अंबानींचे निवासस्थान 'अँटिला' विस्फोटक प्रकरणी धक्कादायक माहिती उघड
मुंबई: काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या 'अँटिला' च्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. दहशतवादविरोधी पथक सातत्याने याचा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांचे पथकही २,००० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात एक नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस पीपीई कीट परिधान करून घटनास्थळाजवळून जाताना दिसत आहे.
यापूर्वी उघड झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक स्कॉर्पिओ कार आणि इनोव्हा कार दिसत होती. आणि आता समोर आलेल्या व्हीडीओनुसार पीपीई किट घालणारा माणूस कारचा ड्रायव्हर असू शकतो. आणि त्याने आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किटचा वापर आपली ओळख लपवण्यासाठी केला असावा, असा संशय आहे. त्यामुळे आता मुंबई एटीएसच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोठा सुगावा लागला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
एनआयए कडूनही होतोय सदर प्रकरणाचा तपास
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिल्याच्या बाहेर स्कॉर्पिओमध्ये विस्फोटक पदार्थ सापडल्याची चौकशी आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) करीत आहे. शिवाय यासंदर्भात महाराष्ट्र एटीएस देखील तपास करत आहे. तसेच स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी रविवारी महाराष्ट्र एटीएसने एफआयआर दाखल केला होता.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सदर प्रकरणाच्या चौकशीत एनआयएच्या प्रवेशाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "मनसुख हिरेनच्या मृत्यूप्रकरणात एटीएस चौकशी करत आहे. व्यवस्था फक्त एका माणसासाठी नाही. आधीच्या सरकारचीही अशीच व्यवस्था होती. असे असूनही, जर केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवले तर याचा अर्थ काहीतरी चूकत आहे. जोपर्यंत ते उघड करणार नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही."