नाशिक : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक भागांत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अशामध्ये आता नाशिक शहरातही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नाशिक शहरातील चिंताजनक आकडेवारी पाहता दि. १२ मेपासून २२ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. १० दिवस असलेल्या या लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद राहतील. हॉस्पिटल आणि मेडिकल सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त जाधव यांनी सांगितले की, "१२ मेपासून शहरात १० दिवसांसाठी कडक लॉकडाउन केले जाणार आहे. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता कडक लॉकडाउनची सुरूवात होईल. त्यानंतर २२ मे रोजी दुपारी १२ वाजता लॉकडाउनची मुदत संपेल. या कालावधीत सर्व सेवा आणि दुकाने बंद राहणार असून, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. या काळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही" तसेच, 'नाशिक बाजार' या अॅपवरूनही नागरिकांना भाजीपाला, दूध, औषधे यांची खरेदी करता येईल, असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.