, याबद्दल येथील नागरिक अतिशय काळजीत असणार हे साहजिकच. कारण, अशा युद्धांचा त्यांच्या जीवनावर फारच वाईट परिणाम होतो. पण, ही चकमक आता झाली असली तरी याची पाळेमुळे खोल इतिहासात गेलेली आहेत. त्याचा शोध घ्यायचा तर आपल्याला हजारो वर्षे मागे जावे लागेल.
सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी इजिप्तच्या सम्राटाकडे गुलामीत राबणारा एक मोठा जनसमूह होता. त्यांचा नेता मोझेस याने त्या समूहाची गुलामीतून सुटका केली आणि त्याला पुढे ईश्वरी आदेश मिळाला की, ‘तुझ्या लोकांसाठी मी एक प्रदेश नियुक्त केला आहे आणि तिथे तुझे सर्व लोक जाऊन त्यांनी वस्ती करावी. तेथे त्यांचे सर्वस्वी कल्याण होईल.’ असा आदेश मिळाल्यावर मोझेस याने आपल्या लोकांना त्या प्रदेशाकडे नेले. हा प्रदेश म्हणजेच सध्या जिथे पॅलेस्टाईन हा प्रदेश आहे तो! मोझेसला स्वतःला मात्र त्याने काही तरी चूक केल्यामुळे त्या प्रदेशात जाण्याची देवाने मनाई केली होती, त्याने तेथील ‘नेबो’ नावाच्या टेकडीवरून ही भूमी डोळे भरून बघितली आणि तेथेच देह ठेवला. पण, त्याच्या सर्व लोकांनी मात्र स्वतंत्र झाल्यामुळे आनंदाने या प्रदेशात आपले वास्तव्य केले आणि त्याचे नाव ठेवले ‘इस्रायल.’ हा जो जनसमूह होता, त्याचे नाव ‘यहुदी’ म्हणजेच आताच्या इंग्रजी भाषेत ‘ज्यू समाज’. त्यांच्या देवाच्या धार्मिक आज्ञांप्रमाणे ही इस्रायलची भूमी प्रत्यक्ष देवाने त्यांच्यासाठी निर्माण केली, अशी त्यांची प्रखर श्रद्धा आहे. असा हा ज्यू धर्म अशाप्रमाणे या भूमीत अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहे.
पुढे या भूमीवर अनेक आक्रमणे झाली, त्याचे मुख्य कारण म्हणजे हा सर्व प्रदेश ज्यातून अरेबियाच्या दक्षिणेकडून पुढे तुर्कस्तान आणि युरोपला जाणार्या खुश्कीच्या मार्गावर अत्यंत मोक्याच्या जागी आहे. शिवाय, तिथे जॉर्डन नदी, गॅलिली नावाचे सरोवर आणखी असेच काही पाण्याचे साठे आहेत. त्यांच्याविना हा सर्व प्रवास अतिशय रखरखीत वाळवंटातून होतो, म्हणूनच अनेक आक्रमकांनी या प्रदेशावर आपला ताबा मिळवण्यासाठी प्रखर लढे दिले. त्यापैकी काही प्रमुख लढायांमध्ये जेव्हा यहुदी म्हणजेच ज्यू समाजाचा पराभव झाला, तेव्हा हा समाज देशोधडीला लागला. अशाच एक रोमन स्वारीच्या वेळी ज्यू समाजाचे प्रसिद्ध भव्य मंदिर, जे जेरूसलेम या प्रसिद्ध शहरात होते, ते संपूर्णपणे धुळीला मिळवण्यात आले. त्याच मंदिराची एक भिंत मात्र अजून शाबूत आहे, तीच ती प्रसिद्ध ‘वेलिंग वॉल’ या नावाने तिथे आजही अस्तित्वात आहे. तिथे ज्यू भाविक शोक करण्यासाठी जमतात, विशेष करून शनिवारी, जो ‘शब्बाथ’ या नावाने इस्रायलमध्ये सुट्टीचा दिवस असतो. ही भिंत ज्या परिसरात आहे, तिथेच पुढे मुस्लीम आक्रमकांनी एक मोठी मशीद बांधली.
