चला कोलोरॅडोच्या खोर्‍यात, गव्याच्या शिकारीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

calirado_1  H x


जादा झालेल्या गव्यांची शिकार करायला शिकारी लोकांना अधिकृतपणे परवानगी द्यायचं ठरलं. मग संबंधित सरकारी खात्याने चक्क जाहिरात दिली की, शिकारीचे सर्व नियम पाळून, ज्यांना शिकार करायची आहे त्यांनी अर्ज करा.


शिकार हा एक खेळ आहे. आपल्या रामायण-महाभारतात, पुराणांत शिकार किंवा मृगयेच्या विपुल कथा आहेत. रामायणाची सुरुवात मुळी शिकारीने झाली आहे. तमसा नदीच्या तीरावर एका व्याधाने एका क्रौंच पक्ष्याची शिकार केलेली पाहून महर्षी वाल्मिकींच्या तोंडून काव्यामध्ये शापवाणी उच्चारली गेली आणि रामायण या आदिकाव्याचा प्रारंभ झाला. दशरथ राजाने शब्दवेध करून मृगाला बाण मारला, तो श्रावण बाळाला लागला. श्रावणाच्या पित्याने दशरथाला, “तूही असाच पुत्रशोकाने तळमळत मरशील,” असा शाप देऊन स्वतः प्राण सोडला. पण, तो शापच वरदान ठरला. पुत्रशोक होण्यासाठी आधी पुत्र असायला हवा ना! म्हणजे या फसलेल्या आणि शापित शिकारीने रामायणाचं कथानक पुढे नेलं आणि मग दंडकारण्यातील मायावी कांचनमृगाची शिकार. तिने तर साध्या शिकारीला ‘सत्’ आणि ‘असत्’ यांच्यातल्या प्रचंड संघर्षाचं वैश्विक परिमाण दिलं.


हस्तिनापूरचा सम्राट शांतनू मृगयेसाठी यमुनातीरावर फिरत असताना सत्यवती मत्स्यगंधेच्या प्रेमात पडला. त्याला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोघे मुलगे झाले. शांतनूच्या मृत्यूनंतर चित्रांगद राजा झाला. देवव्रत भीष्म सत्यवतीच्या पित्याला दिलेल्या वचनानुसार स्वतः राजा न होता कारभार पाहू लागला. आता सारं काही ठीक आहे, असं वाटतंय तोच पुन्हा शिकारीचा नाद आड आला. राजा चित्रांगद मृगयेला गेलेला असताना त्याचं चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाशी युद्ध झालं आणि त्यात राजा ठार झाला. विचित्रवीर्य क्षयाने मरण पावला. त्याचा मुलगा पांडू राजा बनून जरा स्थिरस्थावर होतोय, तोच पुन्हा शिकारीच्या रूपाने दैवाने दावा साधला. पांडू राजाच्या हातून चुकून किंदम नावाचा ऋषी मारला गेला. पुढची कथा आपल्याला माहीतच आहे. याशिवाय पौराणिक कथांमध्ये राजा शिकारीसाठी वनात गेला. मग त्याची आणि सेवकांची चुकामूक झाली. अशा तोंडावळ्याच्या शेकडो कथा असाव्यात. त्यापैकी एक सुखान्त कथा म्हणजे दुष्यन्त-शकुंतलेची. या शिकार कथेतून भरत नावाचा एक महाबलाढ्य राजा जन्मला. इतका कर्तबगार की, त्याच्या नावावरून या देशाला ‘भारत’ हे नाव पडलं. पण, अशा काही सुखान्त कथा वगळता शिकारीच्या नादाने दुःखच ओढवून घेतलेलं दिसतं. किंबहुना, दुःखान्त झाल्यामुळेच त्या कथा बनल्या. अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे, छत्रपती शिवरायांचे पिताश्री शहाजीराजे भोसले उर्फ महाराजसाहेब यांचे. ते पट्टीचे शिकारी होते. आयुष्यभर त्यांनी असंख्य वन्य पशू मारले होते. त्यांच्या कथा झाल्या नाहीत. मात्र, आयुष्यातल्या शेवटच्या शिकारीत ते धावत्या घोड्यावरून खाली कोसळले आणि मरण पावले, ही कथा झाली.


