मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) लाल यादीमध्ये प्रथमच काजव्याच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेतील डेलाॅवर प्रांतामध्ये आढळणाऱ्या मस्टिरियस लॅंटर्न फायरफ्लाय प्रजाताचे अधिवास क्षेत्र संकटात सापडले आहे. त्यामुळे तिचा समावेश 'आययूसीएन'च्या लाल यादीत 'संकटग्रस्त' (इनडेंजर) प्रजातींमध्ये करण्यात आले आहे.
रात्रीच्या अंधरात चमकणारे काजवे हे आपल्या सगळ्यानाच आकर्षित करतात. मात्र, हवामान बदलाच्या फटक्याने लोप पावत जाणारा अधिवास त्यांच्या मुळावर उठला आहे. अमेरिकेतील डेलाॅवर प्रातांमध्ये मिस्टीरियस लँटर्न फायरफ्लाय ही काजव्याची एक प्रजाती सापडते. या भूप्रदेशाला ती प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजे जगात केवळ याच भूप्रदेशात ती आढळते. लॅटिनमधील “मिस्टिक” आणि 'लॅम्पस' या शब्दापासून या प्रजातीला नाव मिळाले आहे. 'मिस्टिक' म्हणजे गूढ आणि 'लॅम्पस' म्हणजे दिवा किंवा कंदील. सूर्यास्तानंतर शैवाळाच्या ठिकाणाहून या प्रजातीमधील प्रौढ हे बाहेर पडतात.
मिस्टीरियस लँटर्न फायरफ्लाय ही प्रजात डेलमार्वा परिसरातील पाणलोट क्षेत्रामध्येच अधिवास करते. समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीपासून या अधिवासाला धोका आहे. येथे समुद्राच्या वाढत्या पातळीचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा तीन किंवा चार पट जास्त आहे. त्यामध्ये २१०० सालापर्यंत ते ०.५ ते १.५ मीटरच्या दरम्यान वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्याच्या समुद्रसपाटीपासून एक मीटर उंच अंतरावर असलेल्या बहुतेक मिस्टीरियस लँटर्न फायरफ्लायच्या अधिवासांचा नाश होईल. शिवाय या प्रजातींचा अधिवास हा संरक्षित नसून तो नागरी सार्वजनिक जागांवर आहे.