मुंबई : नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 23 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच, विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील सगळ्या हॉस्पिटलचे फायर ऑडिट त्वरित करा व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 23 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच, विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले व इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
विरार मधील हॉस्पिटलला आग लागून मृत्यू झालेल्या प्रकरणासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे. राज्याने केंद्राकडे त्वरित मदत मागून आर्मीच्या मदतीने प्रत्येक हॉस्पिटलमधील फायर ऑडिट आणि ऑक्सिजन ऑडिट केलं पाहिजे. राज्य सरकारला आपली जबाबदारी समजली पाहिजे. ह्या सगळ्याला जबाबदार असणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळेस भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.