 
एक गमतीदार योगायोग आपल्या असाही लक्षात येईल की, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवराय या दोघांनाही शिकारीचा नाद नव्हता. आपल्याला असंही म्हणता येईल की, धर्मसंस्थापनेच्या आपल्या दैवदत्त कार्यात ते इतके बुडालेले होते की, मृगयेचा वेळखाऊ छंद करायला त्यांना वेळच नव्हता. तरी कृष्णाच्या जीवनात शिकारी आलाच. रानात ध्यानस्थ बसलेल्या कृष्णाच्या कोमल पावलाला हरीण समजून एका व्याधाने त्याच्यावर बाण सोडला आणि कृष्णाने देह सोडला. शिवरायांनी तशा लक्षाणिक अर्थाने शिकारी केल्या. महिष म्हणजे रेडा. आई जगदंबेने त्रिशुळाने महिषासुराला ठार केलं होते. शिवरायांनी त्या महिषासुराप्रमाणेच गाजलेल्या एका आदिलशाही ३२ दातांच्या रेड्याला वाघनखांनी फाडून मारला. तसंच कंसमामाप्रमाणे उन्मत्त झालेल्या एका मुघली मामावर ऐन मध्यरात्रीच्या गर्द काळोखात भवानी तलवारीचा खडाडकन घाव घातला होता. पण, तरबेज शिकार्‍याची गोळीही कधीकधी चुकते म्हणतात. मामासाहेबांचं धूड वाहून न्यायचा बहुतेक यमदूतांना कंटाळा आला असावा. उजव्या हाताची मधली तीन बोटं साफ तुटली. पण, जीव वाचला. शिवरायांनी साधलेल्या या दोन शिकारी एवढ्या प्रभावी होत्या की, त्यामुळे भारताच्या इतिहासाचा सगळा प्रवाहच पालटून गेला. १९७०च्या दशकात मुंबईहून ‘नवनीत डायजेस्ट’ नावाचं मासिक निघत असे. उमाकांत ठोमरे त्याचं संपादन करीत असत. त्यात लालू दुर्वे नावाच्या लेखकाच्या शिकारकथा येत असत. १९८९-९०च्या काळात अयोध्या आंदोलनाच्या निमित्ताने माझा संपर्क ‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील उर्फ बाबा पाटील यांच्याशी आला. ‘नवी क्षितिजे’ हे मराठीतलं एक अत्यंत दर्जेदार असं वैचारिक त्रैमासिक होतं. म्हणजे ते अल्पावधीतच बंद पडलं. हे वेगळं सांगायला नकोच. ज्यांना वैचारिक वाचनाची आवड आहे, असे लोक आजही त्याच्या एखाद्या जुन्या अंकासाठीसुद्धा जीव टाकतात.


