जगा आणि जगू द्या! : प्रा. डॉ. अनुराधा पोतदार-जव्हेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |

mahila din _1  



समाजकारण, राजकारण करताना महिलांचे जीवन नेमके कसे असते? घर, कुटुंब सांभाळून आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कामही त्या करत राहतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या गिरगाव प्रभाग क्र. २१८च्या भाजपच्या नगरसेविका प्रा. डॉ. अनुराधा पोतदार-जव्हेरी. त्यांनी नगरसेविका म्हणून गेल्या चार वर्षांपासून प्रभागात उत्तम कार्य केलेच, पण कोरोना काळात मात्र अनुराधा पोतदार यांनी स्वच्छता, आरोग्य, वंचितांना भोजन या विषयात धडाडीने काम केले. ‘ऑक्सिमीटर’, ‘थर्मल गन’, ‘सॅनिटायझर’, अन्नधान्य, तयार पदार्थ, ‘आयुष काढा’, ‘आर्सेनिक अल्बम’ या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप, धूरफवारणी आदींद्वारे प्रभागातील नागरिकांची काळजी घेतली. आज जाणून घेऊया, त्यांच्याच शब्दांतून, त्यांचे समाजकारण-राजकारणातील अनुभव आणि कुटुंबाला, स्वतःला वेळ देण्याबाबत त्या काय म्हणतात ते...



सुरुवातीचा काळ मी सिद्धार्थ महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम केले, तर त्यानंतर जवळपास २० वर्षांपासून मी ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी विभागात कार्यरत आहे. पण, नोकरी करत असतानाही समाजकारणात मी सक्रिय होते. परिसरातील कोणाला रुग्णालयात नेणे, रुग्णालयात पोहोचवणे, अशाप्रकारे प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रात काम करत होते. आजी-आजोबांचा आणि आई-वडिलांचा वारसाही समाजकारणाचाच होता आणि त्यातूनच पुढे एक संधी आली व मी राजकारणात आलेे. तत्पूर्वी ‘राष्ट्र सेवा दला’तूनही मी वडिलांसह काम करत होते. पण, नंतर मात्र मला राजकारणाची दिशा मिळाली आणि त्यातच काम करायचे ठरवले. आज मी भारतीय जनता पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेच्या गिरगाव-प्रभाग क्र. २१८ची नगरसेविका आहे. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमीही गिरगावच! तथापि, मला राजकारणात येण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला, असे मी म्हणणार नाही. कारण, प्राध्यापिका म्हणून काम करत असल्याने विद्यार्थिनींना समजून घेण्याचा अनुभव माझ्याकडे होताच. त्याच पद्धतीने मी लोकांच्या अडचणी, समस्या समजून घेत राहिले. प्रामुख्याने वयस्कर लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, तर त्यांचे आशीर्वादही मिळतात, असे माझे मत आहे व तसे करत गेले. त्यातून माझ्या कामाची सुरुवात झाली. जीवन जगताना अनेक समस्या उद्भवत असतातच, त्याशिवाय आपले जगणेच नसते. त्यातून वाट काढत जाणे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे, जी मी केली.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यक्षेत्रात माझा प्रभाग येत असल्याने त्यांच्याकडूनही कामाची प्रेरणा मिळत राहिली. ‘कुठल्याही व्यक्तीला एखाद्या कामासाठी तुमच्याकडे सातत्याने यावे लागू नये,’ असे ते नेहमी सांगत असत. उत्पन्नाचा दाखला किंवा अन्य कागदपत्रे त्यांना हवी असतात, पण त्यांना जे काही हवे, ते ताबडतोब देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही ती गोष्ट त्या पद्धतीने करत राहिलो. या सगळ्यामागे आमदार मंगलप्रभात लोढा यांची प्रेरणा होती. नगरसेवकांना महानगरपालिकेकडून तीन प्रकारचा निधी मिळत असतो. त्या सगळ्या निधीचा उपयोग आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी करायचा मी निश्चय केला होता व तसे गेली चार वर्षे केलेही आणि पुढचे एक वर्षही करणार आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधा व सेवेसाठी तो संपूर्ण निधी मी वापरणार आहे. मात्र, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ याप्रमाणे लोक बोलत असतातच. पण, आपण आपल्या मनाने स्वच्छ, शुद्ध असलो की, आपल्याला कुठलेही काम करण्यास प्रेरणा मिळत राहते आणि ती आम्हाला आ. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून मिळत असते.

