“भारतीय रेल्वे ही देशाची संपत्ती आहे व तिचे खासगीकरण कदापि होणार नाही,” असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतेच जाहीर केले. मात्र, प्रभावी कारभारासाठी रेल्वेनेही खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यानिमित्ताने भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावयास हवा. मुख्य म्हणजे, भारतातील किती ठिकाणी रेल्वे पोहोचली आहे, तिचा वेग किती आहे, ही रेल्वे प्रवाशांना व सामान नेण्यासाठी उपयोगी ठरते का, प्रवासात काय सुखसोयी पुरविल्या जातात, रेल्वे कोणते इंधन वापरते व आपले रेल्वेचे जाळे शेजारील देशांशी जोडले आहे काय? ज्या ठिकाणी म्हणजे शहरातील अंतस्थ ठिकाणी हल्ली मेट्रो रेल्वे पोहोचते. त्याचे कारण म्हणजे, मेट्रो रेल्वेचे बांधकाम लवकर पूर्ण होते, खर्च कमी येतो व नागरिकांच्या अगदी घराजवळ (अर्धा ते एक किमी अंतरापर्यंत) सोयीनुसार घराजवळ मेट्रोची स्थानके असतात. आता वळूया रेल्वेच्या प्रगतीच्या आलेखाकडे. सर्वप्रथम कौतुकास्पद बाब म्हणजे, भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. दि. ३१ मार्च, २०२० पर्यंत रेल्वेने ६४ हजार ८८१ किमी रेल्वेमार्गांपैकी ४५ हजार ८८१ किमी (७१ टक्के) विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित विद्युतीकरणाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. याकरिता रेल्वेकडून सौरऊर्जा वापराचे उद्दिष्टही निर्धारित करण्यात आले आहे. ही घोषणा ‘मेरीटाईम इंडिया समीट २०२१’च्या दरम्यान करण्यात आली. याकरिता २०२२ मध्ये १७५ गिगाव्हॅट अक्षयऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निश्चित केले आहे.
उपनगरीय रेल्वेचा विकास
मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला व ‘लॉकडाऊन’च्या काळात मुंबई उपनगरीय रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. परिणामी, मध्य व उपनगरीय रेल्वेचे एकूण १,३३९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. पण, तरीही मुंबई उपननगरीय रेल्वेचा विकास काही थांबलेला नाही. मुंबईकरांचा उपनगरीय रेल्वे प्रवास आता उत्तम, आरामदायी व सुसह्य होण्यासाठी रेल्वेने नवीन डब्यांची संरचना केली आहे. आसनव्यवस्थेत प्रवाशांच्या मागणीनुसार बसल्यावर पाठीला आधार मिळावा, यासाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. तसेच वातानुकूलित डब्यांच्या धर्तीवर साखळीऐवजी आता बटण ठेवण्यात आले आहे. बटण दाबून आपत्कालीन वेळेत लोकल थांबविणे शक्य होईल. मध्य व पश्चिम लोकल विभागात एक-एक लोकलच्या १०-१२ फेर्या होत आहे. प्रवाशांचाही या सेवांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मोटरमनच्या हालचालीवर कॅबमधील यंत्रणेमुळे लक्ष ठेवता येईल. मोटरमन कॅबकरिता वातानुकूलित यंत्रणेची सुविधा पण असेल.
गारेगार प्रवासाला वाढती पसंती
दि. १७ डिसेंबर, २०२० ते १७ मार्च, २०२१पर्यंत ‘एसी’ लोकलमधून तब्बल १५ हजार ८६१ प्रवाशांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशाच काही इतर महत्त्वाच्या बदलांचा आढावा घेऊया.
>मोटरमनशी नव्हे, पण बहुपरीक्षित गार्डबरोबर ‘टॉकबॅक’ची यंत्रणा.
> खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या मागणीनुसार ठाण्यातील रेल्वे हद्दीत फुलले फुलांचे ताटवे.
> रेल्वे परिसरात गुन्हेगारांवर ‘ड्रोन’ची नजर ठेवण्याचे ठरले आहे. रूळ ओलांडण्यावर त्यामुळे वचक राहील.
> पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २४ लोकल फेर्या लवकरच सुरू होणार आहेत.
> मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर गाड्यांची संख्या वाढवायचे ठरविले आहे.
> ठाणे-दिवा मार्ग-पाच व सहा काम लवकरच सुरू होणार.
> पनवेल ते कर्जत रेल कॉरिडोरचे काम लवकरच सुरू होणार.
रेल्वे फाटक बंद होण्याच्या कामी दिवा, कळवा, आंबिवली स्थानकातील कामांना मात्र दिरंगाई होताना दिसते. त्यामुळे रेल्वेने या कामांवर अधिक लक्ष द्यावयाचे ठरविले आहे. कारण, या फाटकांचा उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे.