तर, बाबा पाटलांना लोक डाव्या विचारांचे समजत असत. प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. ते प्रखर तर्कवादी-बुद्धिवादी होते आणि अयोध्या प्रकरणात हिंदू समाजाचीच बाजू अत्यंत न्याय्य आहे, या निष्कर्षावर ते त्यांच्या तर्कनिष्ठ पद्धतीने आले होते. बाबांशी गप्पा मारताना समजलं की, चंद्रसेन दुर्वे उर्फ लालू दुर्वे हे कल्याणला राहतात. ते आणि बाबा पाटील ‘बर्मा शेल’मधले सहकारी आणि ‘नवनीत’मधल्या त्या सुंदर शिकारकथांचा संग्रह ‘अरण्योत्सव’ या नावाने निघालाय.लालू दुर्व्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट मात्र, आणखी दहा वर्षांनंतर म्हणजे २००० सालानंतर केव्हातरी झाली. तोपर्यंत ‘शिकार’ या विषयात बरंच काही घडून गेलं होतं. जगभर सर्वत्रच वाढतं नागरीकरण, बेछूट जंगलतोड, वन्य प्राणी आणि पक्षी यांची बेसुमार चोरटी शिकार याविरुद्ध आंदोलन उभी राहिली होती. भारतातही मनेका गांधींच्या अत्याग्रहामुळे केंद्र सरकारने शिकारबंदीचा कायदा अतिशयच कडक केला होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर लालू दुर्वे यांचीशी गप्पा-वजा-मुलाखतच घेतली. ते कल्याणला रामवाडी परिसराला राहत असत. ते म्हणाले की, “शिकार करणं म्हणजे नुसतं वाघाला गोळी घालणं नव्हे, अनुभवी ज्येष्ठ शिकारी रानहाके वनवासी, वाटाडे यांच्याबरोबर रानात फिरणं, त्यांच्या जुन्या-जुन्या गोष्टी ऐकणं, प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक यांची ओळख करून घेणं, इथपासूनच शिकारीचा छंद सुरू होतो.”

मी मध्येच त्यांना एक शंका विचारली, कोल्हापूरचे संस्थानिक शहाजीराजे दुसरे हे स्वत: उत्तम शिकारी होते. शिवाय, ते दुसर्‍या महायुद्धात इंग्रजी सैन्यातून आफ्रिका आघाडीवर लढून आले होते. कोल्हापूरच्या राजाराम चित्रगृहात ‘मॅन ईटर्स ऑफ कुमाऊँ’ हा जिम कॉर्बेटच्या कथेवर आधारित चित्रपट बघायला महाराज मुद्दाम गेले होते. बरोबर त्यांचे बरेचसे शिकारी मित्र होते. त्यात भालजी पेंढारकरही होते. थोड्या वेळाने महाराजांनी सगळ्यांंना विचारलं, “काय विशेष लक्षात आलं तुमच्या?” कुणाला काही समजेना, फक्त भालजी म्हणाले, “महाराज, पहिली दृष्यं वाघाची आहेत, नंतरची वाघिणीची आहेत.’‘ महाराजांनी “शाबास!!” म्हणून भालजींच्या पाठीवर थाप मारली आणि इतरांना म्हणाले, “कसले रे तुम्ही शिकारी? नुसते बंदूकबारदार आहात.” भालजींच्या ‘साधा माणूस’ या आत्मचरित्रातला हा किस्सा ऐकवून मी लालूंना विचारलं, “नुसतं बघून असं खरंच समजतं का?” त्यावर मोठमोठ्या मिशांमधून हसत लालू उत्तरले, “समजतं म्हणजे? ज्याला हे समजतं तोच जातिवंत शिकारी. म्हणून तर मी म्हणालो ना, नुसत्या गोळ्या झाडता आल्या म्हणजे शिकारी होता येत नाही. इतकंच नव्हे, तर पुढे जाऊन तुला सांगतो की, जातिवंत शिकारी शक्यतो नरावरच गोळी चालवतो, मग तो वाघ असो, हरीण असो, रानडुक्कर असो की, गवा असो. नुसत्या एका नजरेने रानातून पळणारं जनावर नर की मादी, हे ओळखता येतं. पण, ती नजर तयार व्हायला अनुभवी लोकांबरोबर रात्रंदिवस रानं तुडवावी लागतात. आपल्याकडे हेच तर झालं. हातात बंदूक आहे, समोर काहीतरी पळतंय, ठोक त्याला. ही कत्तल झाली, शिकार नव्हे, अशा बेछूट कत्तलीमुळेच आपल्याकडचे वन्य प्राणी वेगाने नाहीसे झाले आणि ही अशी बिनडोक कत्तल इंग्रजांनी तर केलीच. पण, त्यांच्यापेक्षा स्वातंत्र्यानंतर आपल्या आचरट बंदूकबहाद्दरांनी जास्त केली. त्यामुळे कायदे कडक झाले. त्यांचा आता विपरित परिणाम होतोय. कोकणात रानडुक्कर शेतीची आणि वानर बागायतीची बेसुमार नासधूस करतायत. त्यांची शिकार करणं आवश्यक आहे. पण, ती करता येत नाही. ‘वानरमारे’ असा एक खास वर्ग होता. ते लोक धनुष्यबाणाने वानरांना मारून त्यांना खाऊनही टाकत असत. तो वर्गच या कायद्याने नाहीसा झाला आणि आता वानर घालतायत धुमाकूळ.”


