
चाळकेवाडी आणि कास पठारावर अधिवास
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी आणि कास पठारावरुन टाचणीच्या नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. युफाईया कुळातील या दोन नव्या प्रजाती आता युफाईया ठोसेघरेन्सीस आणि युफाईया स्युडोडीस्पार या नावाने ओळखल्या जातील. महत्त्वाचे म्हणजे या प्रजाती पश्चिम घाट भूप्रदेशाला प्रदेशनिष्ठ असून जगामध्ये साताऱ्यातील या पठारांवरच त्यांचे अधिवास क्षेत्र आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटाचा प्रदेश हा नेहमीच जैवविविधतेचे माहेरघर राहिलेला आहे. येथील ठोसेघर-चाळकेवाडी आणि कास पठराचा परिसर हा जैवविविधतेची खाण आहे. कास पठाराला, तर युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. याच दोन पठरांवरुन चतुर वर्गातील टाचणीच्या नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. साताऱ्यातील कीटक/फुलपाखरू अभ्यासक डॉ. श्रीराम भाकरे, प्रा. डॉ. प्रतिमा पवार आणि सुनील भोईटे या तीन संशोधकांनी त्रिवेंद्रम (केरळ) येथील डॉ. कलेश सदाशिवन आणि विनयन नायर यांच्या सहकार्याने संशोधनाचे काम केले आहे. यासंबंधीचा शोधनिबंध नुकताच भारतातील नामांकित शोधपत्रिका 'जर्नल ऑफ थ्रेटंड टाक्सा' च्या २६ एप्रिल २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
युफाईया ठोसेघरेन्सीस आणि युफाईया स्युडोडीस्पार या नव्याने नोंद करण्यात आलेल्या दोन प्रजाती उत्तर पश्चिम घाट क्षेत्रात फक्त ठोसेघर चाळकेवाडी आणि कास परिसरातच आढळून येतात. म्हणजेच त्या पश्चिम घाटाच्या या भूप्रदेशाला प्रदेशानिष्ठ आहेत. युफाईया स्युडोडीस्पार ही युफाईया डीस्पार प्रजातीपेक्षा वेगळी परंतु साधर्म्य राखणारी आहे. मात्र युफाईया ठोसेघरेन्सीस ही प्रजाती एकदमच वेगळी आणि नवीन आहे. ती केवळ ठोसेघर-कास परिसरातच आढळते. त्यामुळे तेथील निसर्ग-जैवविविधतेचे प्रतिक म्हणून या प्रजातीला ठोसेघरचे नाव देण्यात आले आहे. या नवीन प्रजातींच्या शोधामुळे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि त्याचे संवर्धनमूल्य पुनश्च एकदा अधोरेखित झाले आहे.
टोरंट डार्ट या सामान्य नावाने ओळखले जाणारे हे डॅमसेलफ्लाय या प्रकारातील कीटक असून स्थानिक मराठी भाषेमध्ये यास सुई किंवा टाचणी असे संबोधले जाते. नदी, नाले, ओहोळ, जलाशय अशा विविध पाणथळ जागी यांचा वावर दिसून येतो. यांच्या जैवशृंखलेमधील प्राथमिक अवस्था या पाण्यामध्ये पूर्ण होत असतात. त्यानंतर ते पंख फुटून पाण्याबाहेर उडू लागतात. वातावरणाप्रती हे अत्यंत संवेदनशील जीव असून त्यामुळेच त्यांना आदर्श परिसंस्थेचे निर्देशक देखील मानले जाते. सातारा आणि त्रिवेंद्रम येथील संशोधकांच्या या चमुस याकामी तामिळनाडू ओडोनाटा रिसर्च ग्रुप व ड्रोंगो या संस्थांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.