स्थानकांमध्ये सुधारणा
विस्तारित ठाणे स्थानकाचे रुपांतर ‘स्मार्ट’ स्थानकात होणार आहे. मनोरुग्णालयाच्या जागेवर हा प्रकल्प पार पडणार आहे. बाधित होणार्या या तीन इमारतींचे बांधकाम ठाणे पालिकेतर्फे हाती घेतले जाणार आहे. ‘सीएसएमटी’ स्थानकात आणखीन सुधारणा होणार असून यामध्ये सुविधायुक्त प्रतीक्षालये, बाहेरच्या बाजूला वाहनतळ, बाके, लाद्या व पादचार्यांकरिता अनेक सोयी आगामी काळात दिसून येतील. तसेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या या स्थानकाचा ‘हरित’ विकास होणार असून त्यामुळे स्थानकाच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. तसेच ‘सीएसएमटी’ व ‘एलटीटी’ स्थानकात ‘अॅप’आधारित बससेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. उपनगरी गाड्यांमधील तांत्रिक बिघाडांची (पावसाळ्यात रुळावर पाणी साचते वा अन्य काही बिघाड होतात) प्रवाशांना यापुढे अचूक माहिती मिळणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने मोबाईल ‘ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांवर प्रवाशांच्या सोयींसाठी डिजिटल नकाशांची सुविधाही उपलब्ध होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेची १९ स्थानके विकसित (जास्त मोकळ्या जागा, नवीन पादचारी पूल, अधिक सरकते जिने, स्कायवॉक, तिकीट खिडक्या, खाद्यपदार्थ रचनेत बदल, उन्नत डेक, अधिक दिवे बसविणार) करणार. मध्य रेल्वेवर (भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा); हार्बर मार्गावर (जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द); पश्चिम रेल्वेवर (मुंबई सेंट्रल, खार रोड, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा)ही स्थानके विकसित करण्यात येणार आहेत.
> जोगेश्वरी टर्मिनसचे व वांद्रे टर्मिनसचे काम लवकर पार पाडणार.
> येत्या दोन महिन्यांत नऊ स्थानकांत चार्जिंग स्टेशनची सुविधा पुरविणार.
> मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांत ‘एलईडी’ दिवे बसविणार.
> फलाट तिकीट ५० रुपये व वायफायसाठी ३० मिनिटे वापरानंतर शुल्क भरावे लागणार.
> रेल्वे बुकस्टॉल बंद होणार व सीलबंद खाद्यपदार्थ विक्रीस येणार.
> अंधेरी स्थानकावरील सर्व स्टॉल स्थलांतरित करणार व प्रवाशांना वावरण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होणार
> सरकार ९० स्थानकांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे.
१६८ वर्षांची भारतीय रेल्वे
भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या मार्गावर दि. १६ एप्रिल, १८५३ रोजी धावली होती. त्यावेळच्या ठाणे स्थानकाला आता वारसास्थळ म्हणून मानांकनही मिळाले आहे. तसेच गेल्या तीन-चार वर्षांपासून ऐतिहासिक ठाणे स्थानक व परिसराचा कायापालट करण्याचा विचार सुरू आहे.
लांबपल्ल्याच्या गाड्यांमधील सुधारणा
कोरोनाच्या भयास्तव लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये पायाने वापरता येईल व हातांचा स्पर्श करावा लागणार नाही, असे बदल वॉशबेसीन व शौचायलामध्ये करण्यात आले आहेत. हवेतील जंतूंची कमी वाढ व्हावी म्हणून‘ एअर प्युरिफायर’च्या ट्रॅकमध्ये देखील बदल करण्यात आहेत. ‘टिटॅनियम डायॉक्साईड’च्या वापरातून विषाणू व जीवाणू मरून पडतात. पण, प्रवाशांना काहीच त्रास होणार नाही.
> मुंबई ते नागपूर ७३६ किमी मार्गाकरिता ‘एरिअल लिडार’ सर्वेक्षण होणार.
> बॅगा ठेवण्यासाठी फायबरच्या रॅकची व्यवस्था करण्यात आली आहे.
> १११ वर्षांचा जुना माथेरान मार्ग पर्यटकांकरिता पुन्हा सुरू. ‘फ्युनिक्युलर’ रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
> भारत-बांगलादेश रेल्वे सुरू करण्याचा निर्णय. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडून प्रशंसा केली गेली.
> अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी रु. ७,८९७ कोटींची तरतूद. या प्रकल्पार खारफुटीना जीवदान.
> पुणे-नाशिक रेल्वे प्रवास दोन तासांत करण्याची योजना.
> मुंबई-पुणे रेल्वे मार्गाचे दुरुस्तीकरण पूर्ण. हा रेल्वे प्रवास आणखी आरामदायी व वेगवान होणार. >‘डेक्कन एक्स्प्रेस’ व ‘डेक्कन क्वीन’ या गाड्यांचा कायापालट होणार.
> लांबपल्ल्याच्या ‘मेमू’ गाड्या (सुरत-विरार, डहाणू-बोरिवली, विरार-डहाणू, विरार-भरुच, बोरिवली-वलसाड) ७ एप्रिलपासून सुरू होणार.
विनातिकीट प्रवाशांची रेल्वेला डोकेदुखी झाली आहे. तसेच अनेक प्रवासी मुखपट्टीविना जात आहेत. त्याकरिता ३६ लाखांचा दंड वसूल केला गेला. मध्य रेल्वेवर विनातिकीट १५ जून, २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत प्रवास करणार्या साडेतीन लाख प्रवाशांवर कारवाई करून सुमारे पाच कोटी रुपये दंडवसुली केली. अशा तर्हेने भारतीय रेल्वेचा विकास वाखाणण्यासारखा होत आहे. प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे व विनातिकीट व बेकायदा प्रवास करू नये.