‘पद्मविभूषण’ प्रा. ब्रज बासी लाल आणि लाल भाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

RSS  _1  H x W:
 
 
 
 
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे सतत देशभर प्रवास करत असतात आणि योजनापूर्वक समाजातील सर्व स्तरांमधील व्यक्तींना भेटत असतात. अलीकडेच त्यांनी दिल्लीमध्ये प्रो. बी. बी. लाल यांची भेट घेतली. दोघांचा अनेक विषयांवर संवाद झाला. प्रो. लाल यांना नुकताच ‘पद्मविभूषण’ हा देशातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.
 
 
आपल्या देशात चार प्रकारच्या पुरस्कारांनी लोकांना सन्मानित करण्यात येतं. सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘भारतरत्न’ त्यानंतरच्या पुरस्कारांना ‘पद्म’ पुरस्कार असं म्हणतात. त्यांचे तीन प्रकार किंवा तीन पातळ्या आहेत. ‘पद्मविभूषण’ हा प्रथम दर्जाचा, ‘पद्मभूषण’ हा द्वितीय दर्जाचा आणि ‘पद्मश्री’ हा तृतीय दर्जाचा.
 
 
१९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. १९५० साली तो प्रजासत्ताक झाला. १९५२ साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. तिच्यात पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष प्रचंड बहुमताने निवडून आला. इंग्रज सरकारने भारत सोडून जाताना सत्ता काँग्रेस पक्षाकडे सोपवली होती. या निवडणूक निकालाने देशातल्या सर्वसामान्य जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त केला. पंडित नेहरू हे देशातले सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत, हे सिद्ध झालं.
 
 
अशा त्या अत्यंत उत्साहाच्या, आनंदाच्या वातावरणात नेहरू सरकारने, १९५४ साली ‘भारतरत्न’ पुरस्कारासह तीन स्तरीय ‘पद्म’ पुरस्कार द्यायला सुरुवात केली. देशभरातल्या, नागरी क्षेत्रातल्या कुणाही नागरिकाला त्याच्या कर्तबगारीचा गौरव म्हणून हे पुरस्कार दिले जावेत, अशी ही संकल्पना होती. भारतात हिंदू राजे आणि नंतर मुसलमान बादशहाही आपल्या राज्यातील कर्तबगार व्यक्तींचा मोठमोठ्या पदव्या देऊन गौरव करत असत. ब्रिटनमध्ये १४व्या शतकापासून ‘नाईटहूड’मध्ये सरदारकी देण्याची पद्धत होती.
 
 
राजेशाहीच्या काळात या पदव्यांसोबत जहागीर पण दिली जात असे. म्हणजे ‘ड्युक’ किंवा ‘काउंट’ अशा पदवीबरोबर काही विशिष्ट गावं त्या सरदाराला जहागीर म्हणून दिली जात. पुढे जहागीर प्रकरण संपलं. पण, पदव्या देऊन सन्मान करणं चालू राहिलं. नव्या वर्षादिनाला किंवा राजा/राणी यांच्या वाढदिवसाला ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ असा त्रिस्तरीय पदव्या देण्याची प्रथा चालू राहिली. यातल्या पुरुषाला आपल्या नावामागे ‘सर’ ही उपाधी लावता येत असे. उदा. सर डोनाल्ड ब्रॅडमन आणि स्त्रीला ‘डेम’ म्हणजे बाईसाहेब असं म्हटलं जात असे. उदा. डेम अ‍ॅगाथा ख्रिस्ती, डेम जेन गुडाल इत्यादी.
 
 
हीच त्रिस्तरीय पद्धती नेहरू सरकारने उचलली. त्यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशी नाव चढत्या भाजणीने दिली. त्यांच्याही वरचा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार ठरवला. १९५४ साली चक्रवर्ती राजगोपालचारी उर्फ राजाजी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् आणि सर चंद्रशेखर वेंकटरमण हे पहिले ‘भारतरत्न’ झाले. यांपैकी चंद्रशेखरांना इंग्रज सरकारने अगोदरच ‘नाईटहूड’ म्हणजे ‘सर’की दिलेलीच होती.
 
 
आता पदव्या आणि सन्मान वगैरे म्हटले की, त्यात खर्‍याखुर्‍या कर्तबगार लोकांबरोबर सत्ताधार्‍यांच्या आवडत्या लोकांची वर्णी लागायचीच. मुसलमान सुलतान आणि ब्रिटिश सरकार त्यांच्या चमच्यांना जहागिर्‍या आणि ‘रावसाहेब’, ‘रावबहादूर’ वगैरे पदव्या द्यायचे, ते अपरिहार्यपणे काँग्रेस सरकारनेही केलेच. १९५४च्या पहिल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबद्दल कुणाचंच काही म्हणणं नव्हतं. पण, ‘पद्मविभूषण’ ज्या सात जणांना देण्यात आला, त्यातलं एक नाव होतं व्ही. के. कृष्ण मेनन. ते नाव पाहून अनेक जणांच्या भुवया उंचावल्या.
 
