रक्ताची ‘नीता’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021   
Total Views |

Neeta Patil_1  
 
 
 
आजपासून २७ वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावसारख्या ग्रामीण भागात एकटीच्या बळावर रक्तपेढी सुरू करणे तसे धाडसाचेच काम. पण, आपल्या समोर रक्ताअभावी होणारी रुग्णांची फरफट पाहून त्यांनी ती हिंमत केली आणि आजही रक्ताचा दर्जा, गुणवत्ता जपून त्या कार्यरत आहेत. त्या कोण? तर जाणून घेऊया, संजीवनी रक्तपेढीच्या संस्थापक-प्रमुख नीता पाटील यांच्याबद्दल...
 
 
 
“ ‘रक्तदान महादान’ असे म्हटले जाते. रक्तदानामुळे दुसर्‍याचे प्राण वाचतात, पण रक्तदान केले म्हणजे झाले असे नसते. रक्त गोळा करण्याच्या प्रक्रियेपासून रक्त विघटन करून ते रुग्णांसाठी सुरक्षित आहे किंवा नाही, यासाठी आवश्यक त्या तपासण्या करून विशिष्ट तापमानाला साठवून ठेवावे लागते आणि नंतरच रुग्णापर्यंत पोहोचविले जाते. मात्र, रक्तदानाबद्दल जी जागृती झालेली दिसते, ती रक्तदानोत्तर रक्तावरील प्रक्रियेबद्दल झाल्याचे दिसत नाही. रक्तपेढीत आलेले रक्त रूग्णांच्या सुरक्षेसाठी होणार्‍या तपासण्यांना लागणारे महागडे केमिकल, रक्तविघटन, वेगवेगळ्या तापमानाला रक्तघटकांची साठवणूक उदा. चार अंश, उणे ३० अंश, उणे ७० अंशाचे फ्रीज इत्यादींसाठी लागणार्‍या मशीनरी आणि त्याकरिताचा खर्च याबद्दल जनजागृती नाही. तसेच रक्तपेढीने घ्यावयाचे शुल्क हे सरकार ठरवते, याचीही कल्पना समाजाला नसते. त्यामुळे रक्तपेढी चालवणे ही एक समाजसेवा नसून इतर नफा कमावणार्‍या व्यवसायासारखीच आहे, असे रक्तदात्यांना व रुग्णांना वाटते,” अशी खंत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रक्ताच्या दर्जाशी तडजोड न करणार्‍या ‘संजीवनी’ रक्तपेढीचा डोलारा स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर पेलणार्‍या नीता पाटील यांनी व्यक्त केली.
 
