‘लब्बैक प्रकरणा’त यादवीच्या उंबरठ्यावर पाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2021   
Total Views |

Pakistan_1  H x
 
 
'लब्बैक’वर बंदी घालूनही पक्षाचे समर्थक शांत व्हायला तयार नसल्याने या प्रकरणावर पाकिस्तानच्या राष्ट्रीय कायदेमंडळात निवेदन सादर करण्यात येणार आहे. फ्रान्समधील ज्या घटनांशी आपला दूरान्वयेही संबंध नव्हता, त्यात कुडमुड केल्याने पाकिस्तानने स्वतःचे हात पोळून घेतले आहेत.
पाकिस्तानमध्ये ‘तेहरीक ए लब्बैक’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष साद हुसैन रिझवी यांना पोलिसांनी १२ एप्रिल, २०२१ रोजी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव ताब्यात घेतल्यानंतर हिंसाचार शांत होताना दिसत नाहीये. ‘तेहरीक ए लब्बैक’च्या कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने रस्त्यांवर उतरून हिंसक निदर्शनांना सुरुवात केली. या निदर्शनांमध्ये गोळीबारात सात पोलीस आणि तीन आंदोलक ठार झाले असून, ४००हून अधिक लोक जखमी झाले. आंदोलकांकडून ११ पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. आंदोलकांनी मशिदींमध्ये ५० हजार लीटर पेट्रोलचा साठाही करून ठेवला आहे. ‘तेहरीक ए लब्बैक’वर पाकिस्तानवर दहशतवादी कारवाया करून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणल्याबद्दल बंदी घालण्यात आली असून ट्विटर, फेसबुक आणि यु-ट्यूबसारख्या समाजमाध्यमांना दिवसाचा काही काळ ‘ब्लॉक’ करण्यात आले आहे. या वर्षी २६ जानेवारीला, भारताच्या प्रजासत्ताक दिनी, पाकिस्तान समर्थित खलिस्तानवादी लोकांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनात घुसून जो हिंसाचार घडवला, त्याच्या शंभरपट मोठा उद्रेक पाकिस्तानमध्ये झाला आहे. ‘ लब्बैक’वर बंदी घालूनही पक्षाचे समर्थक शांत व्हायला तयार नसल्याने या प्रकरणावर पाकिस्तानच्या राष्ट्रीय कायदेमंडळात निवेदन सादर करण्यात येणार आहे. फ्रान्समधील ज्या घटनांशी आपला दूरान्वयेही संबंध नव्हता, त्यात कुडमुड केल्याने पाकिस्तानने स्वतःचे हात पोळून घेतले आहेत.
 
 
 
‘तेहरीक ए लब्बैक’ ही बरेलवीपंथीय मुसलमानांची संघटना आहे. ‘तेहरीक’ म्हणजे चळवळ, तर ‘ लब्बैक’चा अर्थ अल्लाला शरण आलेला किंवा स्वतःला अर्पण करणारा. इस्लामच्या आधारावर स्थापना झालेल्या पाकिस्तानने शुद्ध स्वरूपातील इस्लामचे आचरण करावे आणि इस्लामनिंदा करणार्‍यांना कठोर शासन करावे, याभोवती या संघटनेचे काम चालते. भारतीय उपखंडातील बहुसंख्य मुस्लीम बरेली परिसरात स्थापना झालेल्या बरेलवी पंथाचे आहेत. त्यांच्यावर तुर्क वंशीयांच्या सुफी पंथाचा प्रभाव आहे. पाकिस्तानने १९८०च्या दशकापासून देशाचे इस्लामीकरण करण्याच्या योजनेला गती दिली. सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणाला परतवून लावण्यासाठी अमेरिकेची ‘सीआयए’, पाकिस्तानची ‘आयएसआय’ आणि सुन्नी वहाबी अरब देशांची अभद्र युती झाली. त्यातून अफगाणिस्तानमध्ये रशियाविरुद्ध लढण्यासाठी ‘मुजाहिद्दीन’ तयार करण्यात आले. त्यांच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये वहाबी विचारांचे हजारो मदरसे उघडण्यात आल्याने पाकिस्तानमधील वहाबीपंथीयांच्या प्रभावात वाढ झाली. गेल्या दशकात पाकिस्तानचा अरब देशांबाबत भ्रमनिरास झाला आणि तो तुर्कीच्या जवळ ओढला गेला. पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सौदी अरेबियाशी जवळीक असल्यामुळे त्यांचे आसन डळमळीत करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’नेच ‘तेहरीक ए लब्बैक’सारख्या संघटना जन्माला घालून त्यांचे पालनपोषण केले.
 
 
 
