सह्याद्रीमधून बांबूच्या नव्या प्रजातीचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2021   
Total Views |
bamboo_1  H x W




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्रीमधून बांबूच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. बांबूंच्या 'मेस' आणि 'मणगा' या दोन प्रजातींना आजतागायत वनस्पतीशास्त्रानुसार 'स्टुडोक्सिटेननथेरा स्टाॅक्सि' या नावानेच ओळखले जात होते. मात्र, संशोधनाअंती या दोन्ही प्रजात वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या वेगवेगळ्या असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे 'मेस' या बांबू प्रजातीचे नामकरण आता 'स्टुडोक्सिटेननथेरा माधवी' असे करण्यात आले आहे.
 
 
 
 
पश्चिम घाट आणि विदर्भ हा बांबू उत्पादनाच्या अनुषंगाने महत्त्वाचा भूप्रदेश आहे. त्यातही सह्याद्रीत बांबू प्रजातींमध्ये विविधता आढळते. महाराष्ट्रात बांबूला व्यावासायिक महत्त्व असून त्यावर प्रामुख्याने शेतकरी आणि कामगार वर्गाची उपजीविका अवलंबून आहे. महाराष्ट्रात साधारण बांबूच्या १० प्रजाती आढळतात. यामधील 'स्टुडोक्सिटेननथेरा' कुळातील नव्या प्रजातीचे वर्गीकरणात्मक संशोधन आता समोर आले आहे. डाॅ. पी तेताली, सुजाता तेताली, मदार दातार, रितेशकुमार चौधरी, सारंग बोकील आणि डॉ. ई.एम.मुरलीधरन यांनी या नव्या बांबू प्रजातीबद्दल संशोधन केले आहे. न्यूझीलंडच्या नामांकित जर्नल 'फायटोटाक्सा'मध्ये यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. पर्यावरणतज्ज्ञ डाॅ. माधव गाडगीळ यांच्या नावाने बांबूच्या या नव्या प्रजातीचे नामकरण 'स्टुडोक्सिटेननथेरा माधवी' असे करण्यात आले आहे.
 
 
 
 
पावसाळ्यातील हंगाम हा बांबूच्या अभ्यासाकरिता महत्त्वाचा कालावधी असतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये बांबूविषयी फारसा अभ्यास झालेला नाही. याची प्रचिती म्हणजे राज्यातील पश्चिम घाटामध्ये म्हणजेच सह्याद्रीमध्ये आढळणाऱ्या 'मेस' आणि 'मणगा' या बांबू प्रजातींना वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या एकच प्रजाती मानले जात होते. त्यांची 'स्टुडोक्सिटेननथेरा स्टाॅक्सि' या नावानेच ओळख होती. मात्र, डाॅ. पी तेताली यांनी गेल्या काही वर्षांमध्ये 'मेस' आणि 'मणगा' या प्रजातींचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. बांबूंच्या फुलांचा हंगाम हा दुर्मीळ मानला जातो. पानशेत जवळील शिरकोली येथे डाॅ. तेताली यांना 'मेस' आणि 'मणगा' या दोन्ही प्रजातींवर आलेला फुलोरा पाहावयास मिळाला. त्यामुळे फुलांच्या निरीक्षणानंतर या दोन्ही प्रजाती वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या वेगवेगळ्या असल्याचे आम्हाला संशोधनाअंती समजल्याचे मंदार दातार यांनी सांगितले.
 
 
 
नव्या प्रजातीविषयी...
 
 
'स्टुडोक्सिटेननथेरा माधवी' ही बांबूची नवी प्रजात व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याची माहिती डाॅ. पी तेताली यांनी दिली. ही प्रजात प्रामुख्याने पश्चिम घाटामध्ये आढळते. या भूप्रदेशात सर्वात जास्त उत्पादन या प्रजातीचे होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा बांबू साधारण २५ फूटांपेक्षा मोठा वाढत असल्याने आणि मजबूत असल्याने बांधकाम आणि फर्निचर तयार करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जात असल्याचे तेतालींनी नमूद केले.

@@AUTHORINFO_V1@@