 
नीता पाटील यांचा जन्म कोपरगावचा. त्यांचे प्राथमिक शिक्षण शहाड येथे व महाविद्यालयीन शिक्षण उल्हासनगर येथे चंदिबाई हीमतमल मनसुखानी महाविद्यालयातून झाले. त्यांनी ‘मायक्रोबायोलॉजी’मध्ये पदवी प्राप्त केली.त्यानंतर मुंबईच्या भारत ‘सीरम इन्स्टिट्यूट’मधून त्यांनी ‘डीएमएलटी’चा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र, १९८० मध्ये त्यांचे लग्न झाल्यानंतर शिक्षण संपवून १९८४ साली त्या कोपरगावमध्ये आल्या. प्रारंभी त्यांनी १९८५ मध्ये ‘प्रवरा मेडिकल कॉलेज’मध्ये नोकरी केली. १९८६ मध्ये त्यांनी कोपरगावला स्वतःची पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू केली. मात्र, कोपरगाव येथे रक्ताअभावी रुग्णांची होणारी तारांबळ, जिथे रक्त उपलब्ध आहे, तिथपर्यंत पोहोचताना होणारे मृत्यू याची जाणीव झाल्याने १९९३ मध्ये कोपरगावसारख्या लहान तालुक्याच्या ठिकाणी ‘संजीवनी रक्तपेढी’ची त्यांनी सुरुवात केली. रक्तपेढीसारखा कोणताही फायदा न होणारा, सदैव तोट्यातच चालणारा उपक्रम उभारण्याचा त्यांचा निर्णय खरोखर धाडसी होता. विशेष म्हणजे, आजपासून २७ वर्षांपूर्वी कोपरगावसारख्या ग्रामीण भागात जिथे दुचाकी चालवणार्‍या दोनपेक्षा अधिक मुली नव्हत्या, तिथे एका स्त्रीने अर्थात नीता पाटील यांनी ‘संजीवनी रक्तपेढी’ची स्थापना केली. रक्तपेढी सुरु केली म्हणजे त्याचा दर्जा सर्वोत्तम राखावाच लागतो, अन्यथा रुग्णाला अशुद्ध, तपासणी न केलेले रक्त जाऊ शकते. त्यासाठी रक्तगट तपासणी, ‘हिपेटायटिस बी’, ‘हिपेटायटिस सी’, मलेरिया, एड्स, गुप्तरोग आदी आजार रक्तदात्याला नाहीत ना, याची तपासणी करणार्‍या मशिनरींची आवश्यकता असते. त्यानंतर एकतर पूर्ण रक्त किंवा रक्तघटक वेगळे करून साठवले जातात. जसे की लाल रक्त पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेट. या सर्व प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा अफाट किमतीची असते आणि रक्तपेढीसारख्या अत्यावश्यक सेवेला सरकारची कोणतीही मदत मिळत नाही किंवा आमदार/खासदार निधीत कसलीच तरतूद नसते. परिणामी, एवढा मोठा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित रक्तपेढीच्या संचालकांवर येते. २०१४ मध्ये रक्तविघटनाची सोय ‘संजीवनी रक्तपेढी’ येथे २००० पासून असलेल्या ‘साई हेल्थ केअर फाऊंडेशन’ या ट्रस्टमार्फत सुरू करण्यात आली. जरी ‘साई हेल्थ केअर फाऊंडेशन ट्रस्ट’ असली तरी तालुक्याला मोठ्या कंपन्या नसल्याने कोणतेही ‘सीएसआर’ फंड न मिळाल्याने किंवा कुठूनही देणगी न मिळाल्याने, ट्रस्टच्या अध्यक्षा या नात्याने नीता पाटील यांनी पदरमोड करून, पतीच्या वेतनाचा, भविष्य निर्वाह निधीचा पैसा खर्च करून, प्रसंगी स्वतःचे दागिने गहाण ठेऊन ही यंत्रणा उभारली व सदर सोय कोपरगावकरांना उपलब्ध केली.
 
 
आज ‘संजीवनी रक्तपेढी’ येथे रक्तगट, रक्तजुळवणीसाठी अत्यानुधिक ‘जेल टेक्नॉलॉजी’, तर ‘हिपेटायटिस बी’, ‘हेपटायटिस सी’, मलेरिया, एड्ससाठी ‘एलिसा टेक्नॉलॉजी’, रक्तघटक वेगळे करण्यासाठी पूर्ण स्वयंचलित ‘सेल सेपरेटर टेक्नॉलॉजी’, रक्ताच्या अचूक प्रमाणासाठी ’करशोर्लीश’ टेक्नॉलॉजी व उच्च दर्जाचे रेफ्रीजरेटेड ‘सेंट्रीफ्युज’ फ्रीज वापरले आहेत. सध्यातरी सरकारी नियमांनुसार रक्तपेढी थॅलेसेमिया, हिमोफिलिया रुग्णांना मोफत रक्त पुरवते, पण अन्य रुग्णांची, तसेच रक्तदान शिबीर आयोजकांची, रुग्णांच्या नातेवाईकांची मोफत रक्त मिळावे, अशी अपेक्षा असते. परंतु, रक्तपेढी चालवण्यास, रक्त तपासणीस येणारा खर्च सरकारी नियमांनुसार फक्त ’उेर्पीीारलश्रशी’ला येणारा खर्चच घेतला जातो. त्यातही गरीब रुग्णाला दिली जाणारी सवलत व कोणाहीकडून न मिळणारे पाठबळ यामुळे मोफत रक्त देऊ शकत नाही.
 
