चीनचा तीळपापड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2021   
Total Views |

China_1  H x W:
फ्रान्ससह ‘क्वाड’ गटांतील अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया व जपान या सदस्य देशांमध्ये सोमवारपासून हिंदी महासागरात ‘ला पेरोझ’ नावाने नौदलाच्या सागरी युद्ध कवायती आयोजित करण्यात आल्या होत्या. तीन दिवस चालणाऱ्या नौदलाच्या सागरी युद्ध कवायती बुधवारी संपल्या. मात्र, त्यामुळे आपला शेजारी देश चीनचा चांगलाच तीळपापड झाला. चीनने नौदलाच्या ‘ला पेरोझ’ सागरी युद्ध कवायतींवर व्यक्त केलेले मत कोणत्याही परिस्थितीत योग्य म्हणता येणार नाही, असेच आहे. “विविध देशांतील युद्ध कवायती अथवा सहकार्य प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी अनुकूल असायला हव्यात,” अशी प्रतिक्रिया चीनने नौदलाच्या सागरी युद्ध कवायतींवर दिली. अर्थात, ‘क्वाड’ गटातील सदस्य देशांच्या युद्ध कवायती किंवा सहकार्यामुळे प्रादेशिक शांततेचा भंग होतो आणि त्या स्थैर्यासाठी प्रतिकूल आहेत, असे चीनला यातून सांगायचे आहे. मात्र, चीनच्या या प्रतिक्रियेतून अन्य देशांचे परराष्ट्र धोरणही आता चीनच ठरवणार का? किंवा अन्य देशांनी आपले परराष्ट्र धोरणही चीनच्या कलाने राबवायचे का? असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचे उत्तर ‘नाही’ असेच असेल. म्हणूनच तर ‘क्वाड’ गटांतील सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या आभासी शिखर परिषदेआधी व नंतर चीनने केलेल्या आगपाखडीकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. आताही नौदलाच्या युद्ध कवायतींवरील चिनी प्रतिक्रियेकडे फारशा गांभीर्याने पाहिले जाणार नाही, असे वाटते.
 
 
 
दरम्यान, चीन फक्त ‘क्वाड’ सदस्य देशांच्या सागरी युद्ध कवायतींवर प्रतिक्रिया देऊनच थांबला नाही, तर चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी आगामी आठवड्यात होणाऱ्या अमेरिका-जपान शिखर परिषदेवरून जपानला सावधगिरीचा इशाराही दिला. अमेरिका आणि जपानमधील संबंध दृढ व्हावेत किंवा त्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे चीनला वाटत नाही, म्हणूनच दोन्ही देशांच्या संबंधांत दुरावा यावा यासाठी चीन कार्यरत असतो आणि आताचा त्याचा इशारा त्याचाच एक भाग आहे. दरम्यान, हिंदी महासागरात आयोजित केलेल्या नौदलाच्या सागरी युद्ध कवायतींत, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपानव्यतिरिक्त फ्रान्सनेही सहभाग घेतला होता. नौदलाच्या ‘ला पेरोझ’ सागरी युद्ध कवायतींत फ्रान्सने सहभाग घेणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण, भारताने फ्रान्सकडून ‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदी केलेली आहेत. ‘राफेल’ लढाऊ विमानांचा भारतीय हवाईदलात समावेश करण्यात आल्याने भारतीय हवाईदलाच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्सने आणखी दोन ‘राफेल’ लढाऊ विमाने भारताला सोपवली होती. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या ‘ला पेरोझ’ युद्ध कवायतीत फ्रान्सने सहभाग घेणे कुठे ना कुठे दोन्ही देशांतील बळकट संबंधच दाखवते.
 
 
 
दरम्यान, भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांच्या मते, नौदलाच्या ‘ला पेरोझ’ युद्ध कवायती मित्रदेशांच्या लष्करात उत्तम आणि उच्चस्तरीय ताळमेळ स्थापित करतील. सोबतच त्यातून ‘क्वाड’ देशांच्या सामायिक मूल्यांचेही दर्शन घडते. या युद्ध कवायतींत भारतीय नौदलाच्या ‘सातपुडा’, ‘किल्टन’ आणि ‘पी-८आय’ विमानांनी सहभाग घेतला होता. आतापर्यंतच्या घडामोडींनुसार चीन दक्षिण चीन समुद्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितो. मात्र, दक्षिण चीन समुद्रावर व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, ब्रुनेई, तैवानदेखील आपला अधिकार सांगतात. तथापि, दक्षिण चीन समुद्रावरील वर्चस्वप्राप्तीसाठी चीन सातत्याने आक्रमक भूमिका घेत आला. कारण, दक्षिण समुद्रावर केवळ आपलीच एकाधिकारशाही चालावी, असे चीनला वाटते. त्यासाठी चीनने दक्षिण चीन समुद्रातील काही बेटांवर आपले लष्करी तळही वसवले आहेत. कितीतरी अन्य बेटांवरही त्याचे पायाभूत सोयी-सुविधा आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाची निर्मिती कार्ये सुरू आहेत. चीन सातत्याने या क्षेत्रात येणाऱ्या अन्य देशांच्या जहाजांना धमक्याही देत असतो. परिणामी, अशा प्रकारच्या भूमिकेवरून चीनचा अमेरिकेशीही आमना-सामना झालेला आहे. दक्षिण चीन समुद्रावरील वर्चस्व आणि अधिकारावरून तिखट शब्दांत प्रतिक्रियाही आल्या आहेत. दुसरीकडे चीनला असे वाटते की, ‘क्वाड’ गटाचे साहचर्य केवळ आपल्याला रोखण्यासाठी वाढत आहे. हिंदी महासागरात आयोजित केलेल्या नौदलाच्या सागरी युद्ध कवायतींवरील चीनची प्रतिक्रिया तीच भीती दर्शवते. पण, भारत मात्र अशा कवायतींना आपली सागरी व लष्करी क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक मानतो.
 
 
@@AUTHORINFO_V1@@