कोरोना महामारीच्या संकटाबरोबरच उष्णतेच्या झळांनी अवघा महाराष्ट्र पोळून निघतोय. त्यातच शहरांपासून गावखेड्यांपर्यंत पाणीटंचाईचे संकटही गडद होताना दिसते. या पाणीटंचाईवर ‘स्टेपवेल्स’ अर्थात बारव पुनरुज्जीवित करणे हा एक दीर्घकालीन पर्याय ठरु शकतोे. हेच उद्दिष्ट दृष्टिक्षेपात घेत रोहन काळे आणि मनोज सिनकर या खरंतर दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील कामांचा अनुभव असलेल्या तरुणांनी हाती घेतली ‘महाराष्ट्र बारव मोहीम.’ तेव्हा, कालच साजरा झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या राज्याला जलस्वयंपूर्ण करण्याची क्षमता असलेल्या या आगळ्यावेगळ्या मोहिमेविषयी...
भारतात अगदी पुरातन काळापासून एक कार्यक्षम जलव्यवस्थापन यंत्रणेेेचे पुरावे आजही आढळतात. आपल्या देशात अगदी रखरखीत प्रदेशातील ऐतिहासिक जलसंधारण व पुरवठा व्यवस्था या वस्तुस्थितीची साक्ष देते. तथापि, विकासाच्या बदललेल्या कल्पनांमुळे अनेक शतकांपासून काही लोकोपयोगी रचना कालौघात निरुपयोगी ठरल्या आणि आज त्या तशाच अडगळीत पडून आहेत. अशा वेळी जेव्हा देशातील बर्याच भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत असताना, हे अमूल्य जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यावर जोर देणे गरजेचे वाटते.
लोकांची पिण्यासाठी, आंघोळीसाठी, धुणीभांड्यांसाठी आणि कधीकधी सिंचनासाठी देखील पाण्याची गरज भागविणारी ‘स्टेपवेल’ ही निःसंशयपणे अशीच एक व्यवस्था आहे. महाराष्ट्र राज्यात हजारो ‘स्टेपवेल’ आहेत आणि जर त्यांचे पुनरुज्जीवन केले, तर ते ग्रामीण भागातील लोकांसाठी, पाण्याचे उत्कृष्ट स्रोत ठरु शकतात. याची पहिली पायरी म्हणजे, राज्यातील सर्व ‘स्टेपवेल्स’चे नकाशे आणि दस्तावेजीकरण करणे.हेच ध्येय लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक ‘स्टेपवेल्स’च्या शोधात निघालो. मी तसा मुंबईकर. महाराष्ट्रात १४ हजार किमी अंतरावर माझ्या दुचाकीवरून मी प्रवास केला आणि वैयक्तिकपणे ४००‘स्टेपवेल्स’ पाहिले आणि त्यांना महाराष्ट्र ‘स्टेपवेल’च्या नकाशावर मॅप केले. या दरम्यान मी विविध जिल्ह्यांतील स्थानिक, ऐतिहासिक वारसाप्रेमींना आणि इतिहासकारांनाही भेटलो आणि या ‘स्टेपवेल’ मोहिमेबद्दल त्यांना समजावून सांगितले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून मला या मोहिमेसाठी मोठा पाठिंबा आणि सहभाग लाभला.
दरम्यान, लोणावळा येथील माझा मित्र मनोज सिनकर ज्याच्यासोबत मी ही मोहीम सुरू केली, त्याने जवळपास पुणे, अहमदनगर आणि रायगड (पनवेल, कर्जत) या भागात फिरून ८०-१०० ‘स्टेपवेल्स’ प्रत्यक्षात नोंदवले. गेल्या दोन-तीन वर्षांत आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्रभर १०० बारव पाहिल्या आणि त्यांची दुरवस्था बघून खूप वाईट वाटले. तेव्हा या दुर्लक्षित ‘स्टेपवेल्स’चे जतन-संवर्धन व्हावे, या उद्देशाने आम्ही दोघांनी ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ उभी केली आणि आपल्या बारव/कुंड/पुष्करणी/पोखरणचे योग्य लोकेशन गुगल नकाशावर मॅप करायला लागलो. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या सक्रिय सहभागाने आम्ही आतापर्यंत ‘महाराष्ट्र बारव मोहिमे’अंतर्गत महाराष्ट्रातील एक हजारांहून जास्त बारव/घोडबाव/ बावडी/पुष्करणी/पोखरण/कुंड/पायविहीर/हेलिकॅल ‘स्टेपवेल’ यांचे गुगलच्या नकाशावर मॅपिंग केले आहे आणि त्या संकेतस्थळांची माहिती आमच्या www.indianstepwells.com वर आपण पाहू शकता.
कुठे आढळतात या ‘स्टेपवेल्स’?
व्यापारी मार्गावर, घाटवाटामध्ये, प्राचीन शिव मंदिराच्या परिसरात, गावातील ग्रामदैवत मंदिराच्या परिसरात, ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक मंदिराच्या परिसरात, जुन्या वाड्यात, समाधीच्या बाजूला, यात्रा मार्गावर, दुष्काळी भागात प्रत्येक गावाची किमान एक बारव होती.