 
नीता पाटील यांच्या रक्तपेढीतील २७ वर्षांच्या अनुभवात असे अनेक प्रसंग आले. सातत्याने रक्तपेढीतील कार्यपद्धतीची माहिती त्या देतात, तरीही त्याबाबत म्हणावी तशी जनजागृती झाल्याचे दिसत नाही. बर्‍याचदा शिबीर आयोजकांचे गैरसमज दूर करावे लागतात. एकदा तर १९९५ मध्ये रक्त पिशवीची किंमत ३५० असताना शिर्डी संस्थानच्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने ते पैसे एक-एक रुपया गोळा करुन नाण्यांच्या स्वरुपात आणले होते. पण, परिस्थितीच अशी होती की, त्या दैन्यावस्थेतील व्यक्तीलाही पैसे देऊ नको, असे म्हणण्याची त्यांची हिंमत झाली नाही. कारण, त्यासाठी खर्चच तितका येतो, असे नीता पाटील यांनी सांगितले. रक्तदानानंतर ते दर्जेदार बॅगेमध्ये साठवावे लागते, तसेच ‘सेंट्रीफ्युज’ या तापमान नियंत्रित करणार्‍या मशीनमध्ये ते ठेवावे लागते, सोबतच त्याचे वेगवेगळे घटक तयार करण्यासाठी तशा मशिनरींची आवश्यकता असते. महत्त्वाचे म्हणजे, रक्त पिशवी एक असो वा दहा असोत, त्यांना साठवून ठेवण्याची यंत्रणा २४ तास सुरूच ठेवावी लागते. पण, ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. त्यावेळी डिझेल जनरेटरचा वापर करावा लागतो, जेणेकरून रक्त पिशवीच्या सुरक्षेसाठी आवश्यक यंत्रणा सुरू राहील. मात्र, यामुळे खर्च आणखीच वाढतो. तसेच आज ‘संजीवनी रक्तपेढी’त तंत्रज्ञ, डॉक्टर्स, मदतनीस असे १४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व सुरळीत चालवून हातात पैसे उरतच नाहीत, असे नीता पाटील सांगतात. म्हणूनच रक्तपेढीसाठी सरकारी पातळीवर निधी तरतुदीची आवश्यकता असल्याचे, सरकारी पातळीवर रक्तदानोत्तर रक्ताचे काय होते, याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे आणि तोपर्यंत रक्तपेढी सुरू राहण्यासाठी देणगीची प्रचंड आवश्यकता असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.
 
 
दरम्यान, रक्ताच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करणार्‍या नीता पाटील आपल्या रक्तपेढीत स्वेच्छा रक्तदान व्हावे, यासाठी निरंतर प्रयत्नरत असतात. १९९३ मध्ये रक्तपेढी सुरू केल्यानंतर त्यावेळी स्वेच्छा रक्तदानाचे प्रमाण फक्त १४ टक्के होते, तर ८६ टक्के रक्तदान ‘रिप्लेसमेंट’चे होते, म्हणजे ज्या रुग्णाला रक्त हवे असेल त्याच्या नातेवाईक, मित्रांनी रक्तदान करायचे. पण, नंतर तेच प्रमाण बरोबर उलटे म्हणजे ८६ टक्के रक्तदान स्वेच्छेने, तर केवळ १४ टक्के रक्तदान ‘रिप्लेसमेंट’ने झाले. २००५ नंतर १०० टक्के स्वेच्छा रक्तदान झाले. रक्तपेढीत रक्तदान होते, तसेच विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचेही आयोजन केले जाते. पण, ‘संजीवनी रक्तपेढी’कडे त्यासाठी स्वतःचे वाहन नाही, ते त्या त्या दिवशी भाड्यानेच घ्यावे लागते, असे त्या सांगतात. रक्ताच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता राहू नये म्हणून उत्तम मशीनरी, साठवणूक क्षमता विकसित केल्याने, त्यासाठी अक्षरशः लाखो-कोट्यवधी रुपये खर्च केल्याने वाहन घेण्याकडे लक्षच दिले नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, नीता पाटील यांचे रक्तपेढी स्थापनेचे, रक्तदान जागृतीचे कार्य पाहून त्यांना ‘ग्लोबल रेकॉर्ड’चा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त रक्तपेढीकडे कोणीही समाजसेवा म्हणून न पाहता उद्योग म्हणूनच पाहतो, अशी खंत त्या व्यक्त करतात. आज ५९ वय असलेल्या नीता पाटील यांची जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत रक्ताच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता रक्तपेढी चालवण्याची इच्छा आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!
 
 
यशाचा मूलमंत्र
 
 
आतापर्यंतचा प्रवास आपल्या कुटुंबीयांच्या आणि सहकारी कर्मचार्‍यांच्या साथीने पूर्ण केल्याचे नीता पाटील यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला डॉ. मुळे त्यांच्याबरोबर रक्तपेढीच्या स्थापनेत होते, पण नंतर २००० साली ‘साई हेल्थकेअर फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आणि नीता पाटील रक्तपेढीच्या कर्त्याधर्त्या झाल्या. त्यानंतर आजपर्यंत सहकार्‍यांच्या ‘टीमवर्क’मुळेच रक्तपेढी व्यवस्थित चालू शकली.
 
@@AUTHORINFO_V1@@