आताच्या कोरोनाच्या दुसर्या लाटेतही हिंदू मंदिरे विविध सेवाकार्य करत असतानाच सर्वसामान्य माणूसही त्यासाठी हिरिरीने पुढाकार घेताना दिसतो. त्यातूनच मंदिरे काय करतात, याचे उत्तर मिळते. ते पाहता, ‘मंदिरांचा उपयोग काय, मंदिरे करतात काय’, असे तोंड वर करुन विचारणार्या प्रत्येकाच्याच गालावर बसलेली ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशवासिय, कोरोना रुग्ण ऑक्सिजन, ‘रेमडेसिवीर’ वा औषधींसाठी झगडत असताना भीषण संकटकाळात विविध ठिकाणची हिंदू मंदिरे महामारी, टाळेबंदीमुळे झळ बसलेल्या असंख्य लोकांच्या मदतीसाठी सेवाभावाने धावून आल्याचे चित्र देशभरात दिसून येते. ते पाहता, ‘मंदिरांचा उपयोग काय, मंदिरे करतात काय’, असे तोंड वर करून विचारणार्या प्रत्येकाच्याच गालावर बसलेली ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. कारण अशा सर्वांनाच मंदिरे फक्त दान, देणगी स्वीकारणारी व्यवस्था असल्याचे वाटते, पण ती तशी नाहीत आणि त्याचेच प्रत्यक्ष प्रमाण मंदिरांच्या वेळोवेळच्या सेवाकार्यातून मिळते.
वस्तुतः उत्तर असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम त्या प्रत्येक भागातील हिंदू मंदिरे आपल्या प्रदेशातील नैतिकता टिकवून ठेवण्याची केंद्रे होती, आहेत आणि राहतील. हजारो, शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरांनी, मठांनी सांगितलेल्या नीती-नियमांनी, निर्माण केलेल्या आदर्शांनी आपल्या पूर्वजांना आणि आपल्यालाही माणुसकी, करुणा, सेवेची प्रेरणा मिळाली, आपत्तीत धीर दिला. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आपण आज इथपर्यंत-एकविसाव्या शतकापर्यंत येऊन पोहोचलो. त्यामुळे आपल्या आजच्या वर्तमानातले मंदिरांचे योगदान नाकारुन चालणार नाही आणि ते योगदानाचे कार्य यापुढेही सुरूच राहील. आताची विविध मंदिरांनी गरीब, गरजू, रुग्णांसाठी देऊ केलेली भोजनाची मदत, उभारलेली ‘कोविड सेंटर’ त्या सेवाकार्याच्या शृंखलेचीच एक कडी. पण मंदिरांवर टीका करणार्यांना ते समजणार नाही. कारण, त्यांच्या दोन्ही मेंदूत भारत, भारतीय संस्कृती सोडून फक्त युरोप-अमेरिकेचाच विचार. मात्र, भारतात कोरोनाची पहिली लाट आदळल्यानंतर आपल्याकडील असंख्य लोकांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून इतरांना मदतीचे काम सुरु केले होते.
गेल्यावर्षी इथल्या प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतला, मात्र भारताबाहेरची स्थिती कशी होती? ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘न्यूयॉर्क टाईम्स’ वा ‘द गार्डियन’सारख्या आंतरराष्ट्रीय दैनिकांचे दाखले देऊन कोरोनाविरोधात भारत हरल्याची पिपाणी वाजवणार्यांच्या लाडक्या अमेरिकेत त्यावेळी जीवनावश्यक वस्तू नव्हे, तर शस्त्रास्त्रांचा खप सुमारे ६० टक्क्यांनी वाढला होता. असे का? तर कोरोनाच्या महाभयानक संकटात सर्वच ठप्प पडल्याने लोक जीवनावश्यक वस्तू, साधनसामग्रीसाठी लुटालुटीला सुरुवात करतील, देशांतर्गत यादवी माजेल, अशी भीती अमेरिकन नागरिकांना वाटत होती. अर्थात, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातल्या नागरिकांना सामाजिक सुरक्षेची कसलीही खात्री नव्हती, म्हणून त्यांनी त्यावरील उपाय शोधला व शस्त्रास्त्रांचा साठा करुन ठेवला. भारतात मात्र तसे झाले नाही, इतक्या भीषण आपत्तीत मंदिरे बंद असली तरी भारतीयांनी मंदिरातल्या देवतेकडे धीर शोधला आणि अमेरिकेच्या नेमके उलट धान्य, पीठ, तेल, डाळ, भाजीपाला, मसाले वगैरे पदार्थांचे भारतीयांनी इतरांना मोफत वाटप केले. त्यामागची स्वतः त्याग करून इतरांचा, समाजाचा विचार करण्याची भावना कुठून आली? तर निःसंशय विविध हिंदू मंदिरांनी अखंडपणे जागवलेल्या सेवाभावामुळे, समाजातील नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या कामामुळेच, ‘जीव ही शिव हैं’ची भावना जीवंत ठेवल्यामुळेच! अमेरिका आणि भारतातील, भारतीयांतील हा फरक त्यामुळेच दिसून येतो. आताच्या कोरोनाच्या दुसर्या लाटेतही हिंदू मंदिरे विविध सेवाकार्य करत असतानाच सर्वसामान्य माणूसही त्यासाठी हिरीरीने पुढाकार घेताना दिसतो. त्यातूनच मंदिरे काय करतात, याचे उत्तर मिळते.
