बहुराष्ट्रीय कंपनीत ११ वर्षांपासूनची, उत्तम वेतनाची नोकरी सोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कंपनीची स्थापना करणे, मोठे हिमतीचे काम. पण, तेच धाडस ‘एमिल फार्मास्युटिकल्स’चे संस्थापक राजेंद्र गोळे यांनी दाखवले आणि आज त्यांच्या कंपनीने निर्मिती केलेल्या उत्पादनांना देशात तर मागणी आहेच, पण परदेशातही त्यांची निर्यात होते. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
शिक्षण घेतले की, कुठेतरी नोकरी करत आयुष्य जगण्याची भूमिका मराठी माणूस वर्षानुवर्षांपासून घेत आल्याचे सर्वांनाच माहिती आहे. परिणामी, तुलनात्मकरीत्या इतरांच्या हाताखाली काम करणार्या मराठी माणसांची संख्या स्वतःचा व्यवसाय-उद्योग उभारणार्या मराठी किंवा अन्य राज्यातील व्यक्तींपेक्षाही नक्कीच अधिक असल्याचे दिसते. मात्र, ही परंपरा तोडण्याचे प्रयत्नही अनेक मराठी माणसांनी केले आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्यापैकीच एक म्हणजे, ‘एमिल फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज’चे संस्थापक-प्रमुख राजेंद्र गोळे.
आज ६५ वर्षे वय असलेल्या राजेंद्र गोळे यांचा जन्म नोकरदार कुटुंबात झाला. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण करतानाच त्यांनी प्रथम ‘बी. फार्मसी’ची पदवी प्राप्त केली. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ‘बुट्स प्युअर ड्रग’ या बहुराष्ट्रीय कंपनीत अप्रेंटिसशिप/नोकरीला सुरुवात केली. त्याच काळात काम आणि शिक्षणही त्यांनी सुरू ठेवले आणि पदव्युत्तर पदवीही मिळवली. दरम्यान, शिक्षणानंतर राजेंद्र गोळे यांनी ११ वर्षे ‘बुट्स’ किंवा आताच्या ‘अॅबॉट’ कंपनीत नोकरी केली. तसेच याच काळात रविवारी, सुट्टीच्या दिवशी अन्य ठिकाणची फार्मसीशी निगडित छोटी-मोठी कामेही त्यांनी केली. त्यात फार मोठ्या कंपन्यांचा, कारखानदारांचा समावेश नव्हता. पण, ओळखीतले लोक, मित्रमंडळी आदींची कामे ते या काळात करत असत. तेही फक्त हौसेखातर, पैसा कमावण्याच्या उद्देशाने नव्हे. पुढे मात्र, ८६-८७ साली दोन-चार मोठी कामेही त्यांना मिळाली. तुषार कोरडे हे त्यांचे वर्गमित्र या सगळ्यात त्यांचे सहकारी म्हणून काम करत होते.
पण, नोकरी आणि बाहेरील कामे करता करताच तुषार कोरडे यांच्या मनात स्वतःचा व्यापार-उद्योग सुरू करावा, असा विचार घोळत होता. तो त्यांनी राजेंद्र गोळे यांना सांगितला. त्यावर दोघांनीही विचार केला आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. त्यातून ‘एमिल फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज’चा जन्म झाला. तथापि, एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या, ११ वर्षे नोकरी केलेल्या व्यक्तीने एखादी कंपनी स्थापन करणे सहजासहजी होण्यासारखे काम नव्हते. कारण, कंपनी स्थापन करायची म्हणजे, पैसा हवा आणि त्यानंतर जागा, कच्चा माल, कुशल-अकुशल कामगारही हवेत. पण, महत्त्वाचे म्हणजे बक्कळ भांडवल हवे, जे सर्वसामान्यांकडे उपलब्ध होऊ शकत नाही. राजेंद्र गोळे यांनाही या अडचणींना तोंड द्यावे लागले, बँका कर्ज मंजूर करत नव्हत्या, तर उद्योगधंद्याची पार्श्वभूमी नसल्याने तसे मार्गदर्शन, आधार, धीर, पाठिंबा देणारेही कोणी नव्हते. तरीही त्यावर मात करत राजेंद्र गोळे यांनी बोईसर ‘एमआयडीसी’मध्ये स्वतःची कंपनी उभी केली.
धडपडत कंपनी स्थापन केल्यानंतर मात्र राजेंद्र गोळे यांनी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण उत्पादनांचा ध्यास घेतला आणि त्यांचा तो ध्यास अजूनही कायम आहे. हळूहळू त्यांना छोट्या-मोठ्या कामांपासून मोठमोठ्या कंपन्यांची कामे मिळू लागली आणि त्यांची कंपनी फार्मास्युटिकल क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकली. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरही कंपनीचा विस्तार करण्याचे प्रयत्न केले. पण, ते शक्य झाले नाही व त्यांनी स्थानिक बाजारावरच लक्ष केंद्रित केले. त्यासोबतच परदेशात उत्पादनांच्या निर्यातीलाही त्यांनी प्राधान्य दिले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्या कंपनीचा, कंपनीच्या उत्पादनांचा जम बसत गेला. त्यातही प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील पेरू, चिली, पनामा यांसारख्या देशात त्यांनी निर्यात सुरू केली. आता ‘एमिल फार्मास्युटिकल्स’ दक्षिण अमेरिकेसह दक्षिण-पूर्व आशियातील देशांतही आपल्या उत्पादनांची निर्यात करते. आज कंपनीच्या ७५ टक्के उत्पादनांची निर्यात केली जाते. उल्लखनीय म्हणजे, १९९९ पर्यंत कंपनीच्या उत्पादनांची मागणी इतकी वाढली की, त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी ‘मेडिबायस’ या आणखी एका कंपनीची स्थापना केली. आज तर त्यांच्या दोन्ही कंपन्यांत एकत्रितपणे 400 कामगार काम करत असून, ‘टॅबलेट’, ‘कॅप्सुल’, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांशी संबंधित उत्पादने कंपनी तयार करते. आता दम्यावरील औषधांची निर्मितीही कंपनीमार्फत करणार असल्याचे राजेंद्र गोळे म्हणतात.
