मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. दौर्याचा मुख्य उद्देश त्या त्या राज्यातील बँकांच्या कामकाजाचा अभ्यास करणे व तेथील असोसिएशनमार्फत संचालकांशी संवाद साधणे, असा होता. बँकांच्या भेटीनंतर उरलेल्या वेळेत स्थलदर्शनास जाण्यासाठी निघाल्यानंतर मध्ये भरपूर वेळ मिळत असे. अशा वेळेस आबासाहेब एखादा विषय घेऊन, दौर्यात सामील झालेल्या संचालकांचे अतिशय उत्तम रीतीने प्रबोधन करीत असत.
-
मी लहान असताना म्हणजे सुमारे १९५५-१९५६च्या सुमारास छत्रपती संघस्थानावर सायंशाखेत जात असे. शिशू आणि बाल या दोन्ही वर्गांमध्ये आबासाहेब मला शिक्षक म्हणून लाभले आणि तिथेच त्यांची आणि माझी पहिली ओळख झाली. त्यावेळेस सर्वश्री बाळू आणि बंडू कुलकर्णी हे दाजी कुलकर्णी यांचे दोन्ही पुत्र आम्हाला ‘पार्वती सदन’मधून घेऊन जात असत. सर्वश्री मधू जोशी, शरद भावे, तुळपुळे, तळेकर असे अनेक शिक्षक मला लाभले. पण, आबासाहेब हे स्मृतिपटलावर कायम लक्षात राहिले. तुळपुळे आणि आबासाहेब हे आम्हाला निरनिराळ्या गोष्टी सांगत असत. आता साल आठवत नाही, पण साधारण मी तिसरी किंवा चौथीमध्ये असताना संघाचे तीन दिवसांचे एक शिबीर ‘गोग्रासवाडी-डोंबिवली’ येथे संपन्न झाले होते.
तेथेही ते शिक्षक या नात्याने तिन्ही दिवस पूर्णवेळ हजर होते. पुढे आबासाहेब डोंबिवली येथे वास्तव्यास गेल्यानंतर काही वर्षे भेटी कमी झाल्या. पण, जेव्हा भेट होत असे, तेव्हा ते आवर्जून घरातील सर्वांचे क्षेमकुशल विचारीत. आबासाहेबांची खरी ओळख ही नेता किंवा उच्च पदावरील प्रमुख यांच्याऐवज ‘कार्यकर्ता’ म्हणूनच अधिक आहे, असे मला वाटते. कारण, अत्यंत निरलसपणे, निःस्वार्थ बुद्धीने कार्य करणारे आणि म्हणूनच संघशिस्तीत बसणारे ते खरे स्वयंसेवक होते.
साधारणपणे १९६०-१९६१ सालापासून म्हणजे सातवी-आठवीमध्ये असल्यापासूनच मी वडिलांच्या व्यवसायात लुडबूड करावयास सुरुवात केली होती. म्हणून संघस्थानामध्ये जाणे जमत नसे. पण, दुकानात बसून काम करतो याचे त्यांना कौतुक होते. त्याकाळी श्री कौपिनेश्वर मंदिरात संघ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्याने श्री गणेशोत्सव साजरा केला जात असे. त्यामध्ये मंदिराच्या पटांगणात ताडपत्रीचा मांडव घालण्यापासून ते आरास करणे, रोज निरनिराळे प्रबोधनाचे कार्यक्रम करणे (त्यामध्ये एक नाटक असे).