समाजकारण किंवा राजकारणात काम करताना कुटुंबाचे सहकार्य फार गरजेचे असते. माझ्या सासू-सासर्‍यांनी ‘निश्चिंतपणे पुढे जा’ असेच सांगितले. पती आणि दोन्ही मुलांचे आणि सुनेचे सहकार्य अनमोल आहे. तसेच माझ्या आजी-आजोबांकडून मला काम करण्याची प्रेरणा मिळाली. एक स्त्री म्हणून काम करताना आपल्याला मुलांकडे, कुटुंबाकडेही लक्ष द्यावेच लागते. म्हणतात ना, ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी’ तशीच आपली अवस्था असते आणि ते माझ्याही बाबतीत होतेच. बाहेर वावरत असताना स्त्री कितीही उच्च पदावर असो, तिचे लक्ष घराकडे असते, ती कुटुंबाचा विचार करते आणि कुटुंबसुद्धा त्याच पद्धतीने तिला सहकार्य करते, हा माझा अनुभव आहे.महत्त्वाचे म्हणजे, अनेकदा घरातल्या छोट्या-छोट्या गोष्टी करण्यासही वेळ मिळत नाही. कारण, कोणत्याही क्षणी, संकटातल्या, अडचणीतल्या लोकांकडून फोन येऊ शकतो. रात्री-अपरात्री कोणालाही मदतीची गरज भासते. ‘कोविड’च्या काळात तर त्याचा मला खूप मोठ्या प्रमाणावर अनुभव आला. अक्षरशः रात्री दोन-दोन वाजताही लोकांनी आपत्कालीन मदतीसाठी फोन केले. तसेच कुठे आग लागली, दुर्घटना घडली तरी ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून लोक आपल्याला फोन करतात. पण, यावेळी माझे कार्यकर्ते नेहमीच मदतीसाठी पुढे असल्याचे मी पाहिले. म्हणजे कार्यकर्ते आपल्या पातळीवर समोरचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतातच. पती आणि मुलांनासुद्धा माझे काम माहिती असल्याने ते जबाबदारी ओळखतात आणि जसे कुटुंबाचे सहकार्य मिळते, तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही सहकार्य मिळते. अखेर, मी जे काम करते ते एक ‘टीमवर्क’ आहे. इथे एकट्याने तुम्ही काहीच करू शकत नाही. आमची ‘टीम’ चांगली आहे, असे लोक यामुळेच म्हणतात. गिरगावातल्या नागरिकांना त्यामुळे फायदा होतो.


आज महिला दिन आहे, पण मी ‘एसएनडीटी’मध्ये काम करत असताना, महिला दिनाचा कोणताही कार्यक्रम नसायचा. कारण, ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठ असल्याने वर्षाचे ३६५ दिवस महिला दिनच साजरा करत असतो. त्यामुळे वेगळा असा कार्यक्रम नव्हता. आज आपण ‘महिला दिन’ साजरा करत आहोत आणि यावेळी मला महिलांना काही सांगावेसे वाटते, महिलांनी स्वतःसाठी थोडा का होईना वेळ वेगळा काढला पाहिजे. आठवड्यातला, महिन्यातला, स्वतःचा महिलांचा वेळ असला पाहिजे. आपले मन ज्यात रमते, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कारण, आपण आयुष्यभर दुसर्‍यांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जगत असतो. पण, स्वतःसाठी जगणे आणि वेळ काढणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे मला वाटते. कारण, आपण वेगवेगळ्या नात्यांच्या संदर्भाने जगतो. मुलगी, बहीण, आई, पत्नी, सखी असतो. ही सगळी नाती निभावताना प्रत्येक स्त्रीने आत्मा, बुद्धी, मन आणि शरीर या चारही संदर्भात स्वतःचा विचार केला पाहिजे.
आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या राहिल्या असतील, त्या आता, वेळ मिळेल तेव्हा करायला पाहिजेत. आज माझी पन्नाशी उलटली आहे, तरीही अनेक गोष्टी ज्या करायच्या राहून गेल्या, असे वाटते त्या मी करते. आपण मुलांना, घरातल्यांना जे आवडते, ते करत असतो, पण त्यावेळी आपण आपले मन मारत असतो. नंतर आयुष्याच्या उत्तरार्धात, आपल्याला कधीतरी वाटते की, “अरे, हे करायचे राहिले किंवा करायला हवे होते, तर आपण आजपासूनच निश्चय केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या करताना मला निर्मळ आनंद मिळाला पाहिजे.” शेवटी मी शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या ‘नारी गौरव गीता’च्या ओळी महिला दिनी सर्व महिलांना समर्पित करुन थांबेन. कवी लिहितात,
हे शक्तिशालिनी, मृदुलभाषिणी नारी।
तुम क्षण में दुर्गा, दुजे क्षण में गौरी॥

नारीची ही दोन्ही रुपे आहेत, ती जशी दुर्गा आहे, तशीच ती गौरीही असते. या दोन मुख्य रुपातून नारीला आपण पाहत असतो. पुढे कवी लिहितात,

तुम वत्सलता असिलता मा पावन,
तुम कन्यारुपी पिता देव का जीवन।
तुम भगिनीस्वरुपी विश्व सुरक्षा बंधन,
तुम सखी, सचिव, पत्नी तुम मनभावन।
हे नारी, तुम हो भवसागर अधिकारी,
तुम क्षण में दुर्गा, दुजे क्षण में गौरी॥


- प्रा. डॉ. अनुराधा पोतदार-जव्हेरी
@@AUTHORINFO_V1@@