पुणे : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना पुणे महानगरपालिका सक्षमपणे करत असून तज्ञांची मते लक्षात घेता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्जता ठेवण्यास प्राधान्य देत आहोत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसारच लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि त्यांच्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बालरोग तज्ञांची महत्वाची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यात तज्ञांची सर्वांगीण मते जाणून घेत लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत ५३ बालरोग तज्ञ सहभागी झाले होते. यावेळी महापौर कार्यालयातून माझ्या सोबत उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह नगसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले की, पुण्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मात्र असे सकारात्मक चित्र असले, तरी कोणतीही गाफीलता आपण ठेवणार नाहीत. तसेच देशभरात तिसऱ्याला लाटेसंदर्भात तज्ञांची विविध मते समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच आपण लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि लहान मुलांमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष भर देत आहोत. याचा पहिला टप्पा म्हणजे पुणे महानगरपालिका येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात अद्ययावत सुविधांचे चाईल्ड कोविड केअर रुग्णालय सुरू करत आहे. तसेच दुर्दैवाने लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला, तर आपली पूर्णपणे तयारी असावी. या दृष्टिकोनातून टास्क फोर्स विशेष जबाबदारी भूमिका निभावणार आहे.