२ हजाराची नोकरी ते ३५ कोटींचा उद्योग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2021   
Total Views |

Sanjay Shah_1  
 
 
भरतभाई शाह म्हणजे सुक्यामेव्याचे व्यापारी. आपला उद्योग सचोटीने आणि प्रामाणिकपणे करणारे एक व्यापारी. त्यांची मस्जिद बंदर परिसरात सुक्यामेव्याचे आयातदार व घाऊक व्यापारी म्हणून ओळख होती. त्यांचा मुलगा संजयने स्वत:चे उद्योगविश्व निर्माण केले. ते मात्र वेगळ्या क्षेत्रात. ही वेगळी उद्योजकीय कथा आहे, ‘पिरॅमिड इंडस्ट्रीज’चे संचालक संजय शाह यांची...
 
 
"भगवान और ग्राहक कभी भी पधार सकते हैं। इसलिए हमेशा धंदे पे रहना।” भरतभाईंनी त्यांच्या मुलाला संजयला दिलेला हा सल्ला कोणत्याही व्यवस्थापनाच्या पुस्तकात सापडणार नाही. अगदी साध्या सोप्या भाषेत त्यांनी कोणत्याही उद्योजकाला उद्योगाविषयी सतत सतर्क राहण्याचे बाळकडू दिले आहे. ग्राहकास थेट देवाचा दर्जा देऊन किती उच्च दर्जाची सेवा दिली पाहिजे, हेसुद्धा सूचित केले आहे. भरतभाई शाह म्हणजे सुक्यामेव्याचे व्यापारी. आपला उद्योग सचोटीने आणि प्रामाणिकपणे करणारे एक व्यापारी. त्यांची मस्जिद बंदर परिसरात सुक्यामेव्याचे आयातदार व घाऊक व्यापारी म्हणून ओळख होती. त्यांचा मुलगा संजय यास त्यांनी वरील कानमंत्र दिला होता. संजयने हा कानमंत्र ऐकला, अंमलात आणला आणि स्वत:चे उद्योगविश्व निर्माण केले. ते मात्र वेगळ्या क्षेत्रात. ही वेगळी उद्योजकीय कथा आहे, ‘पिरॅमिड इंडस्ट्रीज’चे संचालक संजय शाह यांची...
 
 
भरतभाई मूळ गुजरातमधल्या कच्छचे. त्यांचं कुटुंब म्हणजे पारंपरिक संस्कार जपणारे, जैन धर्माचे तंतोतंत पालन करणारे. त्यांचा विवाह भानूबेन यांच्यासोबत झाला. या दाम्पत्यास दोन अपत्यं. मोठी कन्या कृपा, तर धाकटे संजय. मुंबईत आल्यानंतर भरतभाई सुरुवातीस औषधांच्या घाऊक व्यापारात उतरले. नंतर त्यांनी सुकामेव्याच्या व्यवसायात प्रवेश केला. त्यांच्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि परोपकार या गुणांमुळे ते व्यवसायात झपाट्याने यशस्वी झाले. मस्जिद बंदर परिसरात सुक्यामेव्याचे आयातदार व घाऊक व्यापारी म्हणून त्यांनी अल्पावधीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा मुलगा संजयही अधूनमधून मस्जिद बंदरला जात असे. बाबांना ग्राहकांशी बोलताना पाहायचे. त्यांचं शालेय शिक्षण ‘दादर पारसी स्कूल’मध्ये झालं, तर माध्यमिक शिक्षण माटुंग्याच्या ‘डॉन बॉस्को’मध्ये झालं. दहावीची परीक्षा ते विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. पुढे अकरावी-बारावी त्यांनी ‘एसआयडब्ल्यूएस’मधून पूर्ण केली, तर बी.कॉमची पदवी १९९२ मध्ये पोद्दार महाविद्यालयातून मिळवली.
 
पुढे दोन वर्षे त्यांनी बाबांच्या व्यवसायाला हातभार लावला. मात्र, त्यांचं मन त्या व्यवसायात रमत नव्हतं. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, असंच त्यांचं मन त्यांना बजावत असे. पण नेमकं काय हेच माहीत नव्हतं. संजयच्या मामांचा प्लास्टिकचा व्यवसाय होता. मामांच्या या व्यवसायात ‘सुपरवायझर’ म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीचा पगार होता फक्त दोन हजार रुपये. सहा वर्षे त्यांनी तिथे काम केलं. प्लास्टिक इंडस्ट्रीमधलं संपूर्ण ज्ञान मिळवलं. सहा वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. नोकरी सोडली तेव्हा त्यांचा पगार होता पाच हजार रुपये.
 
संजयला या सहा वर्षांत प्लास्टिक उद्योगाविषयी पुरेसं ज्ञान मिळालं होतं. या ज्ञानाचा उपयोग स्वत:च्या उद्योगासाठी करायचा हे मनोमन ठरवून १९९९ साली अंधेरीच्या एका औद्योगिक वसाहतीत १०० चौरस फुटांचा गाळा त्यांनी भाड्याने घेतला. ‘पॅकिंग’साठी लागणाऱ्या ‘प्लास्टिक फिल्मस’चा ते व्यापार करू लागले. ‘पिरॅमिड इंडस्ट्रीज’ची सुरुवात येथूनच झाली. यानंतर २००२ मध्ये त्यांनी वसईमध्ये ८०० चौरस फुटांचा एक गाळा घेतला. या गाळ्यामधून त्यांनी प्लास्टिक निर्मितीचा कारखाना सुरू केला. प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, वडिलांप्रमाणेच परोपकारी वृत्ती, बोलका स्वभाव या स्वभावगुणांमुळेच अल्पावधीत संजय या व्यवसायात स्थिरावले. निव्वळ स्थिरावले नाहीत, तर प्रचंड यशदेखील मिळवले.
 
