हिरन हत्याकांडातील आणखी एक आरोपी समोर
'अॅन्टिलिया'बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरन हत्याकांड या दोन्ही प्रकरणांचा तपास आता 'एनआयए' करत आहे. हिरन हत्याकांड प्रकरणातील आणखी एका आरोपीला 'एनआयए'च्या ताब्यात देण्यासाठी 'एटीएस'चे पथक ठाण्याहून मुंबईला रवाना झाले आहे. या व्यक्तीचं नाव 'ठक्कर' असून, वाझेला बनावट सीमकार्ड पुरवण्यासाठी त्याने मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून ठक्कर हा 'एटीएस'च्या ताब्यात होता.
'एनआयए'चे 'डीआयजी' विधी कुमार एनआयए कार्यालयात पोहोचले आहेत. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती ते घेणार आहेत.
स्वतःचे बनवले होते 'सर्च इंजिन' आणि 'मेसेजिंग अॅप'
सचिन वाझे हा तांत्रिकदृष्ट्या पारंगत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सचिन वाझेने पोलीस खात्यात येण्यापूर्वी स्वतःचे एक 'मेसेजिंग ॲप' बनवले होते. त्याने स्वतःच्या नावाचे 'सर्च इंजिन'ही त्याने बनवून घेतल्याचे समोर आले आहे. सचिन वाझेने बनवलेले 'direct baat' हे मेसेजिंग अॅप तो स्वतः वापरत होता. या 'मेसेजिंग ॲप'च्या माध्यमातून तो कुठल्या-कुठल्या व्यक्तींच्या संपर्कात होता याचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत आहे. दरम्यान, सचिन वाझेचे 'मेसेजिंग अॅप' हे 'गुगल प्ले' स्टोअरवरून हटवण्यात आले आहे.
आरोपी किशोर ठक्कर 'एनआयए'च्या ताब्यात...
सचिन वाझेला सीमकार्ड पुरवणारा आरोपी किशोर ठक्कर याला 'एनआयए'च्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याची 'एटीएस'मार्फत चौकशी सुरू होती. याआधीदेखील 'एटीएस'ने गुजरातमधून सीमकार्ड पुरवणाऱ्या नरेश गौर याला अटक केली होती. सध्या नरेश गौर हादेखील 'एनआयए'च्या ताब्यात आहे. किशोर ठक्कर याच्याकडून पोलिसांना १५ सीमकार्ड मिळाली आहेत. सीमकार्ड विकण्यासोबतच तो एक बुकी असल्याचेही समोर आले आहे.
सचिन वाझेवर पुन्हा जे. जे. रुग्णालयात उपचार
सध्या 'एनआयए'कडून सचिन वाझेची चौकशी सुरू आहे. मात्र, रविवारी रात्री त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरू आहेत.
'मिठी' नदीतून सापडलेला प्रिंटर विनायक शिंदेचा; तर 'डीव्हीआर' सचिन वाझेच्या सोसायटीमधला
मिठी नदीतून सापडलेला प्रिंटर विनायक शिंदेचा, तर 'डीव्हीआर' सचिन वाझेच्या सोसायटी मधला असल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी यांना जे धमकीचे पत्र देण्यात आले होते, ते त्याच प्रिंटरमधून टाईप केले गेले होते. या सर्वांची 'फॉरेन्सिक' चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.