१६ ते ३१ मे या पंधरवड्यासाठी विनामूल्य होणार पुरवठा
नवी दिल्ली : येत्या पंधरवड्यात म्हणजे १६ ते ३१ मे या कालावधीसाठी कोविशील्ड व कोवॅक्सिनच्या 191.99 लाख मात्रा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवल्या जातील. यामध्ये १६२.५ लाख कोविशील्ड आणि २९.४९ लाख कोवॅक्सिनच्या मात्रा असतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. या मात्रांच्या वितरणाचे वेळापत्रक आगाऊ कळवले जाईल. पाठवलेल्या लसींचा योग्य प्रकारे उपयोग करावा, व लस वाया जाण्याचे प्रमाण कमीतकमी असावे यासाठी राज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, असे आवाहनही केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
आतापर्यंत देशभरात सुमारे 18 कोटी लसींचे डोस नागरिकांना दिले गेले आहेत. कोविड लसीकरण मोहिमेचे आज ११८ दिवस यशस्वीपणे पूर्ण झाले असून, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांतून १७.८९ कोटी लसमात्रा देशभरातील लाभार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत. १७ कोटी लसमात्रांचा टप्पा ११४ दिवसांत यशस्वीपणे पार करणारा भारत हा जगातील सगळ्यात गतिमान देश आहे. हा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेने ११५ दिवस ,तर चीन ने ११९ दिवस घेतले होते.
'मुक्त किंमत व्यवस्था व गतिशील राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण धोरण' १ मे २०२१ पासून लागू केले गेले असून, त्यानुसार उपलब्ध लसमात्रांपैकी ५० टक्के मात्रा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्रातर्फे विनामूल्य पुरविण्यात येत आहेत. उर्वरित ५० टक्के मात्रा लस उत्पादन कंपन्यांकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी किंवा खाजगी रुग्णालयांनी थेट खरेदी करण्यासाठी उपलब्ध असतील. यापूर्वी १ ते १५ मे दरम्यान १.७ कोटींहून अधिक लसमात्रा केंद्र सरकारने राज्य सरकारांना मोफत उपलब्ध करुन दिल्या होत्या. याशिवाय मे २०२१ मध्ये ४.३९ कोटी लसमात्रा राज्य सरकारे, तसेच खाजगी रुग्णालयांच्या थेट खरेदीसाठी देखील उपलब्ध होत्या.
गेल्या २४ तासात ३ लाखांहून अधिक करोनारुग्ण ठणठणीत
गेल्या २४ तासात ३,४३,१११ नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी ७२.३७ टक्के रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 42,582 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर केरळमध्ये ३९,९५५ तर कर्नाटकमध्ये ३५,२९७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर करोना प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रा १८ कोटीच्या जवळ पोहोचल्या आहेत. गेल्या २४ तासात २० लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
भारतात कोरोना मुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने आज दोन कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ८३.५० टक्के आहे. गेल्या २४ तासात ३,४४,७५६ रुग्ण बरे झाले. गेल्या चार दिवसात सलग तिसऱ्यांदा, बरे झालेल्यांची संख्या ही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त आहे. भारतातली उपचाराधीन रुग्ण संख्या आज ३७,०४,८९३ पर्यंत घटली आहे. ही संख्या देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या १५.४१ टक्के आहे. गेल्या २४ तासात उपचाराधीन रुग्ण संख्येत ने घट झाली आहे. देशातल्या उपचाराधीन रुग्णांपैकी ७९.९ टक्के रुग्ण १२ राज्यात आहेत. राष्ट्रीय मृत्यू दर सध्या १.०९ टक्के आहे. गेल्या २४ तासात ४००० रुग्णांचा मृत्यू झाला यापैकी मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ८५० जणांचा मृत्यू झाला, कर्नाटक मध्ये ३४४ जणांचा मृत्यू झाला.