 
वसईच्या ज्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये संजय शाह यांचा एक भाड्याचा गाळा होता, तोच त्यांनी थेट खरेदी केला. पुढे त्याच माळ्यावर त्यांनी पाच गाळे विकत घेतले. कालांतराने संजय शाह यांनी दमण येथे २५ हजार चौरस फुटांचा कारखाना भाड्याने घेतला. दोन कामगारांनी सुरू झालेला हा औद्योगिक प्रवास ६५ हून अधिक कामगारांसह सुरूच आहे. कृषी, सौंदर्यप्रसाधने, मिठाई, ग्राहकोपयोगी वस्तू, मसाले आणि औषधी अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांना ‘पिरॅमिड इंडस्ट्रीज’ आपली उत्पादने पुरविते. या उत्पादनांत ‘झीपर पाऊचेस’, ‘स्पॉऊट पाऊचेस’, ‘स्टॅण्ड अप पाऊचेस’, ‘पेपर फॉईल पाऊचेस’, ‘लॅमिनेटेड पाऊचेस’, ‘पॉलिस्टर फिल्म्स’, ‘हिट सीलेबल फिल्मस’, ‘लॅमिनेशन फिल्म्स’ आदींचा समावेश आहे. ‘एव्हरेस्ट’ मसाला, ‘ब्रिटानिया’, ‘धारीवाल ग्रुप’, ‘डॉम्स’ यासारख्या अनेक मोठ्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. चांगलं काम करत राहा, उच्च दर्जाची सेवा देत राहा, नफा तुमच्या पाठोपाठ येईल, हे त्यांच्या उद्योगाचं एक तत्त्व आहे. हे तत्त्व पाळल्यामुळेच निव्वळ १९ वर्षांत ते ३५ कोटी रुपयांहून जास्त रुपयांची उलाढाल आज करत आहेत.
 
संजय शाह यांच्यामध्ये संघटनकौशल्य जणू उपजतच आहे म्हणून की काय, ते प्लास्टिक उद्योगक्षेत्रातील ‘शिखर संघटने’चे अध्यक्ष झाले. ‘फ्लेक्झिबल पॅकेजिंग इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेडर्स असोशिएशन’ अर्थात ‘एफपीआयटीए’ या संघटनेचे अध्यक्ष झाले. प्लास्टिक उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेस त्यांनी मोलाचे योगदान दिले. ‘बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन’ या ७२ वर्षे जुन्या असलेल्या औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. मुंबई शहरातील सुमारे १५०० हून अधिक उद्योजक या संस्थेचे सभासद आहेत.
 
या संघटनेच्या माध्यमातून नव्या दमाचे आणि नव्या संकल्पना विकसित करणारे उद्योग क्षेत्रातील नेतृत्व घडविण्याचा संजय शाह यांचा मानस आहे. हा मानस फक्त उराशी न बाळगता, त्यांनी तो प्रत्यक्षात उतरवलेलादेखील आहे. याकरिता मुंबईतील ‘एन. एम. महाविद्यालया’सोबत त्यांनी एक करारदेखील केला आहे. या करारानुसार या महाविद्यालयातील ३२० विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे दिले जाणार आहेत. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी हा प्रकल्प विद्यापीठांतर्गत ९०० महाविद्यालयांत राबविण्याची सूचना ‘बीआयए’ला केली आहे. ‘बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन’ची १५०० हून अधिक सदस्यसंख्या आहे. यातील बहुतांश उत्पादक असून सेवाक्षेत्रातील उद्योजकांची संख्यादेखील मोठी आहे. उत्पादक व सेवाक्षेत्रातील उद्योजकांना त्यांचे उत्पादन वा सेवा जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवता याव्यात, त्यांची विक्री व्हावी, ग्राहकांना ते उत्पादन वा सेवा किफायतशीर किंमतीत मिळावी, यासाठी ’बीआयए ऑनलाईन मॉल’ सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योजकांना मोठ्या उद्योजकांकडून उद्योजकतेचे धडे घेता यावे, यासाठी देश-विदेशांतील उद्योग समूहाचे अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात. जगातील सर्वोत्तम असे ज्ञान, तंत्रज्ञान भारतात आणून भारतात उत्पादने निर्माण करून जगभरात ती आयात करणे हाच या सर्व उपक्रमांचा उद्देश आहे.
 
 
संजय शाह यांचा विवाह १९९८ साली भक्ती शाह या सुविद्य तरुणीसोबत झाला. या दाम्पत्यास हिताक्षी आणि अविष्का अशी दोन कन्यारत्ने आहेत. आपल्या आयुष्यातला संस्मरणीय दिवस कोणता? खरंतर या प्रश्नाला विविध उत्तरे मिळाली असती. कोणासाठी पहिली गाडी घेतलेला क्षण, तर कोणासाठी कारखाना सुरू केलेला दिवस संस्मरणीय वाटला असता. संजय शाह यांनी मात्र वेगळे उत्तर दिले. “माझ्या मुलीचा जन्म ज्या दिवशी झाला तो माझ्यासाठी संस्मरणीय दिवस होता,” असे संजय शाह म्हणाले. एका कोट्यधीश उद्योजकावर एका कुटुंबवत्सल बापाने मात केली होती. आपली बेटीच आपल्यासाठी धनाची पेटी आहे, हे संजय शाह यांनी अधोरेखित केले. स्वत:च्या मुलीला प्राधान्य देणाऱ्या अशा बापाचा उद्योग-व्यवसायाची नेहमीच भरभराट होत राहील. संजय शाह यांची ‘पिरॅमिड इंडस्ट्रीज’ उद्योग क्षेत्रातील प्रत्येक यशोशिखर सर करत राहील.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@