‘उडान’रुपी ‘भरत’ भरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021   
Total Views |

Bharat Shinde_1 &nbs
 
 
 
 
‘उडान फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक कार्याचा आदर्श वस्तुपाठ उभा करणार्‍या नाशिकच्या भरत शिंदे यांची ही कहाणी...
 
 
आपण कोणत्या कौटुंबिक परिस्थितीत जन्माला यावे, हे माणसाच्या हाती नक्कीच नाही. मात्र, जर आपल्याला बालपणापासून संघर्ष करावा लागला, तर इतरांना तो करावा लागू नये, यासाठी प्रयत्न करणे हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. नेमकी हीच बाब ओळखून जे कार्य करतात, ते नक्कीच सामाजिक सहृदयता जपत असतात.
 
 
 
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील भरत शिवाजी शिंदे हे असेच एक व्यक्तिमत्त्व. चहा-नाश्त्याचे व इतर पदार्थ विक्री करणारे त्यांचे एक छोटेसे हॉटेल सिन्नर येथे सरहदवाडी रस्त्यावर आहे. रोज ७०० ते ८०० रुपये कमविणारे शिंदे हे जिल्ह्यात ते करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे मात्र सुपरिचित आहेत. शिंदे यांचे वडील सिन्नर येथील कारखान्यात बिगारी होते. त्यामुळे इयत्ता पाचवीपासून ते बी.ए. (संरक्षण शास्त्र)पर्यंतचे शिक्षण शिंदे यांनी पाव, कपडे, साबण आदी वस्तूंची दारोदारी विक्री करून पूर्ण केले. ज्यावेळी सिन्नर येथे ‘एमआयडीसी’ कार्यन्वित झाली, तेव्हा सुरुवातीला वय लहान असल्याने शिंदे यांना तेथे रोजगार नाकारण्यात आला. त्यावेळी फळविक्री करताना शिंदे यांचा हात कापला. तेव्हा प्राप्त झालेला सर्व नफा रु. ६० उपचारार्थ शिंदे यांना खर्ची करावा लागला. त्यावेळी भरत यांना आलेले अनुभव हे नक्कीच मन हेलावून टाकणारे होते. त्याच वेळी आपल्यावर जी वेळ आली, ती इतरांवर येऊ नये यासाठी कार्य करण्याचा चंग शिंदे यांनी मनाशी बांधला.
 
 
 
शिंदे यांच्या हॉटेलमध्ये एके दिवशी एक ग्राहक चहा घेण्यासाठी आला. चहा घेताना त्यांच्या आठ ते नऊ महिन्यांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करायची आहे व त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी ते धडपड करत असल्याचे शिंदे यांना त्यांच्यासमवेत चर्चा करताना समजले. तो ग्राहक हा पेशाने शिक्षक होता व एका संस्थेत शिक्षणसेवक म्हणून सेवेत होता. शिक्षणसेवक म्हणून तुटपुंजे मानधन त्यांना प्राप्त होत होते. त्यामुळे आर्थिक चणचण आणि इतर समस्या या त्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावत होत्या. हे सर्व ऐकून शिंदे यांचे मन सुन्न झाले. त्याच क्षणी मित्रांच्या साहाय्याने शिंदे यांनी त्या बाळाला शस्त्रक्रियेसाठी मदत केली व यातूनच आपण समाजातील अनाथ, गरीब, वनवासी समाजासाठी आपल्या उत्पादनातून व समाजाच्या साहाय्याने समाजसेवा करू शकतो, याची जाणीव शिंदे यांना झाली व तसा संकल्पदेखील त्यांनी केला. यातूनच दि. १२ जानेवारी, २०१८ रोजी ‘उडान फाऊंडेशन’ची स्थापना शिंदे यांनी केली.
 
 
 
 
‘उडान फाऊंडेशन’च्या माध्यमातून प्रतिवर्षी तालुक्यातील अनाथ, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. नवरात्रोत्सवात विशेष मदतकार्य करण्याचे काम या फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असते. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई शिखराची नवरात्रीच्या नऊ दिवसांत ग्रामस्थांच्या व भाविकांच्या मदतीने स्वच्छता करण्यात येते. यासाठी ग्रामस्थांच्या सहभागाने विशेष मोहीमदेखील राबविण्यात येते. दिवाळीमध्ये हरसूलपेठ भागातील वनवासी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करून तेथील वनवासींना फराळवाटप करत त्यांचा सण गोड करण्याचे कार्यदेखील ‘उडान फाऊंडेशन’च्या माध्यमातून होत असते.
 
 
 
 
तसेच गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये अनेकांना किराणामालाचे वाटप करणे, शासकीय रक्तपेढीमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करणे आदी कार्य शिंदे यांनी ‘उडान फाऊंडेशन’च्या माध्यमातून केले. त्यामुळे सिन्नर तालुक्यासह जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंबाळणे येथील वनवासी बांधवांच्या झोपड्यांना अचानक आग लागली. त्यात घरातील सर्व साहित्य जळून राख झाले. तसेच काही शेळ्यादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. त्यावेळी या वनवासी बांधवांना तातडीची मदत म्हणून संसारोपयोगी साहित्याची मदत शिंदे यांनी ‘उडान फाऊंडेशन’च्या माध्यमातून केली.
 
 
 
 
भारतात १८ वर्षांखालील जी मुले स्वत:चा अगर दुसर्‍याचा प्रसंगावधान राखून जीव वाचवितात, अशा मुलांना राष्ट्रपती सन्मानित करतात. परंतु, अनेक मुलांना तेथे पोहोचणे शक्य होत नाही. अशा महाराष्ट्रातील मुलांचा शोध घेऊन ‘उडान फाऊंडेशन’च्या माध्यमातून ‘बालशौर्य’ पुरस्काराचे वितरण सन २०१९ पासून करण्यात येत आहे. हा पुरस्कार दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दिला जातो. “यामुळे लहान मुलांमध्ये शौर्यभावना वाढीस लागण्यास आणि सत्कर्माची साखळी तयार होण्यास मदत होते,” असे शिंदे यांचे म्हणणे आहे.
 
 
 
 
लहानपणापासून रुपये ३० ते ८० इतक्या तुटपुंज्या बिगारीवर काम करणारे शिंदे आज ७०० ते ८०० रुपये रोज कमवत आहेत. आजही ही रक्कम खूप मोठी आहे, असेही नाही. शिंदे हे वैयक्तिक मदत करण्यास आजही हतबल आहेत. त्यामुळे त्यांनी ‘उडान फाऊंडेशन’ स्थापित सांघिक प्रयत्नांतून मदत करण्यास सुरुवात केली. मनी प्रबळ इच्छा असली की, लक्ष्य सहज साध्य करता येते हेच यावरून दिसून येते. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@