लालू उर्फ चंद्रसेन दुर्वे, त्यांचं ‘अरण्योत्सव’ हे अत्यंत सुंदर पुस्तक आणि एकंदरीतच मृगया या विषयाची आठवण होण्याचं कारण अमेरिकेतून आलेली एक बातमी. अमेरिकेत, कोलोरॅडो नदीच्या खोर्‍यात, अ‍ॅरिझोना राज्यात ग्रँड कॅन्यन राष्ट्रीय उद्यानात आज ५०० गवे आहेत. राष्ट्रीय उद्यानात किती गवे असावेत, याचं जे काही मोजमाप तज्ज्ञांनी ठरवलं आहे, त्यापेक्षा ते बरेच जास्त झाले आहेत. गवा म्हणजे रानरेडा हा एक अवाढव्य प्राणी आहे. तो शाकाहारी आहे. तो अखंड गवत आणि झाडांची पानं खात असतो. पूर्ण वाढ झालेल्या एका गव्याची उंची साधारण सहा फूट आणि वजन एक हजार ते १,१०० किलो असू शकतं. म्हणजे या धुडाला एका दिवसाला किती गवत लागत असेल पाहा. तज्ज्ञांच्या मते ग्रँड कॅन्यन राष्ट्रीय उद्यानात गवत, झाडाची पानं, पाणी इत्यादी नैसर्गिक सामग्री ३०० गव्यांना पुरेशी आहे. त्या पलीकडे गव्यांची संख्या वाढू देणं म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचं पर्यावरण वैविध्य बिघडवणं. मग आता यावर उपाय काय? तर जादा झालेल्या गव्यांची शिकार करायला शिकारी लोकांना अधिकृतपणे परवानगी देणं. मग संबंधित सरकारी खात्याने चक्क जाहिरात दिली की, शिकारीचे सर्व नियम पाळून, ज्यांना शिकार करायची आहे त्यांनी अर्ज करा. आता नियम म्हणजे काय, तर शिकारीसाठी म्हणून जी खास शस्त्रं असतात, त्यातलंच शस्त्र वापरायचं. हो, नाहीतर कुणी शहाणा मशीनगन घेऊन यायचा! तसंच राष्ट्रीय उद्यानात मोटार आणायला परवानगी नाही. त्यामुळे गव्यांच्या मागावर पायी हिंडायचं. आता चार हजार ९२६ चौ.कि.मी. पसरलेल्या ग्रँड कॅन्यन राष्ट्रीय उद्यानात एखाद-दोन बंदुका, स्वतःचं खाणं-पिणं, दुर्बिण, कॅमेरे इत्यादी साहित्यासह पायी हिंडायचं, म्हणजे अमेरिकनांना फारच झालं. कारण, अमेरिकन माणूस एकवेळ अन्नपाण्याशिवाय राहील, पण गाडी नाही म्हणजे जीवनाला काही अर्थच नाही, असं त्याला वाटतं.आणि तरीही गव्यांच्या शिकारीसाठी परवा १० मेच्या सोमवारपर्यंत तब्बल ४५ हजार हौशी लोकांचे अर्ज आलेत. आता संबंधित खातं लॉटरी पद्धतीने त्यातून नावं निवडणार आहे. बघूया, कोणकोण नशीबवान ठरतात ते.

@@AUTHORINFO_V1@@