कविमनाचा डॉक्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Rasal_1  H x W:
 
 
 
एक संगीतप्रेमी, काव्यप्रेमी, समाजसेवक व एक यशस्वी डॉक्टर, ज्याने आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशकिरणांनी हजारोंच्या जीवनातील अंधकार दूर करत समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. अशा या काव्यप्रेमी साहित्यिक डॉ. शाहू रसाळ यांच्या कार्यकर्तृत्वावर एक नजर...


उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
पंखात सदा नवी दिशा असावी...
घरटे ते काय बांधता येईल केव्हाही
क्षितिजापल्याड झेप घेण्याची जिद्द असावी...
 

या चार ओळीतच एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास आणि समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करत क्षितिजापल्याड झेप घेण्याची जिद्द दिसून येते. बहुतेक सर्वच जण आपल्या परिस्थितीनुरूप शिक्षण घेतात व नंतर आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होतात. आयुष्यभर यशाच्या मागे धावत असताना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आज अडल्यानडल्या, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणारे व अगदी गुंतागुंतीच्या व्यवसायात असतानाही लोकसेवा व साहित्यात रमणारे डॉ. शाहू रसाळ. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहायचे म्हणजे एखाद्या सूर्याला आरसा दाखविण्यासारखेच. एक संगीतप्रेमी, काव्यप्रेमी, समाजसेवक व एक यशस्वी डॉक्टर ज्याने आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशकिरणांनी हजारोंच्या जीवनातील अंधकार दूर करत समाजासमोर एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे.
 
 
डॉ. शाहू रसाळ यांचा जन्म ३ ऑगस्ट, १९५८ साली तेव्हाच्या उस्मानाबाद म्हणजे आताच्या लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील भेटा या छोट्याशा खेड्यात झाला. भेटा गाव हे रसाळांचे आजोळ, तर एकुर्गा हे मूळ गाव. पुढे रसाळ यांच्या आजोबांनी शाहू यांना शिक्षणासाठी भेटा येथेच ठेवावे, अशी इच्छा आपल्या मुलीकडे बोलून दाखवली. शाहू यांचे मामादेखील तेव्हाच्या सहावी बोर्डापर्यंत शिकलेले, मात्र, प्लेगच्या साथीने त्यांना शिक्षणापासून दूर नेले. त्यामुळे त्यांचीदेखील ती अपूर्ण राहिलेली स्वप्ने ते शाहू यांच्यात पाहू लागले. वडिलांची व भावाची इच्छा पूर्ण करावी या हेतूने मग शाहू यांचे शिक्षण आजोळीच व्हावे, असे ठरले. रसाळ यांचे कुटुंब ग्रामीण भागातील. पण, हलाखीच्या परिस्थितीही शाहूंच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शाहूंनीदेखील मन लावून अभ्यास करत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. १९७२ च्या दुष्काळाच्या झळा संपूर्ण गावाला सोसाव्या लागल्या. गावातील मुले हाताला काही काम मिळावे म्हणून पुण्यात गेली. यांच्याच मागे शाहूदेखील गेले. सातवीच्या परीक्षेनंतर पुण्यात रस्त्यावर खडी टाकण्याचे, रंगकाम, वेटरचे काम केले. १९७२ साली सातवीच्या बोर्ड परीक्षेत आणि शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळविले. पुढे दहावीपर्यंत ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेमध्ये असतानाच शाळेतील गुरूंमुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण झाली. नववीच्या वर्गातच त्यांनी आपल्या काही वर्गमित्रांना सोबतीस घेत ‘अंकुर’ या हस्तलिखिताचे प्रकाशन केले. त्यासोबतच ते गायन, वादन, गणपती उत्सव, वादविवाद स्पर्धा, नाट्याभिनय यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होत. पुढे ते उच्चशिक्षणासाठी औरंगाबादला गेले. येथेदेखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. १९७७ मध्ये मिलिंद विज्ञान महाविद्यालयातून बारावीत सर्व विषयांत प्रथम श्रेणी मिळवत पदार्थविज्ञान शास्त्रात विशेष प्रावीण्य मिळविले. यानंतर इंजिनिअरिंग व मेडिकल या दोन्ही शाखांमध्ये प्रवेश मिळविला.
 
