“यापुढे काश्मिरी हिंदूंना त्यांच्या मायभूमीतून परागंदा व्हावे लागणार नाही,” असे आत्मविश्वासपूर्ण अभिवचन सरकार्यवाह होसबळे यांनी आपल्या भाषणातून काश्मिरी जनतेला दिले. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलत असून, तेथील हिंदू समाजाने कोणत्याही प्रकारचे भय बाळगण्याची आवश्यकता नाही, असा विश्वासच या ‘नवरोह’ महोत्सवाच्या निमित्ताने सरकार्यवाह होसबळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला, असे म्हणता येईल.
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रद्द केल्यानंतर तेथील परिस्थितीत झपाट्याने चांगली सुधारणा होत आहे. काश्मिरी जनतेच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या आर्थिक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच त्या राज्यातील दहशतवादाचाही कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. पाकिस्तानच्या जीवावर उड्या मारणार्या राजकीय नेत्यांना जरब बसविण्यात आल्याने त्यांच्याकडून दहशतवादी कारवायांना चिथावणी देण्याचे उद्योग बंद झाले आहेत. दहशतवादी कारवाया दिसून आल्या की, त्यांचा लगोलग बंदोबस्त केला जात आहे. एकूणच जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगळे केल्याने या दोन्ही प्रदेशांच्या विकासास गती मिळत असल्याचे दिसत आहे. १९८९-९०च्या दशकामध्ये काश्मीर खोर्यातील मुस्लीम दहशतवाद्यांनी तेथील हिंदूंना जबरदस्तीने आपली मायभूमी सोडून तेथून पळवून लावले होते. या दहशतवाद्यांना राजकीय पाठबळ असल्याने तेथील हिंदू समाजापुढे तेथून निघून जाण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय उरलानव्हता. आपल्याला आपल्या मायभूमीत पुन्हा जाण्यास मिळणार की नाही, अशी शंका काश्मिरी हिंदू समाजास वाटत होती. पण, आता तेथील परिस्थिती पालटली आहे. जम्मू-काश्मीरमधील हिंदू समाजास आपले सणवार आणि उत्सव उजळ माथ्याने साजरे करण्यासारखी परिस्थिती त्या राज्यात निर्माण झाली आहे.
चैत्र महिन्यात येणारे हिंदू नववर्ष गेल्या तीन दशकांमध्ये काश्मिरी हिंदू उजळपणे साजरे करू शकले नव्हते. पण, यंदाच्या वर्षी प्रथमच काश्मिरी हिंदू समाजाने नवरात्र आणि नववर्ष महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. काश्मीरमध्ये नववर्ष सणास ‘नवरोह’ असे म्हटले जाते. जम्मू-काश्मीरच्या संजीवनी शारदा केंद्राच्या वतीने तीन दिवसांच्या ‘नवरोह’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास १५० सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. १२ एप्रिल हा दिवस ‘त्याग दिवस’ म्हणून पाळण्यात आला. शिरया भट्ट यांनी जे सर्वोच्च बलिदान दिले, त्या स्मरणार्थ हा ‘त्याग दिवस’ पाळण्यात आला, तर १३ एप्रिल हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. १४ एप्रिल हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. राजा ललितादित्य याने मिळविलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस या महोत्सवात साजरा करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली.