रोज आरतीच्या वेळेस हजर राहणे व शेवटी गणपती विसर्जनाची मिरवणूक निघेपर्यंत सर्वच कार्यक्रमात आबासाहेबांची उपस्थिती असे आणि महत्त्वाचे म्हणजे, आबासाहेबांसारखे काही कार्यकर्ते मागे थांबत असत आणि आम्ही विसर्जनाची मिरवणूक संपवून परत येईपर्यंत मांडव काढण्याच्या कामात गुंतलेले असत व जवळ जवळ अर्ध्याच्या वर मांडव काढून मोकळे झालेले असत. त्यामध्ये बाळ नांदेडकर, अनंतराव बर्वे, आप्पा परांजपे, मोरे, नारायणराव कुलकर्णी (कॉन्ट्रॅक्टर) मेहेंदळे, गोगटे असे कितीतरी तरुण कार्यकर्ते असत. म्हणून हा कार्यक्रम जरी कौपिनेश्वर मंदिराच्या पटांगणात होत असला, तरी तो ‘संघाचा गणपती’ म्हणूनच ओळखला जात असे.
पुढे ‘ठाणे भारत सहकारी बँके’ची स्थापना डॉक्टर वा. ना. बेडेकर यांनी केल्यानंतर मी त्या बँकेच्या संचालक मंडळात कार्यरत झालो आणि त्याच सुमारास ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ आणि ‘कल्याण जनता सहकारी बँक’ यांच्या पुढाकाराने कोकणातील नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सहकार खाते आणि ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ यांच्याकडून सोडविण्यासाठी ‘कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशन’ची स्थापना ‘कल्याण जनता सहकारी बँके’चे स्थापनेपासूनचे संचालक आणि अध्यक्ष वामनराव साठे, ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’चे संस्थापक आणि अध्यक्ष बापूराव मोकाशी, आबासाहेब पटवारी, ‘गोरेगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके’चे अध्यक्ष राम दोशी वकील आणि श्याम भाई शेठ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकाराने झाली. तेव्हापासून मी पुन्हा आबासाहेबांच्या संपर्कात आलो आणि सहकारी बँकांविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ मला प्रकर्षाने जाणवली.
कोकणात त्यावेळी ३२ सहकारी बँका होत्या आणि सर्व बँका असोसिएशनच्या सभासद होत्या. त्यांना सभासद करून घेण्यामध्ये आबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळचे कोकण म्हणजे ठाणे, रायगड (कुलाबा) आणि रत्नागिरी असे तीनच जिल्हे होते. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा एक नवीन जिल्हा अस्तित्वात आला आणि दहा-बारा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा झाला व कोकणातील जिल्ह्यांची संख्या तीन वरून पाच झाली.
“आपण सत्तेची हाव सोडून दिली पाहिजे आणि सक्षम अशा नव्या पिढीला आणि नेतृत्वाला वाव दिला पाहिजे,” असा विचार ते नेहमीच बोलून दाखवत असत आणि मला वाटते, त्याप्रमाणे या असोसिएशनमधील सर्वच मान्यवर अशाच विचारांचे होते. २००२ साली मला असोसिएशनचे मानद सचिव पद प्राप्त झाले. त्यावेळी मी जवळ जवळ पूर्णवेळ असोसिएशनच्या कामात भाग घेत असे.
१९९३ मध्ये असोसिएशनने गुजरात राज्यातील सहकारी बँकांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यामध्ये ‘ठाणे भारत सहकारी बँके’तर्फे अध्यक्ष कै. मा. य. गोखले आणि मी सामील झालो होतो. पुढे मी सचिव झाल्यापासून निरनिराळ्या राज्यांतील सहकारी बँकांना भेटी देण्याच्या निमित्ताने अनेक अभ्यासदौर्यांचे आयोजन केले. त्यामध्ये किमान २५ ते ६५ संचालक सामील होत असत. महत्त्वाची विशेष बाब म्हणजे, आबासाहेब प्रत्येक दौर्यात आवर्जून हजेरी लावत असत.
मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. दौर्याचा मुख्य उद्देश त्या त्या राज्यातील बँकांच्या कामकाजाचा अभ्यास करणे व तेथील असोसिएशनमार्फत संचालकांशी संवाद साधणे, असा होता. बँकांच्या भेटीनंतर उरलेल्या वेळेत स्थलदर्शनास जाण्यासाठी निघाल्यानंतर मध्ये भरपूर वेळ मिळत असे. अशा वेळेस आबासाहेब एखादा विषय घेऊन, दौर्यात सामील झालेल्या संचालकांचे अतिशय उत्तम रीतीने प्रबोधन करीत असत.