सन ७०५ मध्ये बांधलेल्या या मशिदीचे नाव आहे ‘अल अक्सा मशीद.’ पैगंबर महंमद यांनी इथे या शहराला भेट दिली होती, त्या वेळेस त्यांना देवाच्या कृपेने एक रात्रीकरिता स्वर्गाची सफर करून देण्यात आली आणि त्यासाठी ‘बुराक’ (ज्याचा अर्थ ‘वीज’ असा आहे) नावाच्या पंख असलेल्या घोड्याचा वाहन म्हणून उपयोग करण्यात आला, अशी मुस्लीमधर्मीय लोकांची श्रद्धा आहे. तो ‘बुराक’ ज्या खडकावरून उडाला, त्या खडकाभोवती एक मोठा घुमट तयार करून त्याला सोन्याच्या पत्र्याने मढवले आहे. त्याला म्हणतात ‘दि डोम ऑफ दि रॉक!‘ ही तिन्ही ठिकाणे एकाच मोठ्या मैदानी परिसरात आहेत. शिवाय, येशू ख्रिस्ताला सुळी दिल्याची जागादेखील इथून अगदी जवळच एक टेकडीवर आहे. अशा प्रकारे जगातील तीन पुरातन धर्म, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम यांची अतिशय पवित्र मानली गेलेली श्रद्धास्थळे जेरूसलेम या अत्यंत पुरातन शहराच्या मध्यभागी आहेत. त्यामुळे हा छोटासा भूखंड जगातील अतिशय संवेदनशील भूभागात मोडतो!
रोमन अधिपत्याच्या काळात याच ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, २०२१ वर्षांपूर्वी! येशू हा ज्यू म्हणून जन्मला आणि ज्यू म्हणूनच त्याचा सुळावर मृत्यूही जेरूसलेम इथेच झाला. त्याला तेव्हाच्या रोमन गव्हर्नर पिलेट याने तेथील ज्यू मंदिराच्या पुजार्यांच्या तक्रारीवरून सुळावर चढवले होते. पुढे ख्रिश्चन धर्म खूप वाढला आणि संपूर्ण युरोपात पसरला. त्या ख्रिश्चन अनुयायांमध्ये ज्यू समाजाच्या विरोधात एक अढी बसलेली होती, त्यांना ‘येशूचे मारेकरी’ असे म्हणून त्यांचा नेहमी द्वेष केला जाई. अनेक आक्रमणे झेलत हा समाज मायभूमीपासून देशोदेशी परागंदा झाला. सुरुवातीपासूनच हा समाज व्यापारात अतिशय निपुण होता. पैसा मिळवणे, वाढवणे आणि राखणे यात अतिशय पारंगत असल्याने अनेक देशांच्या राज्यकर्त्यांनी या समाजाच्या हुशार लोकांचा उपयोग आपल्या देशाची समृद्धी वाढवण्यासाठी केला. थोड्याफार प्रमाणात हा ज्यू समाज आपल्या येथील मारवाडी समाजासारखा आहे! तसेच हे लोक हुशार आणि शिक्षणात अतिशय प्रगत असल्याने त्यांचा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस खूपच हातभार लागलेला आहे. ‘नोबेल’ पारितोषिक विजेत्यांपैकी सुमारे अर्धे लोक निव्वळ ज्यू समाजाचे आहेत! जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, पोलंड इत्यादी अनेक युरोपीय देशांत हा समाज सुस्थित झाला होता. इतकी शतके दूर राहून आणि नाना हालअपेष्टा सोसूनसुद्धा हा समाज आपल्या धर्माला घट्ट चिकटून राहिलेला आहे. त्यांच्या मनात आपल्या मातृभूमी इस्रायलची आठवण सतत जागती होती आणि त्यांच्या सगळ्या प्रार्थना ‘पुढील वर्षी आपण इस्रायलमध्ये असू!’ या वाक्याने संपूर्ण होत असत!
