‘गदिमा’ स्मारक होतंय...

    27-Mar-2021
Total Views | 221

iWAmo  _1  H x
 
 
मराठी साहित्यात आणि मराठी जनतेच्या मनात अलौकिक ठसा उमटविणारे, ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाणारे ‘गदिमा’ यांचे गेली अनेक दशकं रखडलेलं स्मारक आता पुणे येथे महात्मा सोसायटी, कोथरूडला साकार होतंय. स्मारकाच्या या जागेचा भूमिपूजन सोहळा नुकताच २२ मार्चला संपन्न झाला. हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या, गदिमांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडला. याविषयी जाणून होतेच, पण नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्याशी बोलून स्मारकाविषयी आणखी जाणून घेतले.
 
 
 
गेली अनेक वर्षे या विषयाचा पाठपुरावा सुरू होता. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात तरी हे स्मारक होईल, अशी आशा नागरिकांना आणि माडगूळकर कुटुंबीयांना होती. परंतु, अनेक प्रशासकीय बाबी पूर्ण करणे आवश्यक होते आणि कोरोना साथीमुळे नियोजनात येणारे असंख्य अडथळे दूर करत करत हे काम पुढे कसे नेता येईल, हे आव्हान होते. २०१७ मध्ये (तत्कालीन महापौर) मुक्ता टिळक यांनी या स्मारकाची घोषणा गदिमा यांच्या जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात केली होती.
 
 
 
सरतेशेवटी सर्व नियोजन पूर्ण करून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मुख्य उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन दि. २२ मार्च, २०२१ रोजी संपन्न झाले, ही सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. काही गदिमाप्रेमींनी हे स्मारक व्हावं म्हणून डिसेंबर २०२० मध्ये आंदोलन केलं. पण, माडगूळकर कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिला, कारण त्यांचा माधुरीताई सहस्रबुद्धे आणि महापौर मोहोळ यांच्यावर विश्वास होता. माधुरीताई महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्या आहेत. तसेच कमला नेहरू उद्यानाच्या साहित्य कट्ट्याच्या संयोजकसुद्धा आहेत, त्यामुळे मराठी सारस्वतांबद्दल सतत त्यांचा विचार असतो. याबाबत त्यांचा पुढाकार म्हणून महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, गेल्या ४० वर्षांपासून ही गदिमा स्मारकाची मागणी होत होती.
 
 
 
गदिमा हे १२ वर्षे काँग्रेसतर्फे महाराष्ट्र विधान परिषद नियुक्त सदस्य होते. त्यांचे चिरंजीव कै. श्रीधर माडगूळकर यांनी १९८० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पुण्यात विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, सुमारे तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेस विचारांच्या पक्षांकडेच पुणे मनपाची सूत्रे होती, तरी गदिमा स्मारकाचा विषय मार्गी लागला नव्हता, हे विशेष! पुण्यात गदिमा जन्मशताब्दीमध्ये राज्य सरकारपुरस्कृत महोत्सव झाला. यात माडगूळकर कुटुंबीयांचा पुढाकार होता. पण, पुण्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक जगताने काही प्रातिनिधिक कार्यक्रम केले. पण, भरीव असे कोणत्याही संस्थेने केले नाही हे वास्तव आहे. पुण्यातील बहुतांश साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांचे नेतृत्व कोणाकडे आहे, हे वेगळे सांगायला नको. म्हणूनच, स्मारकाच्या मागणीकडे आधी दुर्लक्ष आणि नंतर स्मारकाचे काम प्रलंबित होत आहे म्हणून आंदोलन हे पटणारे नाही.
 
 
 
या पार्श्वभूमीवर गदिमा स्मारकासाठी मान्यता देऊन त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असणार्‍या नगरसेवकांचे विशेषतः भाजप नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन आणि त्यांना मनापसून धन्यवाद. स्मारक म्हणजे पुतळा उभा करू नये, तर ते कलात्मक असावे असे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले होते. गदिमांचे स्मारक व्हावे म्हणून त्यांनी आणि त्यांचे कुटुंबीय आणि माधुरी सहस्रबुद्धे यांनी सतत पाठपुरावा केला. हे स्मारकसुद्धा वेगळे असेल. त्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला असेल. नव्या कल्पना असतील. ज्यामुळे ते स्मारक कायम स्मरणात राहील आणि उपयुक्त ठरेल.
 