 
अत्यंत बुद्धिमान असा हा माणूस बॅरिस्टर होता. पण, पक्का साम्यवादी होता. पंडित नेहरूंचा जानी दोस्त होता. तत्कालीन राजकारणातला स्वत: पंडितजींनंतरचा सर्वात प्रभावशाली नेता होता. पण, म्हणून एकदम ‘पद्मविभूषण’? अहो, म्हणूनच ‘पद्मविभूषण’! शहाण्या लोकांनी एकमेकांना समजावलं. पण, पुढच्या वर्षी म्हणजे १९५५ साली नेहरू सरकारने स्वत: पंडित नेहरूंनाच ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित केला. शहजादा मुईउद्दिन मुहम्मद औरंगजेब याने बादशाही तख्त हडप करून स्वत:च स्वत:ला ‘आलमगीर’ म्हणजे जगाचा शासनकर्ता म्हणून घोषित केलं.
 
 
अगदी तसंच हे घडत होतं. नाव मात्र लोकशाहीचं दिलं जात होतं. पण, पंडितजींची लोकप्रियता खरोखरच एवढी अमर्याद होती की, त्यांनी स्वत:ला ‘सम्राट’ म्हणवून घेतलं असतं तरी लोकांनी मानलं असतं. परंतु, जाणत्या लोकांना समजून चुकलं की, या पदव्या-बिदव्या म्हणजे एकंदर आनंदच आहे. तरीही पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत असंख्य वशिल्याच्या तट्टांबरोबरच अनेक खर्‍या गुणवान लोकांचाही सन्मान झाला. १९९८ ते २००४ या अटलजींच्या कारकिर्दीतही बर्‍याच गुणवंतांचा रास्त सन्मान झाला.
 
 
इंग्लंडचा एक रिचर्ड म्हणून राजा होऊन गेला. तो फार न्यायी आणि तितकाच पराक्रमीही होता. पोप उर्बान याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तो क्रूसेड युद्ध करण्यासाठी इंग्लंडहून सैन्य घेऊन जेरुसलेमला गेला. त्याच्या गैरहजेरीत त्याचा धाकटा भाऊ जॉन हा राज्यकारभार पाहू लागला. तो अत्यंत भ्रष्ट होता. त्याने मुळी वेगवेगळ्या अधिकारपदांचे भावच ठरवून टाकले. ‘ड्युक’ व्हायचंय? ‘काउंट’ व्हायचंय? ‘मेयर’ व्हायचंय? कोतवाल व्हायचंय? इन्स्पेक्टर व्हायचंय? हवालदार, जमादार, शिपाई, न्यायाधीश, सेनापती, मंत्री कुणीही व्हा. फक्त अमुकपदासाठी मला अमुक रक्कम रोख द्या की, ते पद तुमचं. अरे, ऐश करो भाई! तुम भी क्या याद करोगे!
 
 
२००४ ते २०१४ आपल्याकडे अगदी असंच चाललं होतं. कुणीही ठरावीक रक्कम भरून ‘पद्म’ पुरस्कार पटकावत होते. त्या कालखंडात ज्या खर्‍या गुणवंतांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाले, त्यांना ते स्वीकारताना आपल्यासोबतचे गणंग बघून लाज वाटत होती, म्हणे! असो. तर प्रो. लाल यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार २००० साली म्हणजे अटलजींच्या कारकिर्दीत मिळाला. प्रो. लाल मूळचे उत्तर प्रदेशातल्या झांशीचे. झांशी नाव आपल्या चांगलंच परिचयाचं आहे. उत्तर प्रदेशात लोक आपल्या नावात वडिलांचं नाव लावत नाहीत. स्वतःचंच नाव तोडून आद्याक्षरं बनवतात. तसं वृजवासी लाल या नावाचं ब्रज बासी लाल किंवा बी. बी. लाल असं करतात. तसंच इंग्रजी राज्यातल्या प्रोफेसरचं आपण महाराष्ट्रात प्राध्यापक केलं आणि ते लोकांच्या तोंडी चटकन रुळलंदेखील. उत्तर भारतात मात्र अजूनही प्रोफेसरच म्हटलं जातं. लक्षात आहे का? खुद्द रज्जूभैयादेखील स्वतःचं नाव प्रो. राजेंद्र सिंह असं लावत असत.
 