 
मेडिकलची आवड असल्यामुळे इंजिनिअरिंगचा प्रवेश रद्द करत मेडिकल महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. वास्तविक पाहता डॉ. रसाळ यांना भौतिकशास्त्र, मराठी किंवा इंग्रजी भाषेत ‘पीएच.डी’ करून विद्यापीठात प्राध्यापक व्हावे किंवा ‘आयएएस’ होऊन ‘कलेक्टर’ व्हावे, असेच स्वप्न त्यांनी पाहिले. परंतु, त्यांच्या हातून रुग्णसेवा घडावी, असेच नियतीच्या मनात होते की काय म्हणून त्यांना वारंवार याच क्षेत्रातील संधी समोर चालून आल्या आणि मनात नसतानाही ते डॉक्टर झाले.
 
 
 
वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांची साहित्यक्षेत्राची नाळदेखील जोडलेलीच होती. यादरम्यान ते नरहर कुरुंदकरांच्या एका शब्दाखातर अखिल भारतीय मराठी, हिंदी, उर्दू कवी संमेलनात सहभागी झाले. महाराष्ट्रातील नावाजलेल्या काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभागी होत प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. मराठवाडा पातळीवर ‘आविष्कार’ काव्यवाचन स्पर्धेत सांघिक ढाल मिळवत प्रथम पुरस्काराचे ते मानकरी ठरले. यावेळी कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या हस्ते डॉ. रसाळ यांना सन्मानित करण्यात आले. याचदरम्यान जालना जिल्ह्यातील आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यांना मिळालेल्या या निरनिराळ्या सन्मानांमुळे डॉ. रसाळ यांना आकाशवाणी औरंगाबाद, परभणी केंद्र आणि मुंबई दूरदर्शन केंद्र येथे काव्यवाचन, मुलाखती व व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाऊ लागले. त्यांचे विविध कार्यक्रम प्रसारित होत. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांतून काव्य, ललित, सामाजिक आणि वैचारिक लेखन करत आणि आजही करत आहेत. डॉ. शाहू रसाळ लिखित पुस्तकाला प्रस्तावना देताना कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, “डॉ. शाहू रसाळ हे नाव मराठी काव्यरसिकांना तसे नवे नाही. त्यांच्या कविता अनेक नियतकालिके, आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांपर्यंत आज पोहोचल्या आहेत. त्यांची कविता वाचताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे रसाळ हा केवळ त्यांच्या आडनावापुरता सीमित नसून, तो त्यांच्या कवितांना व्यापून राहिला आहे.”
 
 
 
‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण होताच डॉ. शाहू इंटर्नशिप करू लागले. सर्वदूर ख्यातीनंतर त्यांना नर्सिंग महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. तिथेच त्यांची ओळख तत्कालीन नाट्यकलावंत विद्यार्थिनी संध्याराणी हंचाटे यांच्याशी झाली व गाढ मैत्रीचे रूपांतर कालांतराने वैवाहिक जीवनात झाले. १९८४ रोजी त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. इंटर्नशिपचा कार्यकाल संपवत त्यांनी १९८४ साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून नेत्ररोग चिकित्सा आणि शस्त्रक्रिया यात प्रावीण्य मिळवीत ‘एमएस’ केले. ‘एमएस’ पूर्ण होताच १९८७ साली ते परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथे फिरते रुग्णालय व सेवा पथकात रुजू झाले. त्यांच्या या कामाचे कौतुक करत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते डॉ. रसाळ यांना सन्मानित करण्यात आले.
 
 
 