‘नवरोह’ महोत्सवानिमित्त काश्मीरमध्ये राहणार्या आणि अन्यत्र राहणार्या काश्मिरी हिंदू समाजास शुभेच्छा देऊन सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, “प्रस्तावांमध्ये एक ताकद असते. जेव्हा असे प्रस्ताव राष्ट्रधर्म आणि राष्ट्राशी वा समाजाशी असलेल्या आपल्या कर्तव्याशी निगडित असतात, त्यावेळी अशा प्रस्तावांची शक्ती शतपटीने वाढते. विदेशी आक्रमकांशी आपले पूर्वज अनेक शतके संघर्ष करीत राहिले. त्यांनी आपला लढा अर्धवट सोडून दिला नाही. शिरया भट्ट यांनी आपल्या त्यागाद्वारे तर ललितादित्य यांनी आपल्या शौर्याद्वारे समाजापुढे एक उदाहरण ठेवले आहे. बाप्पा रावळ यांच्या पाठिंब्याने ललितादित्य यांनी पूर्व आक्रमकांचा पराभव केला होता,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आपल्या भाषणामध्ये सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी काश्मिरी हिंदूंनी जो त्याग केला त्याचा उल्लेख करून सांगितले की, “काश्मिरी हिंदू समाजाने संकटाच्या काळातही त्याग करून आपल्या धर्माचे रक्षण केले. कित्येक दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षामध्येही हा समाज टिकून राहिला. इतिहासातील हे अनोखे उदाहरण आहे. टिकालाल तपलू, न्या. नीलकंठ गांजू, सरला भट्ट, प्रेमनाथ भट्ट आणि अन्य असंख्य ते केवळ हिंदू म्हणून जन्मल्याने धर्मांध शक्तींच्या अत्याचारांना बळी पडले.काश्मिरी हिंदूंच्या संरक्षणासाठी गुरू तेग बहाद्दूर यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.काश्मिरी हिंदू समाजास आतापर्यंत अनेकदा आपल्या मायभूमीतून परागंदा व्हावे लागले. १९८९-९०मध्ये काश्मिरी हिंदूंना सातव्यांदा आपल्या मायभूमीतून निघून जावे लागले. ते जे स्थलांतर झाले ते शेवटचेच,” असे सरकार्यवाह होसबळे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
या संदर्भात सरकार्यवाह होसबळे यांनी ज्यू आणि तिबेटी समाजाचे उदाहरण दिले. आपल्या मायभूमीसाठी ज्यूंच्या कित्येक पिढ्या संघर्ष करीत राहिल्या आणि त्यांनी स्वतःचे इस्रायल राष्ट्र अस्तित्वात आणले. चीनच्या आक्रमणामुळे तिबेटी जनतेलाही आपली मायभूमी सोडून परागंदा व्हावे लागले. तिबेटी जनताही एक ना एक दिवस आपणास आपल्या मायभूमीमध्ये जाता यावे, यासाठी संघर्ष करीत असल्याची उदाहरणे सरकार्यवाह होसबळे यांनी आपल्या भाषणात दिली.“यापुढे काश्मिरी हिंदूंना त्यांच्या मायभूमीतून परागंदा व्हावे लागणार नाही,” असे आत्मविश्वासपूर्ण अभिवचन सरकार्यवाह होसबळे यांनी आपल्या भाषणातून काश्मिरी जनतेला दिले. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलत असून, तेथील हिंदू समाजाने कोणत्याही प्रकारचे भय बाळगण्याची आवश्यकता नाही, असा विश्वासच या ‘नवरोह’ महोत्सवाच्या निमित्ताने सरकार्यवाह होसबळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला, असे म्हणता येईल.
भारत हा ‘फॅसिस्ट’ देश असल्याचे तोडले तारे!
सध्या आपल्या देशातील अनेक विरोधी नेत्यांना आणि काही संघटनांना केंद्रातील मोदी सरकार खुपते आहे. संधी मिळेल तेव्हा किंवा संधी नसली तरी ओढूनताणून मोदी सरकारला कसे बदनाम करता येईल, अशी चढाओढ या विरोधकांमध्ये चाललेली असते. वेळप्रसंगी विदेशांमधील आपल्या हस्तकांना हाताशी धरून मोदी सरकारची जेवढी बदनामी करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असतो. यामध्ये राजकारणीच आघाडीवर आहेत असे नाही, तर केरळच्या केंद्रीय विद्यापीठातील एका प्राध्यापकानेही भारत हा ‘फॅसिस्ट’ देश असल्याचे तारे तोडले आहेत. केरळच्या केंद्रीय विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक असलेल्या गिलबर्ट सबॅस्टियन याने, २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर भारत हा ‘फॅसिस्ट’ देश झाला असल्याचे म्हटले आहे ‘फॅसिझम आणि नाझीझम’ या विषयासंदर्भातील एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संलग्न संघटना या ‘प्रोटो फॅसिस्ट’ असल्याचे या प्राध्यापक महाशयांनी म्हटले आहे. या प्राध्यापकांचे व्याख्यान ऐकणार्या विद्यार्थ्यांनीच ही माहिती उघड केली. दरम्यान, विद्यापीठाने सदर प्राध्यापकांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारास जाणूनबुजून बदनाम करण्याचे प्रयत्न देशामध्ये विविध पातळ्यांवर कसे सुरू आहेत, याची या उदाहरणावरून कल्पना यावी!