 
तर प्रो. लाल हे अलाहाबाद विद्यापीठातून संस्कृत विषय घेऊन ‘एम.ए.’ झाल्यावर त्यांना पुरातत्त्वशास्त्रात रस वाटू लागला. १९४३ साली त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्यात (आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) प्रवेश केला. त्यावेळी पुरातत्त्व खात्याचा प्रमुख होता प्रख्यात ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर मॉर्टिमर व्हीलर. व्हीलरच्या हाताखाली प्रो. लाल यांना तक्षशीला आणि हडप्पा या अत्यंत ख्यातनाम ठिकाणांवर प्रत्यक्ष उत्खनन करण्याची संधी आणि शिक्षण मिळालं. नंतर त्यांनी स्वतंत्रपणे मेरठ शहराजवळच्या हस्तिनापूर (महाभारतातील कौरवांची राजधानी) इथे उत्खनन केलं. मग गंगेच्या खोर्‍यातल्या प्राचीन तांब्याच्या नाण्यांवर संशोधन केलं. या सर्व कार्याचं दस्तावेजीकरण त्यांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने केलं केलं की, पिगॉट आणि गॉर्डन या दोन ब्रिटिश पुरातत्वज्ञांनी आदर्श ‘रिपोर्टिंग’ आणि आदर्श ‘डॉक्युमेंटेशन’ म्हणून त्यांचा गौरव केला.
 
 
मग त्यांनी इजिप्तमधल्या प्राचीन न्यूबिया भागात उत्खनन करून अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले. १९७५-७५मध्ये त्यांनी रामायण काळातल्या अयोध्या, नंदिग्राम, चित्रकूट आणि शृंगवेरपूर इथे उत्खनन केलं. हे नंदिग्राम म्हणजे भरताने रामप्रभूंच्या पादुकांच्या साक्षीने जिथून १४ वर्षे अयोध्येचा राज्यकारभार केला, ते अयोध्येजवळचं गाव. ममता दीदींमुळे सध्या फार बदनाम झालेलं बंगालमधलं नंदिग्राम नव्हे. १९५८ ते १९७२ या कालखंडात प्रो. लाल पुरातत्त्व खात्याचे महासंचालक होते. तेव्हा आणि नंतरही सिंधू संस्कृती, रामायणकालीन ठिकाणं, महाभारतकालीन ठिकाणं, याबद्दलचा त्यांचा अभ्यास, चिंतन आणि शोधपत्र सादरीकरण अखंड चालू होतं.
 
 
१९८५ साली रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन सुरू झालं. बघता बघता त्याने देश व्यापला आणि १९९२ साली बाबरी ढांचा उद्ध्वस्त करूनच ते थांबलं. या संदर्भात प्रो. लाल यांची भूमिका एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे कठोर होती. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा की, “मला उत्खननात बाबरी ढांचाच्या खाली खांब आढळले. पण, ते नेमके कसले, हे ठरवण्यापूर्वीच उत्खनन थांबवण्यात आलं.” ही भूमिका लाल भाई विद्वानांना एकदम पसंत पडली. कारण खांब काय, कसलेही असू शकतात. त्यामुळे इतर अनेक कथित इतिहासतज्ज्ञांप्रमाणेच प्रो. लाल यांनाही ‘मेन स्ट्रीम’ इतिहासकार ठरवून त्यांच्या भूमिकेलाही उठाव देण्यात आला. पुढे २००० साली वाजपेयी कालखंडात प्रो. लाल यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला. लाल भाईंना आनंद झाला.
 
 
परंतु, १९९८ ते २००८ या २० वर्षांत प्रो. लाल सिंधू संस्कृती, सरस्वती नदी, आर्य आक्रमण सिद्धान्त आणि प्रभू रामचंद्र अशा विषयांवर एका मागोमाग एक धडाधड पुस्तकं लिहित गेले आणि त्या प्रत्येक पुस्तकाबरोबर लाल भाईंनी एवढी वर्षे ठाकून-ठोकून हिंदू जनमानसात घट्ट केलेले खोटे सिद्धान्त धडाधडा कोसळत गेले. २००८ सालच्या त्यांच्या ‘राम ः हिज हिस्टॉरिसिटी, मंदिर अ‍ॅण्ड सेतू’ या पुस्तकाने तर लाल भाई संतापून संतापून हिरवे-पिवळे झाले. लगेच त्यांची ठरावीक कोल्हेकुई सुरू झाली. संपूर्ण प्रसारमाध्यम यंत्रणा त्यांच्याच ताब्यात असल्याने त्यांनी लगेच प्रो. लाल यांना ‘मेन स्ट्रीम’ इतिहासकारांच्या यादीतून बाहेर काढून ‘इग्नोअर्ड’ इतिहासकार ठरवून टाकलं. २०२१ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, २ मे १९२१ रोजी जन्मलेले प्रो. लाल येत्या २ मे २०२१ला वयाची शंभरी पूर्ण करत आहेत.



@@AUTHORINFO_V1@@