१९८७ हे वर्ष त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. रसाळ ठाणे येथील शासकीय विठ्ठल सायन्ना रुग्णालयातील नेत्र विभागात ‘मेडिकल ऑफिसर’ म्हणून रुजू झाले. रुजू होताच त्यांनी आपला सामाजिक पिंड जपला व गोरगरीब वाड्या-वस्त्यांवर जाऊन त्यांनी अनेक नेत्रहीन, दृष्टीने अधू असणार्‍या गरीब रुग्णांच्या कमी खर्चात शस्त्रक्रिया केल्या. ते एकाच दिवशी १०० शस्त्रक्रिया करत. संपूर्ण ठाणे जिल्हा व मुंबई परिसरातील अंध नेत्ररुग्णांवर त्यांनी उपचार केले. परंतु, १९९५ मध्ये त्यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली. पण, ही बदली नाकारत त्यांनी सरकारी सेवेचा राजीनामा दिला. सरकारी नोकरी करत असतानाच डॉ. रसाळ खासगी प्रॅक्टिसदेखील करत होते. परंतु, राजीनामा देताच त्यांनी पूर्णवेळ खासगी प्रॅक्टिस करत आपला संपूर्ण वेळ समाजसेवा व सामाजिक कार्यासाठी झोकून दिले व ठाण्यातच स्थायिक झाले. १९९८ मध्ये त्यांनी ठाण्यात स्वतःचे ‘साईसंध्या नेत्ररुग्णालय व लेझर सर्जरी सेंटर’ची स्थापना केली. एखाद्याला जी गोष्ट सहज मिळते, त्याच गोष्टीसाठी डॉ. शाहू रसाळ यांना वणवण करावी लागली. परंतु, ‘ट्राय ट्राय बट डोण्ट क्राय’ या उक्तीप्रमाणे धगधगता आणि रखरखीत जीवनप्रवास त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. आजच्या काळात गरीब परिस्थितीत जगणार्‍या मुलांनी खडतर जीवन जगत शिक्षण पूर्ण करून यशस्वी जीवनाचा आदर्श मांडणे, हे केवळ चित्रपट कथेत शोभणारे असे आपणास वाटू शकते. परंतु, याचे उत्तम वास्तववादी उदाहरण म्हणजे डॉ. शाहू रसाळ.
 
 
 
पुढे हीच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी १९९३ साली ‘सहजीवन फाऊंडेशन’ची स्थापना केली. स्वतःच्या तत्त्वांचा पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता, धर्म निरपेक्षता आणि विश्वबंधुता या सूत्रांवर आधारित या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांची मांदियाळी स्वयंस्फूर्तीने भरते. ३ ऑगस्ट हा डॉक्टरांचा वाढदिवस दरवर्षी ‘रुग्णमित्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने उत्कृष्ट आरोग्यसेवा देणार्‍या व्यक्तीस ‘रुग्णमित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. तसेच आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार, वह्या व शालोपयोगी साहित्याचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप, विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा सन्मान यादिवशी केला जातो. सर्वात विशेष बाब म्हणजे, यादिवशी मोफत मोतीबिंदू तपासणीव शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दरवर्षी हजारो रुग्ण तपासणीसाठी या दिवशी येथे येतात. सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘दै. महाराष्ट्र जनमुद्रा गौरव पुरस्कार’, ‘मुक्त पत्रकार संघा’चा ‘दीप पुरस्कार’, ‘आंतरराष्ट्रीय डॉक्टर परिषदे’त ‘विशेष गौरव पुरस्कार’, २००६ साली ‘ठाणे गौरव पुरस्कार’, ‘अनसूया खांजेकर स्मृती पुरस्कार’ यांसारख्या तब्बल ८८ हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 
 
 
१९८८ ते आतापर्यंत त्यांनी २५ लाखांहून अधिक रुग्णांची नेत्रतपासणी केली आहे, तर ९० हजार शस्त्रक्रियांपैकी ७० टक्के शस्त्रक्रिया त्यांनी कमी खर्चात तर काही मोफत केल्या आहेत. भाषा, प्रांत व धर्म याकरिता देशात वादंग होत असताना राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे शिर्डीचे साईबाबा. त्यांचा हा संदेश समाजात पोहोचावा, याकरिता त्यांनी एकुरगा येथे ‘शाहू भवन’ परिसरात साईबाबा मंदिराची स्थापना केली. आई-वडिलांत देव शोधून संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी काम करणारे डॉ. शाहू यांच्या उच्चशिक्षणासाठी वडिलांनी घराचे पत्रे विकले होते. त्याची जाण ठेवत आज शाहू अनेक गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जातात. औरंगाबादसारख्या शहरात शिक्षण घेत असताना वेळेला उपासमारी सहन करत परिस्थितीवर मात करणार्‍या डॉ. शाहूंची कारकिर्द प्रेरणादायी अशीच आहे. ‘शाहू’ अशा नावाला शोभणार हे व्यक्तिमत्त्व व त्याचा प्रवास असाच सुरू राहो, अशा डॉ. शाहू रसाळ यांना शुभेच्छा!
 
यशाचा मूलमंत्र
आयुष्यात कितीही खडतर प्रसंग आले तरी त्याचा जिद्दीने सामना करा.

@@AUTHORINFO_V1@@