 
स्मारक म्हणजे, एखाद्या विशेष घटनेची किंवा विशेष व्यक्तीची दीर्घकाळ आठवण राहावी म्हणून निर्मिलेली वास्तू/रचना, ज्यामुळे त्या व्यक्तीचे सतत स्मरण होत राहील, प्रेरणा मिळत राहील, असे आदर्श पुढच्या पिढीपर्यंत प्रसृत होत राहतील. प्रसंगांची आणि व्यक्तींची आठवण राहण्यास त्या निमित्ताने मदत होते. अशा आठवणी अनेक देशांत स्मारकांच्या रूपाने अस्तित्वात आहेतच. मराठी वाङ्मयामध्ये आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून गदिमा यांचे नाव सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात केलेले अनेक साहित्यिक आहेत जे मराठी अस्मितेचे मानबिंदू ठरावेत, या परंपरेतले एक नाव म्हणजे गदिमा. मराठी साहित्यात कवी, कथालेखक, कादंबरीकार, नाटककार, संपादक म्हणून योगदान, तर मराठी चित्रपटक्षेत्रात कथाकार, पटकथाकार, गीतकार, अभिनेता आणि निर्माता म्हणूनसुद्धा योगदान असलेले गदिमा. त्यांनी १५७ पटकथा लिहिल्या, २५ हिंदी चित्रपट, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी लिहिली, त्यांच्या काळातले चित्रपट तर सुवर्णकाळ घेऊन आले. ‘गीतरामायण’ ही तर त्यांची अजरामर साहित्यकृती.
 
 
यशवंतराव चव्हाण यांनी गदिमांच्या काव्य प्रतिभेवर प्रसन्न होऊन म्हटलं होतं की, “मी जर राजा असतो, तर कविवर्याच्या हाती सोन्याचं कडं चढवलं असतं. या सगळ्या कारकिर्दीचा आढावा प्रदर्शनरूपी दालनात रसिकांना अनुभवायला मिळाला तर रसिकश्रोते धन्य होतील.” अशा गदिमांचे स्मारक पुण्यातील महात्मा सोसायटी परिसराजवळ असेल. ‘एक्झिबिशन सेंटर’ आणि गदिमा स्मारक असे या संकुलाचे एकंदर स्वरूप असेल. एकूण २५ हजार ११० चौरस मीटर आरक्षित क्षेत्रात हे ‘एक्झिबिशन सेंटर’ आणि स्मारक असणार आहे. त्यातील वास्तू तीन हजार ७२२ चौरस मीटर क्षेत्रफळाची असेल. ही वास्तू तीन मजली असेल. यात गीतरामायण, साहित्यदालन, चित्रपटदालन, वैयक्तिक दालन, ‘डिजिटल’ दालन अशी पाच दालने पहिल्या आणि तिसर्‍या मजल्यावर असतील. दुसर्‍या मजल्यावर एक बहूपयोगी सभागृह असेल, ज्याला जोडून एक भोजनगृह असेल.
 
 
 
सुमित्र माडगूळकर यांनी या स्मारकाची एक छान संकल्पना मांडली आहे. त्यात कलात्मकता, आधुनिकता आणि सोय याचा चांगला मेळ साधला आहे. आशा आहे की, प्रस्तावित स्मारकात या सर्व बाजूंचा विचार करून पुण्याची विशेष ओळख सांगणारे असे स्मारक उभे राहील. सुमित्र माडगूळकर यांनी केलेल्या सूचना अशा आहेत. पहिल्या मजल्यावर ‘गीतरामायण दालन’ असेल. यात गीतरामायणाची ५६ गीते शिल्पासारखी मोठ्या अक्षरात ग्रॅनाईटवर कोरलेली असावीत. सर्व कलाकारांची नावासकट छायाचित्र असावीत. सुधीर फडके या मूळ गायकाच्या आवाजातील ही गीते ऑडिओ बूथवर ऐकता यावीत, गीतरामायणाचा इतिहास व छायाचित्रे असावीत, रामायणातील काही प्रसंग ‘म्युरल्स’च्या स्वरूपात असावेत. गीतरामायणाच्या आठवणी वाचता किंवा ऐकता याव्यात. गीतरामायणाचे अनेक भाषांत भाषांतर झाले आहे, ते उपलब्ध असावे. गीतरामायण मराठी व इतर भाषेतील त्याचे भाषांतर याची पुस्तकेसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध व्हावीत.
 
 
साहित्य दालन
 
यात गदिमांची सर्व ३७ पुस्तके, गीतगोपाळ डिस्प्लेला असावीत व ती वाचता यावीत. निवडक कवितांची शिल्पे किंवा ‘म्युरल्स’ काढावीत. गदिमांच्या हस्ताक्षरातील कविता असाव्यात. त्यांच्या आवाजातील भाषणे, कविता ऑडिओ बूथवरून ऐकता याव्यात. गदिमांच्या पुस्तकांची ‘ई-बुक्स’ करावीत. सर्व मराठी नामवंत साहित्यिकांचे फोटो या दालनात असावेत.
 
