महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतल्याचे आज आपल्याला अवतीभवती दिसतेच, पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व गाजवल्याची उदाहरणे निवडक अपवाद वगळता फारशी दिसत नाहीत. मात्र, ‘कीर्ती महिला संस्था’ आणि ‘भाग्यश्री महिला पतसंस्थे’च्या संस्थापक अध्यक्षा भारती पवार यांनी सहकार क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. महिलांनी महिलांसाठी पतसंस्थेची स्थापना करुन त्यांनी महिलांच्या घरगुती गरजांपासून व्यावसायिक आर्थिक गरजा पूर्ण केल्या. जाणून घेऊया, त्यांचा आजपर्यंतचा प्रवास त्यांच्याच शब्दांत...
मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची. माझे शिक्षण कोपरगावलाच झाले आणि वयाच्या 18व्या वर्षी लग्न होऊन मी वसईतील पाटील-पवार या सधन कुटुंबात आले. आमच्या पाटील-पवार कुटुंबाचा पिढीजात ठोक कांदा-बटाट्याचा व्यवसाय होता. तसेच पाटील-पवार कुटुंबाने सुवर्णपेढी क्षेत्रातही पदार्पण करत ‘पाटील-पवार सुवर्णपेढी’ची स्थापना केली. गेली जवळपास ३० वर्षे आमचा तो व्यवसायही सुरू आहे. आता आमच्या ‘पाटील-पवार सुवर्णपेढी’च्या वसई-विरारमध्ये चार शाखाही कार्यरत आहेत. म्हणजे माझे कुटुंब आणि मी व्यवसायातच होतो आणि तरीही, सामाजिक कार्याची मला पहिल्यापासूनच आवड होती. वेगवेगळ्या क्षेत्रांतील समाज घटकांसाठी काम करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. त्याच मालिकेतील माझे आवडते, मला मनस्वी आनंद देणारे काम म्हणजे ‘भाग्यश्री महिला पतसंस्थे’चे. मी स्वतःच ‘भाग्यश्री महिला पतसंस्थे’ची संस्थापक अध्यक्षा असून वसई-विरार कार्यक्षेत्र निवडून तिथे स्वयंभूपणे उभी राहिलेली ही पतसंस्था आहे. कुठल्याही पक्षाचा, संस्थेचा, पगारदार-नोकरदार असा कोणाचाही पाठिंबा नसताना स्वबळावर मी ‘भाग्यश्री महिला पतसंस्थे’ची स्थापना केली आहे.
तत्पूर्वी मी ‘कीर्ती महिला संस्थे’ची स्थापना केली होती. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी स्वतः आणि किरण बडे अशा दोघांनी मिळून आम्ही मेहनतीने ही संस्था चालवली. ‘कीर्ती महिला संस्थे’चे काम करत असतानाच आपल्याला सगळ्या गोष्टींचे सोंग आणता येते, पण पैशांचे सोंग आणता येत नाही, तसेच महिलांना स्वबळावर पैसा उभा करणे कठीण असते, हे लक्षात आले. तसेच महिलांबरोबर काम करताना त्यांनी खरी गरज पैशाची किंवा कर्जाची असते, हेही समजले. त्याचवेळी महिलांची ही गरज आपण भागवू शकत नाही का, आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का, असा विचार केला. तो विचार मनात ठेवूनच मी त्या संदर्भातील माहिती मिळवली, गोळा केली आणि ‘भाग्यश्री महिला पतसंस्थे’ची पायाभरणी केली. आज या पतसंस्थेच्या माध्यमातून वसई-विरारमधील महिलांच्या आर्थिक गरजा भागवण्याचे काम ‘भाग्यश्री महिला पतसंस्थे’च्या माध्यमातून केले जात आहे. त्याचबरोबर मी वसईतल्या ‘मराठा संस्थे’ची पहिली महिला अध्यक्षा म्हणूनही आठ वर्षे काम केले. तसेच गेली २०-२२वर्षे मी तिथे पदाधिकारी म्हणून काम करत आहे. सोबतच ‘कीर्ती महिला संस्थे’चीदेखील मी संस्थापक-अध्यक्षा आहे. त्याचबरोबर छोट्या-मोठ्या इतरही संस्थांमध्ये मी पदाधिकारी म्हणून काम करत आहे. ‘सहकार भारती’चे वसई जिल्हाध्यक्षपद माझ्याकडे आहे. या सर्वच संस्थांच्या माध्यमातून जमेल, तसा खारीचा वाटा उचलून महिलांना मदत करण्याचा माझा नेहमी उद्देश असतो.
मात्र, आज या टप्प्यावर आलेले असताना व मागे वळून पाहताना संघर्षाचे दिवस आठवतात. तसेच मी हे काम कसे करू शकले, कुठून प्रेरणा मिळाली, कोणी प्रेरणा दिली, याचाही विचार मनात येतो. त्यावेळी मला बालपणीचे दिवस आठवतात. बालपणी आम्ही शाळांना सुट्टी लागली की, गावी जात असू. तिथे गेले की, शेतात, रानात, कष्ट करणार्या महिला दिसत. का कुणास ठाऊक, पण त्या महिलांबद्दल मनात आस्था निर्माण होत असे. तसेच त्या महिला किती काम करतात, त्यांच्या मनात काही भावना आहेत की नाही, त्यांना रोजच्या जगण्याहून निराळे जग हवे आहे की नाही, असे अनेक प्रश्न मला पडत. त्या प्रश्नांची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करत असे. तसेच आता नाही, तर जेव्हा-केव्हा मला शक्य होईल, तेव्हा त्यांची उत्तरे शोधेन, असे ठरवले. खरोखर, त्यावेळी पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतानाच मी कर्तृत्वाकडे धाव घेतली, असे वाटते. त्यामुळेच मी महिला संस्थेची, पतसंस्थेची स्थापना केली व महिलांसाठी काम करण्यास सुरुवात केली. महिलांसाठी काम करण्याची तळमळ निर्माण झाली आणि आजही मी माझे काम करत आहे.