हिटलरचा जर्मनीत उदय झाल्यानंतर त्याने आपल्या राजकारणासाठी ज्यूद्वेषाची ठिणगी पेटवली. ज्यू हे सर्वसाधारणपणे पैसे राखून असल्याने आणि त्यांची संख्या फारच थोडी असल्याने त्यांच्याविरुद्ध बाकी जर्मनांचा द्वेष भडकवणे हिटलरला सोपे गेले. पण, त्या द्वेषाची परिणती ज्यूंच्या हत्याकांडात झाली! जर्मनीने फक्त त्यांचेच नव्हे, तर त्यांनी जिंकलेल्या पोलंड, डेन्मार्क, हॉलंड इत्यादी देशांतील ज्यू नागरिक ज्यात पुरुष, स्त्रिया आणि मुले यांचा समावेश होता, त्यांचे पद्धतशीर योजनाबद्ध हत्याकांड घडवून आणले! मानवतेविरुद्धच्या अतिशय घृणास्पद गुन्ह्यात हा गुन्हा गणला गेला. थोडेथोडके नव्हे, तर ६० लाख ज्यूंची या संहारात आहुती पडली. एवढे झाल्यानंतर मात्र जगातील ज्यू नेत्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी सुरक्षित जागा शोधण्यास सुरुवात केली. ज्यू लोक आधीपासूनच त्यांच्या मातृभूमीस, पॅलेस्टाईन येथे जाण्यास उत्सुक होते. त्यामुळे अमेरिकेतल्या धनाढ्य ज्यूंनी पॅलेस्टाईनमधील जमिनी त्यांच्या तुर्की आणि अरब मालकांकडून विकत घेतल्या आणि या निर्वासित समाजाला इस्रायलमध्ये वसवण्याचा कार्यक्रम पार पाडला. त्या निर्वासित समाजाला अतिशय कठोर परिश्रम करून ही भूमी राहण्यायोग्य करायला लागली. त्यांनी या वाळवंटी जमिनीत अक्षरशः नंदनवन फुलविले.
पण, येथील मूळ रहिवासी जे पॅलेस्टाईनी लोक होते, त्यांचे काय? त्यांना तेथून हुसकावून लावण्यात आले. त्याला विरोध म्हणून इस्रायलच्या 1948 सालच्या स्वातंत्र्यदिनीच शेजारील जॉर्डन, इजिप्त, सीरिया आणि लेबनॉन या देशांनी इस्रायलवर स्वारी केली. अतिशय घनघोर युद्ध झाले आणि त्या युद्धात इस्रायलने या चारही देशांवर निर्विवाद विजय मिळवला. इतकेच नाही तर जेरूसलेम शहराच्याही पश्चिम भागावर त्यांनी आपला ताबा मिळवला. पूर्व भाग मात्र जॉर्डनने आपल्याकडेच राखला. पुढे १९६७ साली पुन्हा या सगळ्या अरब राष्ट्रांनी इस्रायलवर आक्रमण केले. पुन्हा त्यांचा इस्रायलने संपूर्ण पराभव केला आणि संपूर्ण जेरूसलेम शहर, गाझा पट्टी आणि सीरियन सीमेनजीक गोलान हाईट्स हा डोंगराळ भाग, तसेच जॉर्डन नदीचा पश्चिम किनारा ज्याला ‘वेस्ट बँक’ असे म्हणतात, तोदेखील ताब्यात आणला. पुन्हा १९७३ साली ज्यूंच्या ‘योम किप्पुर’ या सणाच्या दिवशी अचानक अरब देशांनी हल्ला केला. पुन्हा इस्रायलने सुरुवातीच्या पीछेहाटीनंतर जोमाने चढाई करून या सर्व अरब देशांचा पराभव केला आणि सीरियाचा ‘गोलान हाईट्स’ हा उत्तरेतील टेकड्यांचा भाग पूर्णपणे इस्रायलच्या सीमेत समाविष्ट केला. त्यातच ‘गाझा पट्टी’चा ३६७ स्क्वेर किलोमीटर्स क्षेत्रफळाचा एक चिंचोळा चौकोनी प्रदेश जो भूमध्य सागराला लागून इस्रायलच्या पूर्वेकडे आहे, तोदेखील इस्रायलने जोडून घेतला.
