पश्चिम घाटामधून फुलपाखराच्या नव्या उपप्रजातीचा शोध

    31-Mar-2021   
Total Views | 278
butterfly _1  H



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
भारतातील फुलपाखरांच्या प्रजातींमध्ये नव्या फुलपाखराची भर पडली आहे. पश्चिम घाटामधील केरळच्या अगस्तमलाई डोंगररांगांमधून 'नाकाडूबा' कुळातील नव्या प्रजातीच्या फुलपाखराचे संशोधन उलगडले आहे. महत्त्वाचे म्हणजे इतिहासात प्रथमच पश्चिम घाटामधून संपूर्णपणे भारतीय संशोधकांच्या चमूने फुलपाखराच्या एखाद्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
 
 
 
'लायसिनिडी' कुटुंबातील 'लाईन ब्लू' ही फुलपाखरे भारत, श्रीलंका आणि संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया, आॅस्ट्रेलिया, सामोआ पर्यंत आढळतात. या 'लाईन ब्लू' प्रजातीमधील नव्या फुलपाखरांचा शोध लावण्यात आला आहे. 'त्रावणकोर नेचर हिस्ट्री सोसायटी'चे (टीएनएचएस) डॉ. कलेश सादाशिवन आणि बैजू.के, 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (बीएनएचएस) राहुल खोत आणि वनम येथील रामासमी नाईकर या चार संशोधकांच्या पथकाने हा शोध लावला आहे. या फुलपाखराचे नामकरण 'नाकाडूबा सिहला रामास्वामी' असे करण्यात आले असून सामान्य नाव 'रामस्वामी सिक्स लाइनब्ल्यू' आणि ‘सिलोन वारायणनेली’ असे ठेवण्यात आले आहे. २०११ साली या फुलपाखराचे फोटो डॉ. कलेश सादाशिवन यांनी अगस्तमालाईमधून काढले होते. यावेळी चिखलपान करणाऱ्या इतर 'लाईन ब्लू' फुलपाखरांच्या तुलनेत या नव्या फुलापाखरांचा रंग अधिक चमकदार होता. याच चमकदार फुलपाखरांचे छायाचित्र २०१५ आणि २०१८ साली तामिळनाडूमधील थेंकसी येथून संशोधकांना मिळाले होते.
 
 
 
या नव्या उपप्रजातीमधील नर फुलपाखराच्या जननेंद्रियाच्या विच्छेदनानंतर असे दिसून आले की, ते दक्षिण भारतातील कोणत्याही 'नाकाडूबा' कुळातील फुलपााखसारखे नाही. पुढील तपासणीनंतर ते श्रीलंकेमधील 'नाकाडूबा सिहला ऑर्मिस्टन' प्रजातीशी मिळते जुळते असल्याचे आढळले. मात्र, नव्या फुलपाखराच्या जननेंद्रियांची रचना ही श्रीलंकेतील फुलपाखरापेक्षा भिन्न होती. नवी उपप्रजात केवळ अगस्तमलाईच्या मिश्र आणि कमी उंचीवरील सदाहरित जंगलासह तामिळनाडूच्या काही भागांमध्ये सापडते. ईशान्येकडील पावसाळी हंगामात या फुलपाखरांचे प्रजनन होते. साधारण सप्टेंबर ते जानेवारी हा त्यांचा प्रजनन कालावधी असला, तरी आॅक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात या फुलपाखरांचे प्रजनन घडते. नव्या फुलपाखरू उपप्रजातीचे नाव 'रामास्वामी' असे ठेवले गेले आहे कारण ती समुद्राच्या पलीकडे असलेल्या श्रीलंका आणि भारतशी संबंधित आहे.
 
 
 
हा शोध पश्चिम घाटात असणाऱ्या अषृष्ठवंशी जीवांविषयी आपल्याला किती कमी माहिती आहे हे अधोरेखित करतो. हवामानात होणारे बदल आणि अधिवास नष्टतेच्या धोक्यामुळे अषृष्ठवंशी जीवांच्या संशोधनासाठी हा महत्त्वाचा काळ आहे. अपृष्ठवंशी जीवांच्या अशा हजारो नव्या प्रजाती औपचारिक मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. - राहुल खोत, संशोधक, बीएनएचएस


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121