२००९ साली एका स्थानिक भांडणातून बदला घेण्याच्या उद्देशान्वये आसियाबिबी या ख्रिस्ती महिलेवर इस्लाम निंदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यासाठी तिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या घटनेचा जागतिक स्तरावर ख्रिस्ती आणि मानवाधिकार संघटनांनी निषेध करत आसियाबिबीला सोडण्याची मागणी केली. या प्रकरणात पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तसीर यांनी, जे स्वतः उदारमतवादी विचारांचे पण धर्माने ख्रिस्ती होते, आसियाची बाजू घेतली असता त्यांचा अंगरक्षक मुमताझ कादरीने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. कादरीला न्यायालयात नेताना लोकांनी गर्दी करून त्याच्यावर गुलाबांच्या पाकळ्या उधळल्या. सर्वोच्च न्यायालयाने कादरीला दिलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर त्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले. त्यातूनच २०१५ साली खादिम हुसैन रिझवी या एकेकाळच्या सरकारी कर्मचार्‍याने ‘तेहरीक ए लब्बैक’ची स्थापना केली. सुरुवातीला एक चळवळ असणारा ‘लब्बैक’ अल्पावधीत पाकिस्तानमधील एक महत्त्वाचा पक्ष बनला. सिंध प्रांताच्या विधिमंडळात ‘लब्बैक’चे तीन आमदार असून, राष्ट्रीय पातळीवर त्यांना २५ लाखांहून अधिक मतं मिळाली आहेत. ‘लब्बैक’ला वेळोवेळी पाकिस्तानचे लष्कर आणि ‘आयएसआय’ची मदत मिळाली असून, नवाझ शरीफ सरकार उलथवून टाकून इमरान खान यांच्या ‘तेहरीक ए पाकिस्तान’ पक्षाची सत्ता आणण्यात ‘लब्बैक’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तान किंवा जगात कुठेही इस्लाम निंदेचे प्रकरण घडले, तर ‘लब्बैक’ त्याविरुद्ध आंदोलन करते. २०१८ साली हीर्थ विल्डर्स या उजव्या विचारसरणीच्या डच नेत्याने प्रेषित महंमदांची व्यंगचित्र काढायची स्पर्धा भरवण्याचे जाहीर केले होते, तेव्हा ‘लब्बैक’ने पाकिस्तान सरकारकडे नेदरलँड्सवर अण्वस्त्र हल्ला करण्याची मागणी केली होती.
 
 
 
ऑक्टोबर २०२० मध्ये फ्रान्समधील शिक्षक सॅम्युअल पॅटीने आपल्या वर्गात शिकवताना मागे ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेली प्रेषित महंमदांवरील व्यंगचित्र दाखवली असता, फ्रान्समध्ये शरणार्थी म्हणून आलेल्या १८ वर्षांच्या चेच्येन तरुणाने पॅटी यांची हत्या केली. तत्पूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉननी इस्लामिक मूलतत्त्ववादावर कडक टीका केली होती. पाकिस्तानसह जगभरातील मुस्लीम देशांमध्ये पॅटी आणि मॅक्रॉन यांच्याविरुद्ध मोठ्या संख्येने निदर्शनं झाली. नोव्हेंबर २०२०मध्ये लब्बेकने फ्रान्सशी राजनयिक संबंध तोडून फ्रान्सच्या राजदूतास परत पाठवणे आणि फ्रान्समध्ये आपला राजदूत न पाठवण्याची मागणी करत पाकिस्तानमध्ये प्रचंड आंदोलन उभे केले. आंदोलकांशी चर्चा करताना पाकिस्तान सरकारने हिंसक आंदोलकांविरुद्ध केलेली कारवाई मागे घेऊन त्यांना सोडण्याच्या बदल्यात मागण्या मान्य करण्यासाठी मुदतवाढ मागितली. यादरम्यान ‘लब्बैक’चे अध्यक्ष खादिम हुसैन रिझवीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामागे लष्कर आणि ‘आयएसआय’ असल्याचेही म्हटले जाते. खादिमनंतर त्यांचा मुलगा साद हुसैन रिझवी ‘लब्बैक’चा अध्यक्ष झाला. वयाने तरुण असलेल्या सादने ‘तेहरीक ए ‘लब्बैक” आणि एकूणच बरेलवी चळवळीवर आपले नियंत्रण मिळवण्यासाठी जहाल भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी २० एप्रिलची मुदत दिली होती. इमरान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यात विस्तव जात नसल्यामुळे ‘लब्बैक’ला रस्त्यावर उतरवण्यात पाकिस्तानचे लष्करही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
 
इमरान खान सरकारने दरम्यानच्या काळात तडजोडीचे निष्फळ प्रयत्न केले. ज्याप्रमाणे हॉलोकॉस्टवर शंका घेतल्यास अनेक युरोपीय राष्ट्रांमध्ये शिक्षा होऊ शकते, त्याचप्रमाणे प्रेषित महंमदांवर टीका केल्यासही असावी, अशी मागणीही इमरान खान यांनी केली. पण, युरोपीय देशांनी तिची दखलही घेतली नाही. सध्या दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तान ‘एफएटीएफ’च्या करड्या यादीत असून, कोरोनामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला आहे. अशा वेळेस जर फ्रान्सच्या राजदूतास परत पाठवले तर आपल्या मुसक्या आवळल्या जाऊ शकतात, याची जाणीव इमरान खानला असल्यामुळे त्यांच्या सरकारने साद हुसैन रिझवीला अटक करवून ‘तेहरीक ए ‘लब्बैक’वर बंदी घातली आहे. इमरान खानच्या पंतप्रधान म्हणून कारकिर्दीकडे पाहिले तर त्यांनी तुर्की आणि मलेशियाच्या मदतीने ‘इस्लामोफोबिया’शी लढण्यासाठी आघाडी उघडली. त्यामुळे आपणच मोठे केलेल्या ‘लब्बैक’विरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकार इमरान खानकडे नाहीये. त्यामुळे त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न आजही चालू आहेत. पाकिस्तानमधील आंदोलन आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानची आगेकूच या घटनांकडे वेगळ्या चश्म्यांतून पाहणे योग्य होणार नाही. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी लावलेली द्विराष्ट्रवादाची विषवल्ली फोफावून आज तिचा वटवृक्ष झाला आहे. राष्ट्रीयत्वाच्या भावनेपेक्षा धार्मिक ओळख अधिक प्रखर झालेला पाकिस्तान आज अंतर्गत गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@