या सगळ्या प्रदेशात राहणारे मूळच्या पॅलेस्टाईनी नागरिकांपैकी बरेच जण निर्वासित म्हणून 1948 पासूनच विविध अरब देशांत वस्तीला गेले. जॉर्डन, सीरिया, लेबनॉन आणि इजिप्तमध्ये मुख्यत्वे करून हे निर्वासित गेले. पण, यानंतर अनेक इतर अरब देशांनी जसे की कुवैत, संयुक्त अरब अमिराती, इराक आदी देशांनी ठरावीक ‘कोटा सिस्टीम’ आखून काही निर्वासित आपल्या देशांत घेतले. परंतु, यातील कुणाही नागरिकाला आपले नागरिकत्व देऊ केले नाही. केव्हा तरी हे सर्व आपला देश स्वतंत्र करून परत जातील, असेच त्यांच्यावर बिंबवण्यात आलेले होते. त्यासाठी या निर्वासित समूहाने दहशतवादाचा अवलंब करण्याससुद्धा या अरब देशांची फूस असे! निर्वासितांचा त्या काळातला मुख्य नेता यासेर अराफत याच्या ‘पीएलओ’ या संघटनेकरवी राजकारण आणि दहशतवाद दोन्ही चालूच होते. पण, इस्रायलचे शासन या सर्वांस पुरून उरले. शेवटी अराफत याला इस्रायलच्या ‘वेस्ट बँक’मधील रमाला या गावात आपले स्वयंशासन इस्रायलच्या मेहेरबानीवरच चालवावे लागले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा सहकारी महमुद अब्बास त्याच ‘पॅलेस्टाईन ऑथोरिटी पीए’च्या प्रमुख पदावर आरुढ झाला. आज 85 वर्षांचा अब्बास अजूनही आपले पद रिकामे करण्यास तयार नाही. २००६-०७मध्ये ‘पीए’चा गाझा पट्टीत नव्याने सक्रिय झालेल्या ‘हमास’ या प्रतिस्पर्धी दहशतवादी पॅलेस्टाईनी गटाने पराभव करून त्यांना तेथून सत्तेबाहेर फेकून दिले. तेव्हापासून महमुद अब्बास आणि ‘हमास’ गट एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. ‘हमास’ हा गट ‘हरकत अल मुकवामा अल इस्लामिया’ म्हणजे ‘इस्लामिक प्रतिरोध चळवळ’ या नावाने सक्रिय होता. पुढे त्यांच्या ‘एचएमएस’ या इंग्रजी आद्याक्षरावरून त्यांचे नाव ‘एच-एम-एस’ ‘हमास’ असे पडले. या अरबी शब्दाचा अर्थ ‘उत्साह’ असा आहे. ही पॅलेस्टाईनी तरुणांची संघटना आहे, त्यांची एक ‘अल कासम ब्रिगेड’ ही दहशतवादी संघटना देखील आहे. हे गाझा पट्टीत सक्रिय आहेत. या वर्षी तिथे निवडणूक व्हायची होती. पण, महमुद अब्बास यांना जिंकण्याची खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांनी निवडणूक बेमुदत पुढे ढकलली. यामुळे ‘हमास’च्या कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला आणि ते काहीतरी आंदोलन करण्याचे निमित्तच शोधत होते. त्यासाठी त्यांनी गाझा पट्टीत प्रचंड तयारी करून ठेवली आहे.
गाझा पट्टीत अतिशय लहान भूभागात आज जवळजवळ २० लाख पॅलेस्टाईनी लोक अतिशय दाटीवाटीने राहतात. त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे. त्यांना आपले आयुष्य स्वतंत्र आणि इस्रायलच्या दबावाबाहेर पडून घालवायचे आहे. ते तर्हेतर्हेने इस्रायलच्या शासनाशी संघर्ष करत असतात. त्यांचा मुख्य उद्योग म्हणजे कुठल्याही प्रकारच्या लोखंडी पाईपातून ते दारुगोळा भरलेली रॉकेट तयार करतात. अशी हजारो रॉकेट्स त्यांनी तयार करून ठेवली आहेत. या सोमवारी जेरूसलेम येथे ‘अल अक्सा’ मशिदीत रमजाननिमित्त पॅलेस्टाईनी लोकांची खूप गर्दी जमली होती. त्यात अचानक दंगल सुरू झाली. इस्रायलच्या पोलिसांनी प्रवेश करून दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ‘हमास’ने याचा फायदा उठवत इस्रायलला धमकी दिली की, त्यांनी ही कारवाई मागे घेतली नाही, तर त्यांना ‘हमास’च्या भीषण हल्ल्यास तोंड द्यावे लागेल आणि नंतर त्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेट्सचा मारा करण्यास सुरुवात केली.