आमचा असा अंदाज आहे की, महाराष्ट्रात २० ते २५ हजारांदरम्यान ‘स्टेपवेल्स’ आहेत, जी संख्या गुजरात आणि राजस्थानमधील ‘स्टेपवेल्स’पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. या ‘स्टेपवेल्स’ यादव, शिवकालीन, पेशवेकालीन, होळकर या वेगवेगळ्या राजवंशांमध्ये बांधल्या गेल्या. मराठवाड्यात यादवांनी बांधलेल्या ‘स्टेपवेल्स’ मोठ्या प्रमाणात आढळतात. पश्चिम महाराष्ट्रातील ‘स्टेपवेल्स’ अनेकदा मराठा राजवटीत बांधल्या गेल्या आहेत आणि शिवपिंडीच्या रूपात आहेत. उत्तर महाराष्ट्रात महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या ‘स्टेपवेल’ची चांगली संख्या आहे. कोकणात चिरा दगडात कोरलेल्या ‘नंदा स्टेपवेल्स’, त्या भागात त्याला ‘घोडबाव’ असं म्हणतात. या घोडबाव प्रचंड संख्येत आढळतात आणि त्यांची जलधारण क्षमताही जास्त आहे.
खरंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात बारवसाठी काही स्थानिक शब्द आहेत: जसे की कोकणात ‘घोडबाव’, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात ‘बारव’, नागपूर आणि औरंगाबादमध्ये ‘बावडी.’वर्गीकरण करता, आपल्याकडे चार प्रकारच्या बारव आढळतात.
नंदा बारव : एक बाजूने प्रवेशद्वार
भद्रा बारव : दोन बाजूने प्रवेशद्वार
जया बारव : तीन बाजूने प्रवेशद्वार
विजया बारव : चार बाजूंनी प्रवेशद्वार
महाराष्ट्रामध्ये ‘नंदा बारव’ सर्वाधिक आढळतात. त्यामध्ये देखील वेगवेगळे आकार निदर्शनास येतात. शिवपिंडीच्या आकाराच्या आणि इंग्लिश मधल्या ‘एल’ आकाराच्या बारव बहुदा आढळतात. पण, ‘झेड’ आकाराच्या बारव दुर्मीळ आहेत. विहिरीचे आकार हे वर्तुळाकार, आयताकृती, चौरस, षट्कोनी, अष्टकोनी असतात. ‘नंदा बारव’ दगड किंवा विटांनी बांधल्या आहेत. काहींमध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला कमान, देवळ्या आढळून येतात. काही भागात विहिरीमध्ये विश्रांतीसाठी खोलीदेखील तयार केलेली दिसून येते. त्या तुलनेत ‘भद्रा बारव’ खूप कमी आढळतात.‘पुष्करणी’ आणि ‘पोखरण’ या हिंदू मंदिरांच्या परिसरात बांधलेल्या पवित्र पाण्याच्या टाक्याही तितक्याच लक्षवेधी ठरतात. तसेच ‘हेलिकॅल स्टेपवेल’ या गोल विहिरी असतात, ज्यांना आतमधून तळापर्यंत जाण्यासाठी पायर्या असतात.
‘महाराष्ट्र बारव मोहिमे’चे ध्येय
संशोधन आणि संवर्धनाच्या उद्देशाने भारतातील ‘स्टेपवेल’चा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह ‘डेटाबेस’ तयार करणे, हे या मोहिमेचे प्रमुख ध्येय आहे. तसेच हजारो ‘स्टेपवेल्स’ ‘जीपीएस’ स्थळ कॅप्चर करून त्यांना ‘गुगल मॅप’वर मॅप करत आहोत. ‘स्टेपवेल’चे छायाचित्र/‘ड्रोन शॉट्स’देखील कॅप्चर करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच श्रमदानातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करणे आणि जतन-संवर्धन करण्याचे कामदेखील आम्ही आवर्जून करतो. ग्रामस्थांना/स्थानिक ऐतिहासिक वारसाप्रेमींनादेखील पर्यटकांचे आकर्षण म्हणून अनुप ‘स्टेपवेल्स’ ओळखण्यासाठी प्रोत्साहित करणे, हादेखील या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणता येईल. पण, ‘स्टेपवेल’च्या ‘आर्किटेक्चरल डिझाईन’च्या अभ्यासासाठी महाविद्यालयीन पातळीवर सहयोगदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यास दौरा आयोजित करण्याचे ध्येयही आम्ही निर्धारीत केले आहे.ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि पर्यटन विकासाचा दृष्टिकोनही या मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरावे. तसेच पाण्याचा वापर दुष्काळकाळात सिंचनाच्या उद्देशाने केला जाऊ शकतो. त्याचबरोबर व्यापार मार्गावर ‘स्टेपवेल’ तयार केल्यामुळे प्राचीन व्यापार मार्गांचा अभ्यासदेखील केला जाऊ शकतो.ही मोहीम अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्रात ‘स्टेपवेल महोत्सव’ आम्ही साजरा करणार आहोत. त्या अंतर्गत आपल्या ऐतिहासिक ‘स्टेपवेल्स’ एकाच रात्री दिव्यांनी सजवण्याचे उद्दिष्ट आहे.तेव्हा चला तर मग आपल्या अमूल्य ‘स्टेपवेल’चे पुनरुज्जीवन व संवर्धन करण्यासाठी एकत्र येऊ या.
- रोहन काळे