दरम्यान, आपल्या यशात आपल्या कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे राजेंद्र गोळे सांगतात. सुरुवातीला ११ वर्षांची नोकरी सोडून कंपनी सुरू करण्याच्या त्यांच्या निर्णयाने कुटुंबाला धक्का बसलाच. कारण, ते त्यावेळी व्यवस्थापक पदावर कार्यरत होते आणि वेतनही पुरेसे होते. ते पाहता कुटुंबीयांनी नोकरी सोडून स्वतः कशाला उद्योगांत उतरायचे, असा सवाल केला. पण, राजेंद्र गोळे यांनी दृढ निश्चय केलेला होता नि ते त्यापासून ढळले नाही. पण, राजेंद्र गोळे यांच्या व्यवसायाच्या इच्छेमुळे सेवानिवृत्त झालेल्या त्यांच्या वडिलांनी पुन्हा नोकरी करायला सुरुवात केली, कारण घर चालवायचे होते आणि उद्योग-धंद्यात कितपत यश मिळेल, याची कोणतीही हमी नव्हती. दरम्यान, राजेंद्र गोळे यांच्या आईने, वडिलांनी, पत्नीने त्यांना एकदा कंपनी सुरू केल्यावर पाठिंबा दिला, विरोध केला नाही. त्या पाठिंब्यातूनच आज ‘एमिल फार्मास्युटिकल्स’ आणि ‘मेडिबायस’ कंपनीची घोडदौड सुरू असल्याचे दिसते.
आज राजेंद्र गोळे स्वतः तर कंपनीत काम करतातच, पण त्यांची मुलेही आपल्याच कंपनीत काम करतात. तथापि, मुलांनी उच्चशिक्षण घेतल्यानंतर बहुसंख्य पालक त्यांना अमेरिका, युरोप वगैरे ठिकाणी नोकरीसाठी पाठवतात. पण, गोळे यांनी तसे केले नाही. कारण, तिकडे जाऊनही ९ ते ५ या चाकोरीत राहून कोणाची तरी नोकरीच करावी लागणार, त्यापेक्षा आपला स्वतःचा उद्योग वाढवणे, त्यातील आव्हानांचा स्वीकार करणे अधिक श्रेयस्कर असेल, असे त्यांनी मुलांना, पत्नीला सांगितले. कारण, उद्योगाच्या जीवंतपणासाठी आणि एका पिढीकडून दुसर्या पिढीपर्यंत जाण्यासाठी ते अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे, राजेंद्र गोळे यांचे हे म्हणणे त्यांच्या कुटुंबीयांनीही अखेर मान्य केले. अशाप्रकारे कुटुंबीयांचा पाठिंबा मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणतात.
दरम्यान, आज दोन कंपन्यांचे संस्थापक, ‘सीईटीपी’च्या सदस्यमंडळावर कार्यरत असलेले राजेंद्र गोळे आपण इथवर कसे आलो व आणखी कुठवर पोहोचायचे हेही सांगतात. “मराठी माणूस शिक्षण घेऊन नोकरी करण्याचे, संसारात रमण्याचे स्वप्न पाहतो. पण, हा प्रकार बंद झाला पाहिजे, त्याने व्यवसाय, व्यापार, उद्योगात पुढे यावे म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत. आज मराठी माणसाला कुटुंबीयांचा-समाजाचा पाठिंबा मिळत नाही, तो मिळाला पाहिजे,” असे ते म्हणतात. तसेच आपण पैसे कमवण्यासाठी उद्योग सुरू केला नाही, तर आयुष्यात येणार्या छोट्या-मोठ्या संकटाने, धक्क्याने हेलकावे खाण्याची वेळ येणार नाही, अशा स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी सुरू केल्याचे राजेंद्र गोळे म्हणतात. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी संधी आहे. पण, ती मिळवण्यासाठी मोठ्या भांडवलाची, हिमतीची गरज असल्याची जाणीव ते करून देतात आणि हेच आपल्या समोरचे आव्हान असल्याचे ते म्हणतात.
यशाचा मूलमंत्र
नव्या उद्योजकांना मी सांगू इच्छितो की, ज्या दिवशी मोठे व्हायचे थांबवाल त्या दिवशी तुमचा उद्योगही थांबेल. माझ्या कंपनीने उत्पादनांचा दर्जा आणि गुणवत्ता जपली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला फार महत्त्व असते, ते त्यावर बारीक लक्ष ठेवतात. म्हणून त्याला प्राधान्य दिले पाहिजे.