आणीबाणीमध्ये १५ महिने तुरुंगात असताना अनुभवास आलेल्या अनेक गोष्टी ते सांगत असत. त्या कारागृहातील दिवसांत तेथे रूद्र शिकावयास मिळाल्याचे मी त्यांच्याकडून ऐकले होते. ते लक्षात ठेवून मी पुढे एका दौर्यामध्ये सामील होण्यापूर्वी तयारी करूनच निघालो होतो. दौर्यास सुरुवात झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी सकाळी बरोबर ५ वाजता उठून धोतर वगैरे नेसून व रुद्राची पोथी बरोबर घेऊन मी त्यांच्या खोलीवर गेलो. “मला आपल्याकडून रूद्र शिकण्याची इच्छा आहे,” असे सांगितले. ताबडतोब त्यांनी होकार दिला आणि मला समोर बसविले व रुद्राच्या पहिल्या अनुवाकाची संथा दिली. त्या दिवसापासून रोज सकाळ-संध्याकाळ सातही दिवस मी त्यांच्याकडून रुद्राची संथा घेतली व अशातर्हेने माझी रूद्र शिकण्याची इच्छा पूर्ण झाली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजप्रबोधनासाठी घरातील गणपती बाहेर आणून त्यास उत्सवाचे स्वरूप दिले, त्याचप्रमाणे आबासाहेबांनी मराठी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेचे आयोजन करून समाजाला पुन्हा जागे करण्याचा प्रयत्न केला आणि डोंबिवलीमध्ये तो यशस्वीही करून दाखविला. असोसिएशनच्या कामासाठी मी त्यांना अनेक वेळा भेटत असे. तसेच असोसिएशनच्या कार्यालयामध्ये कल्याणला आमच्या नेहमी चर्चा होत असत. त्यावेळेस त्यांनी “ठाण्यामध्ये तू पुढाकार घेऊन डोंबिवलीप्रमाणे शोभायात्रेचे आयोजन का करीत नाहीस?” असे विचारले.
त्यानंतर वेळोवेळी त्या विषयाचा पाठपुरावाही करीत राहिले. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ठाण्यामध्ये त्यावेळचे ‘ठाणे जनता सहकारी बँके’चे अध्यक्ष बंडोपंत जोशी, ‘ठाणे भारत सहकारी बँके’चे अध्यक्ष मा. य. गोखले आणि मी, अशी आमची तिघांची एक मिटिंग झाली. त्यामध्ये ठाण्यामध्ये डोंबिवलीप्रमाणेच गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा सुरू करावी, असे ठरले. संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना व अनेक सामाजिक संस्थांना सामील करून घेऊन आम्ही ठाण्यामध्ये जात, धर्म असा भेदभाव न करता, तसेच राजकीय पक्ष विरहित अशी शोभायात्रा काढण्यास सुरुवात केली.
त्या वेळेपासून मा. य. गोखले हे या न्यासाचे अध्यक्ष होते. सध्या ही अध्यक्षपदाची धुरा मी सांभाळीत आहे. आबासाहेब पटवारी यांच्या प्रोत्साहनामुळे सुरू केलेली शोभायात्रेची प्रथा आम्ही यशस्वीपणे पार पाडीत आहोत. ‘गुढीपाडव्याची शोभायात्रा’ ही आबासाहेब पटवारी यांचे जीवंत स्मारक म्हणून सर्वांच्या कायमच लक्षात राहील, अशीच आहे. महान कर्मयोगी आबासाहेब पटवारी यांना माझे कोटी-कोटी प्रणाम!
- उत्तम जोशी
(लेखक ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष आहेत.)