देशातील कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने आता उग्र रुप धारण केले असून जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन रुग्ण भारतात आढळत आहेत. त्यातच महाराष्ट्र, केरळ, पंजाब, दिल्लीसारख्या राज्य सरकारांच्या नाकर्तेपणामुळे त्या त्या ठिकाणी रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, रुग्णशय्या, ऑक्सिजन सिलिंडर, ‘व्हेंटिलेटर’, ‘रेमडेसिवीर’ आदी औषधी, अशा वैद्यकीय सोयी-सुविधांचा बराचसा अभाव दिसून येत आहे. परिणामी वरीलपैकी प्रत्येक राज्यांत आरोग्यव्यवस्थेचा बोर्या वाजला असून कोरोनाने, आगी लागण्याने, ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यु होत आहे. तर, संबंधित राज्यांत सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांनी सरकारच्या माध्यमातून रुग्णोपयोगी कामे केलेली नसतानाच, त्यांच्या नेते वा कार्यकर्त्यांनी स्वतःहूनही आपापल्या मतदारसंघात, प्रभागात आताच्या आणीबाणीच्या काळात जनहिताचा विचार करुन सकारात्मक काम केल्याचे दिसले नाही. अर्थात, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष वा डावी आघाडी, प्रत्येकजण एकतर आपली जबाबदारी झटकण्यात वा आपापल्या राज्यातील वैद्यकीय आणीबाणीचे खापर केंद्र सरकारवर फोडण्यात रममाण झालेले आहे, त्यावरील उपाय शोधण्यात त्यांना काडीचाही रस नाही. उलट देशभरातील जवळपास हर एक राज्यांत, जिल्ह्यांत, शहरांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि निवडक स्वयंसेवी संस्था कोरोना रुग्णांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या, टाळेबंदीमुळे हाल होणार्यांच्या मदतीला पुढे आल्याचे दिसून येते. त्यांच्याच जोडीने सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे विविध हिंदू मंदिरेदेखील जनसेवेसाठी मैदानात उतरली आहेत.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पहिल्या लाटेतल्याप्रमाणेच आताही मंदिरांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. वस्तुतः देशातील प्रख्यात मंदिरांवर हिंदू धर्मीयांचे वा भाविकभक्तांचे थेट नियंत्रण नसून त्यावर विविध सरकारांनी कब्जा केलेला आहे. म्हणजे, त्या त्या मंदिरांतील संपत्तीचा विनियोग कसा करायचा हे श्रद्धाळू नव्हे तर सरकार वा सरकारने नेमलेले प्रतिनिधीच ठरवतात, त्यामुळे मंदिरांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची गरज नाही. पुढचा मुद्दा म्हणजे, हिंदुंनी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचे दिव्यकार्य हाती घेतले, त्यासाठी निधी संकलित केला, तर त्यावरही तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारवाद्यांचा डोळा. श्रीराम मंदिर बांधणीसाठी जमा झालेल्या निधीचे काय करायचे, याचे सल्ले ही बुद्धिजीवी नव्हे, बुद्धिहीन मंडळी देऊ लागली. प्रत्यक्षात मात्र त्यांनी सदैव श्रीराम मंदिराला विरोधच केलेला होता. तशाही परिस्थितीत अयोध्येतील श्रीराम मंदिरासह देशातील अनेक मंदिरांनी जनहितासाठी आपल्याकडील दानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त व्यवस्थेने दशरथ महाविद्यालयात दोन ‘ऑक्सिजन प्लांट’ सुरू करण्याचे निश्चित केले. दिल्लीतील द्वारकास्थित ‘इस्कॉन श्रीकृष्ण मंदिरा’ने गरिबांना मोफत भोजन पुरवण्याचा उपक्रम सुरु केला. त्याअंतर्गत इथून दररोज १५ हजार गरजूंना जेवण दिले जात असून लवकरच ही संख्या वाढवून अडीच लाखांवर नेली जाईल.
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरानेदेखील शहरातील गरिबांच्या व कोरोना रुग्णांच्या भोजनाची सोय करण्याची जबाबदारी उचलली आहे. विविध स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने मंदिरामार्फत भोजनपुरवठ्याचे काम केले जाणार असून मृत कोरोना रुग्णांच्या अंतिम संस्काराचे कार्यही करण्यात येणार आहे. तर पुरीच्या जगन्नाथ मंदिराने आपल्या भक्त निवासात ‘कोविड सेंटर’ स्थापण्याचे ठरवले असून येत्या बुधवारपासून ते कार्यरत होईल. बडोद्यातील स्वामीनारायण मंदिरानेही ३०० रुग्णशय्यांसह ‘कोविड सेंटर’ उभारले असून लवकरच त्याची क्षमता ५०० रुग्णशय्यांपर्यंत केली जाईल. मुंबईच्या कांदिवलीतील पावन धाम जैन मंदिरातदेखील १०० रुग्णशय्येसह ‘कोविड सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेगावचे गजानन महाराज मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, कणेरी मठ आदी अनेक मंदिरांनी आपापल्या परिसरातील जनतेसाठी लोकोपयोगी, रुग्णोपयोगी सेवाकार्ये सुरु केलेली आहेत. तरीही हिंदूविरोधी कंपूतून सातत्याने विखारी प्रचार केला जातो, कारण, त्यांना मंदिरेच नकोत. पण मंदिरांच्या मदतकार्याची वरील निवडक उदाहरणे आणि इतरही अनेक मंदिरांनी केलेली जनहिताची कामे पाहता, मंदिरे सेवाकार्यच करतात, हे स्पष्ट होते. त्याचमुळे हिंदूविरोधकांनी कितीही दुष्प्रचार केला तरी त्यांचे वाईट हेतू साध्य होणार नाहीत, याचीही खात्री पटते. कारण, जनताही वाईटावर नव्हे, तर चांगल्यावरच विश्वास ठेवते.