एक वैयक्तिक दालन
 
हे गदिमांनी वापरलेल्या त्यांच्या वैयक्तिक वस्तूंचे दालन असावे. त्यांच्या वापरतील वस्तू, विविध पुरस्कार, हस्तलिखिते, त्यांच्या आवाजातील कविता व भाषणे, गदिमांवर इथे चित्रपट अथवा डॉक्युमेंटरी पाहता यावी. त्यांच्या १२ वर्षांच्या आमदारकीच्या काळात झालेली त्यांची भाषणे, छायाचित्रे असावीत.
 
चित्रपट दालन
 
यात गदिमांचे १५७ मराठी व २५ हिंदी चित्रपट असावेत त्यात, चित्रपटांची सूची व छायाचित्रे असावीत. चित्रपटाची पोस्टर्स असावीत. चित्रपटासंबंधी मिळालेले पुरस्कार असावेत. चित्रपटातील गाणी त्यांची निर्मितीची कथा ऑडिओ बूथवर ऐकता यावी. त्या सर्वांच्या ‘सीडी’/‘डीव्हीडी’/‘एमपी३’ विक्रीस असाव्यात.
 
गदिमा ‘डिजिटल’ दालन
 
गदिमा यांच्यावर चित्रपट व डॉक्युमेंटरी असावी. गदिमा यांची ’सरवळार.लेा’ ही वेबसाईट अधिक समृद्ध करावी. गदिमांचे चित्रपट या साईटवरून पाहता यावेत. ‘ऑडिटोरियम’ किंवा कलादालन असावे. २०० ते ३०० लोक बसू शकतील असे हे दालन साहित्यिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध व्हावे आणि मुख्य म्हणजे, या स्मारकात वर म्हटल्याप्रमाणे गदिमांचा पुतळा उभारू नये, त्याऐवजी भव्य पेंटिंग असावे. स्मारकाभोवती सुंदर हिरवळ किंवा बाग असावी. विक्री हा भाग स्मारकाच्या देखभाल खर्चासाठी वापरावा.
 
इतका विचार या स्मारकामागे केला आहे. संकल्पनेत दिल्याप्रमाणे हे जसेच्या तसे साकारले गेल्यास एक आदर्श असे हे गदिमा स्मारक महाराष्ट्राची शान वाढविणारे ठरेल यात शंका नाही. ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा उपयोग हा आधुनिक काळात महत्त्वाचा ठरेल. पर्यटनाचे आणि साहित्यप्रेमींचे हे आकर्षण केंद्र ठरेल.
 
हे स्मारक नुसते गदिमा यांचेच नाही, तर रामायणाचे पर्यायाने प्रभू श्रीरामचंद्राचे स्मारक असेल. ज्या गीतरामायणाने गेली अनेक वर्षे मराठी मनावर राज्य केलंय, त्या गीतरामायणाचं ‘गदिमा स्मारक’ ही एक पवित्र, मंगल अशी भारलेली जागा असेल. हे स्मारक पूर्ण व्हायला साधारणपणे दोन वर्षे लागतील, असा अंदाज आहे. जसे बालगंधर्व रंगमंदिर बालगंधर्वांची आठवण करून देतं, तसं हे ‘गदिमा स्मारक’ म्हणजे गदिमा यांची आठवण करून देणारं, पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातलं सोनेरी पान असेल. या स्मारकाची सर्व रसिकश्रोते आतुरतेने वाट पाहत आहेत. ते लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा!- डॉ. नयना कासखेडीकर
 
- डॉ. नयना कासखेडीकर
 
७७६७०८१०५७
अग्रलेख
जरुर वाचा
हार्वर्ड विद्यापीठातील वाढत्या इस्लामिक कट्टरतावादी हालचालींना ट्रम्प सरकारचा दणका!

हार्वर्ड विद्यापीठातील वाढत्या इस्लामिक कट्टरतावादी हालचालींना ट्रम्प सरकारचा दणका!

(Trump freezes $2bn in Harvard funding) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना चांगलेच धक्के बसले आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या निर्णयांबरोबरच देशाअंतर्गतही त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा शिक्षणसंस्थाकडे वळवला आहे. जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १८ हजार कोटी रुपये) अधिक शैक्षणिक निधी गोठवला आहे. विद्यापीठात सातत्याने..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121