एका दिवसात त्यांनी सुमारे १५० रॉकेट्स सोडली. ही सगळी रॉकेट्स इस्रायलच्या नागरी वस्तीत पडली. सुदैवाने इस्रायलने नुकतेच एक संरक्षक कवच ज्याला ‘Iron Dome’ म्हणजे ‘लोह घुमट’ असे नाव आहे, त्याची उभारणी गाझाच्या नजीक सीमेवरील १३ गावांत केली आहे. त्यात रॉकेट्स विरोधी क्षेपणास्त्रे असतात आणि शत्रूचे रॉकेट शत्रू तळावरून निघाल्याक्षणी त्याचा माग घेऊन ते हवेतच उडवण्याची क्षमता या अभिनव शस्त्रात आहे. हे शस्त्र 90 टक्क्यांपर्यंत हल्ले निष्प्रभ करू शकते. पण, ‘हमास’ सध्या अतिशय मोठ्या संख्येने रॉकेट्स डागत आहे. गेल्या पाच दिवसांत त्यांनी सुमारे १,५०० रॉकेट्स त्यांनी डागली आहेत. सोमवारीच या रॉकेटने सौम्या संतोष या एक केरळी परिचारिकेचा बळी घेतला. ती बिचारी नोकरीसाठी इस्रायलच्या एक गावात तिच्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी आलेली होती. तिचा नऊ वर्षांचा मुलगा अजून भारतातच तिच्या घरी आहे. आताच इस्रायली सरकारने तिच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे वचन दिले आहे.
आता इस्रायलने आपले अतिशय सक्षम हवाईदल या लढाईत पुढे आणले आहे. त्यांनी अतिशय अचूक बॉम्बिंग करून ‘हमास’चे अड्डे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या हेरखात्याकडून मिळालेल्या अचूक माहितीचा उपयोग करून त्यांनी ‘हमास’च्या ‘अल कासम ब्रिगेड’चे टॉप कमांडर्स असलेल्या इमारतीला उडवून दिले, त्यात ते सगळे दहशतवादी ठार झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घोषणा केली आहे की, “ ‘हमास’ने इस्रायलच्या नागरिकांना लक्ष्य केले आहे. कोणताही सार्वभौम देश आपल्या नागरिकांचा असा बळी गेलेला पाहून स्वस्थ बसू शकत नाही. आम्ही आमच्याकडील सगळ्या शस्त्रांचा वापर करून ‘हमास’ला उद्ध्वस्त करून टाकणार आहोत!” त्यानुसार इस्रायलची प्रति कारवाई खूपच जोरात आणि वेगाने सुरू झाली आहे. आतापर्यंत ‘हमास’चे अनेक दहशतवादी यात ठार झाले आहेत. एकूण ११६ मृत असे ‘हमास’नेच जाहीर केले आहे. या कारवाईबरोबरच आता इस्रायलमध्ये ज्यू आणि पॅलेस्टाईनी यांच्यादरम्यान सांप्रदायिक दंगे सुरू झालेले आहेत. इस्रायली पोलीस त्यांचा वेध घेऊन स्थितीला नियंत्रणात आणण्याचा खटाटोप करत आहेत. एकूणच पाहता, हा झगडा इतक्यात थांबेल असे वाटत नाही. ‘हमास’चा रॉकेट्स साठा संपेपर्यंत तरी त्यांच्याकडून शांतीची अपेक्षा ठेवता येत नाही.
भारताला यात अतिशय सावध भूमिका घ्यावी लागेल. आताच आपल्या येथील अनेक मुस्लीम संघटना ‘हमास’च्या बाजूने बोलताना दिसतात. या लढाईची सुरुवात रॉकेट्स डागून ‘हमास’नेच केली आहे, इकडे ते बहुतेक दुर्लक्ष करत आहेत, तसेच सौम्या संतोषच्या दुर्दैवी मृत्यूसाठीदेखील त्यांनी काही खेद व्यक्त केलेल्या पाहिला नाही. भारत सरकारचा इस्रायल हा एक अतिशय सच्चा आणि घनिष्ट मित्र आहे. त्यांनी आपल्याला ‘कोविड’च्या संकटामध्येसुद्धा ‘ऑक्सिजन’ आणि औषधे पाठवून मदत केलेली आहे, तसेच अनेक आधुनिक शस्त्रास्त्रे त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. सध्या चाललेला संघर्ष हा त्यांचा अंतर्गत मामला आहे, यात दहशतवादी ‘हमास’ची बाजू घेण्याचे भारताला काहीच कारण नाही. तरीही हा संघर्ष लवकरात लवकर संपावा ही आपली सार्यांचीच इच्छा आहे. तसे होऊन पुन्हा त्या प्रदेशात शांती नांदो, ही सदिच्छा व्यक्त करून हा प्रदीर्घ लेख मी आटोपता घेतो!
- चंद्रशेखर नेने