स्पष्ट निर्देशासाठी ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’चे सरकारकडे गार्हाणे
ठाणे: गणेशोत्सव, गावच्या वार्षिक जत्रोत्सवापाठोपाठ आता होळी-शिमग्यालाही कोरोनाचा डंख लागला आहे. ठाणे, मुंबई परिसरातील चाकरमान्यांना या सणांसाठी गावाकडे जाण्याचे वेध लागतात. परंतु, सरकारकडून शिमगा सणाबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने कोकणवासी संभ्रमात पडले आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता यंदा शिमगा साजरा करायचा की नाही? याबाबतचे नियम व अटी सरकारने स्पष्ट करावेत, असे गार्हाणे ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’ने घातले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून चाकरमान्यांचे सगळेच सण ‘लॉकडाऊन’ झाले आहेत. यंदा २८ मार्चला होळी आणि २९ मार्चला धूलिवंदन आहे. कोकणात शिमगोत्सवाची तयारी आठ दिवस आधीपासूनच करण्यात येते. झाड (होळी) आणण्यापासून ते होम करण्यापर्यंत सर्व धार्मिक विधी केले जातात. सर्व नातेवाईक, आप्तस्वकीय-मित्रमंडळी एकत्र येऊन संस्कृती व परंपरा जोपासतात. शिमग्यासाठी रेल्वे, एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्सला मोठी मागणी असते. दरवर्षी शिमग्याच्या महिनाभर आधीपासूनच रेल्वे-बस-खासगी ट्रॅव्हल्सचे आगाऊ आरक्षण केले जाते. लस येऊनदेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सगळेच हादरले आहेत. मुंबई-ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंदा गावी जाण्यासाठी आरक्षण करावे की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यातील कोरोनास्थिती लक्षात घेता शिमगोत्सव साजरा करण्यासाठी शासकीय तसेच प्रशासकीय नियमावली जाहीर करून परवानगी द्यावी. उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे, सूचना जाहीर कराव्यात. शासनाच्या अटी व शर्थींचे पालन करून उत्सव साजरा करण्यात येईल. याबाबत नियम ठरवून द्यावे, असे निवेदनवजा गार्हाणे ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’चे प्रमुख राजू कांबळे यांनी सरकारला घातले आहे.