परंतु, सहकार क्षेत्रात महिलांनी महिलांसाठी चालवलेली पतसंस्था उभी करणे, खरोखरच आव्हानात्मक होते. कारण, मी यासंदर्भात ज्या कोणाचा सल्ला घ्यायला गेले, त्यावेळी माझा भ्रमनिरास झाला. महिला या क्षेत्रात धडाडीने काम करूच शकत नाही, असे अनुभवही आले. मी म्हटले की, असे काय कारण असेल की, मी किंवा महिला या क्षेत्रात काम करू शकत नाही? माझ्या मनात याबाबत जिज्ञासा निर्माण झाली, मी त्याबद्दल अभ्यास केला व पतसंस्था उभारणीची प्रक्रिया सुरु झाली. पण, याचवेळी कार्यालयीन व्यवस्थापन, सरकारी नियम, अनुभवाची कमतरता, अशा समस्याही उभ्या राहिल्या. सोबतच संस्था उभारणीतली पहिली अडचण अशी असते की, सुरुवातीला चार-आठ महिला कार्यरत राहू शकतात. मात्र, पुढच्या पिढीपर्यंत या कामाचे बीज रोवले नाही, तर त्याचा वृक्ष-वटवृक्ष तयार होत नाही. मलाही हा अनुभव यायला लागला. म्हणजे गरज असली, तरी महिलांना कर्ज देताना त्यातल्या अडचणी समजल्या. कारण, महिलांच्या नावावर खरोखर कोणतीही मालमत्ता नसते, मग तिला कर्ज कसे द्यायचे? त्यासाठी खूप गोष्टींचा अभ्यास आणि संघर्ष करावा लागला, करतही आहे. तसेच महावितरणची वीजबिल भरणा केंद्रेही आम्ही चालवायला घेतली, जेणेकरून आम्हाला व्यवस्थापनाचा अनुभव मिळेल. त्यातून आमचा व्यवस्थापनाचा खर्चही भागवला गेला आणि सलग तीन वर्षे आमच्या पतसंस्थेला ‘अ वर्ग’ दर्जा मिळत आहे.
सामाजिक कार्य करताना, संघर्ष करताना अर्थातच कुटुंबाचे प्रोत्साहन-सहकार्य मात्र मला सातत्याने लाभले. कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी आज जे करत आहे, जे केले आहे, ते करूच शकले नसते. कुटुंबाशिवाय यश शक्यच नव्हते. माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी, मला कायम सहकार्य केले. तसेच काम करताना विशेष मार्गदर्शन आणि पर्वतासारखा पाठिंबा माझ्या पतिराजांचाही लाभला. तसेच सुरसिंग पाटील, नीळकंठ पाटील यांनीही चांगले सहकार्य केले. ‘भाग्यश्री महिला पतसंस्था’ चालवताना पहिले ५०० सदस्य करताना ते काम मी कुटुंबाच्या आणि मैत्रिणींच्याच साहाय्याने करू शकले. माझ्या कुटुंबामुळेच मी आतापर्यंतची वाटचाल केली, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. तसेच संस्थेच्या सर्व संचालिका, कर्मचार्यांच्या सहकार्यामुळेदेखील मी इथपर्यंत पोहोचू शकले. विशेष उल्लेख करण्यासारखे सहकारी आणि मार्गदर्शक म्हणजे डॉ. प्रिया चाफेकर, प्रतिभा पाटील, लातूरचे राजू मोरे, इतर व्यवस्थापक पीटर डिसुझा, राफायल लोपेश यांच्यामुळे आमच्या पतसंस्थेची गाडी रुळावर आली. सोबतच गोखले सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले. आज मी ‘कीर्ती महिला संस्था’, ‘भाग्यश्री महिला पतसंस्था’, ‘सहकार भारती’ यांसारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी, समाजासाठी काम करते, पण इतरही महिलांनी आपापल्या आवडत्या क्षेत्रात असे काम केले तर मलाही आनंद होईल. अर्थातच महिलांनी काम करायचे म्हणजे समाजातून प्रत्येक वेळी सहकार्य-पाठिंबा-प्रोत्साहन मिळेलच, असे नाही. कधी सर्व सुरळीत होईल, कधी ठेचही लागेल. पण, या प्रत्येक वेळी महिलांनी निर्भीड राहिले, तर यश त्यांचेच आहे, हेदेखील मी सांगते. सोबतच संत तुकाराम महाराजांचे ‘एकमेका सहाय्य करु, अवघे धरू सुपंथ,’ हा संदेशही सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे, असे मला वाटते.
- भारती पवार