
गडकरींच्या विनंतीवरून आंध्र प्रदेश पुरविणार व्हेंटिलेटर
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे महाराष्ट्रास ३०० व्हेंटिलेटर पाठविणार आहेत. राज्यात यापूर्वी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी पुढाकार घेणाऱ्या गडकरींमुळे आता राज्याला व्हेंटिलेटरही प्राप्त होत आहेत.
महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या सध्या अतिशय वेगाने वाढत आहेत. त्यापैकी अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरचीही आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यात व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावेत, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क केला आणि महाराष्ट्रास व्हेंटिलेटरविषयी काही मदत करता येईल का, अशी विनंती केली. गडकरी यांच्या विनंतीस मुख्यमंत्री रेड्डी यांनी ताबडतोब सकारात्मक प्रतिसाद दिला. आंध्र प्रदेशतर्फे महाराष्ट्रासाठी ३०० व्हेंटिलेटर पुरविण्यात येतील, अशी घोषणा रेड्डी यांनी केली.
त्यानंतर गडकरी यांनीही जगनमोहन रेड्डी यांचे आभार मानताना म्हटले, “महाराष्ट्र सध्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रास मदत करण्याची विनंती मी जगनमोहन रेड्डी यांना केली होती. त्यावर त्यांनी अतिशय तत्परतेने कार्यवाही करून महाराष्ट्रासाठी ३०० व्हेंटिलेटर पाठविण्याची व्यवस्था केली. या कठीण काळात ही मदत अतिशय मोलाची ठरणार असून महाराष्ट्रातील नागरिकांतर्फे मी त्यांचे आभार मानतो”.