
भूमिगत टाक्यांच्या प्रकल्पाविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर
कामकाज बंद करण्याची महानगरपालिका प्रशासनावर नामुष्की
मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई महानगरपालिकेने शहरात सध्या विकासाच्या नावाखाली सुडाचे राजकारण करण्याचा गोरखधंदा चालविल्याचा आरोप होत आहे.दादरमधील हिंदमाता परिसरात भूमिगत टाक्यांच्या प्रकल्पासाठी स्वतःची पर्जन्यजल विभागाची कार्यशाळा असतानाही यासाठी ‘भाजप नेते प्रमोद महाजन कला उद्याना’च्या जागेचा वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ‘प्रमोद महाजन कला उद्यान’ हटविण्यासाठी महापालिकेच्या संशयास्पद हालचाली सुरू झाल्याने याविरोधात परिसरातील नागरिकांसह लोकप्रतिनिधी कमालीचे संतापले आहेत. भूमिगत टाक्यांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कामकाजाविरोधात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्याने कामकाज बंद करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे.
पर्जनजल विभागाची कार्यशाळा असतानाही कला उद्यानाची जागा वापरण्याच्या निर्णयास स्थानिक नागरिक आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. पालिकेने हा प्रकल्प इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिकांची आहे. परंतु, पालिकेने याठिकाणी कामकाजास सुरू केल्यानंतर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध होण्यास सुरुवात झाली. पर्यायी जागा उपलब्ध असतानाही प्रशासनाकडून केवळ उद्यानाच्याच जागेचाच वापर करण्याचा निर्णय घेणे म्हणजे हे केवळ आणि केवळ सुडाचेच राजकारण असल्याची टीका मुंबईतील ‘पहारेकर्यांकडून’ केली जात आहे.
मायानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या या मुंबईत मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर सखल भाग म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईतील हिंदमाता परिसर संपूर्ण जलमय होतो. केवळ हिंदमाताच नव्हे, तर दादर, प्रभादेवी परिसरातील सखल भागही जलमय होतात आणि या परिसरातील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होतो. गेली अनेक वर्षांपासूनची ही समस्या असून यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्यानंतरही परिस्थिती दरवर्षी ‘जैसे थे’ असते. दरवर्षी भेडसावणारी ही समस्या पालिकेला अद्यापही काही सोडवता आलेली नाही. आता पालिकेने हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठविण्याची योजना आखली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी भूमिगत टाक्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आणि स्थानिक रहिवाशांनी या कामाला कडाडून विरोध केला. रहिवाशांच्या तीव्र विरोधापुढे पालिकेने अखेर झुकते माप घेतले. हे कामकाज सध्या थांबविण्यात आले असून काम बंद करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे.
असा आहे उद्यानाचा इतिहास-
मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादर येथे मनपाच्या गार्डन समितीचे तत्कालीन अध्यक्ष भाजप नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांनी अथक प्रयत्न करून तब्बल ४२ हजार चौरस मीटर जागेवर ‘प्रमोद महाजन कला उद्याना’ची निर्मिती केली. १९९९ पर्यंत सांडपाणी निचरा केंद्राच्या प्रकल्प बनवायच्या नावाखाली ही जागा रिकामी पडून होती. १९९९ मध्ये ही योजना बारगळल्यानंतर ही जागा तशीच पडून होती. या जागेवर मुंबईत जणू नंदनवन भासावे, असे ‘प्रमोद महाजन कला उद्यान’ २०१५ मध्ये पूर्ण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ मे, २०१५ रोजी या उद्यानाचे उद्घाटन केले. जवळपास ५०० विभिन्न प्रकारची लाखभर झाडे (बहुतांशी भारतीय), विविध फुलझाडे, तीन सुंदर तलाव, हिरवीगार हिरवळ यांनी बहरलेले हे उद्यान मुंबईच्या विशेषतः दादर, माहीम परिसरातल्या जनतेसाठी नंदनवनच.
निविदेशिवाय काम?
हिंदमाता परिसर पूरमुक्त करण्याच्या उपाययोजनांबाबत १५० कोटी रुपये खर्च करताना निविदेशिवाय, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय महापालिका आयुक्त कंत्राटदारास कार्यादेश देऊन प्रत्यक्ष काम सुरू करू शकतात का, याबाबत आयुक्तांनीच तपशीलवार खुलासा करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी पत्राद्वारे केली आहे.
- भालचंद्र शिरसाट, नगरसेवक, भाजप
आयुक्तांकडून कायद्याची पायमल्ली
हिंदमाता परिसर पूरमुक्तीच्या उपाययोजनांबाबत १५० कोटी रुपये खर्च असला, तरी या कामाची कोणतेही निविदा निघालेली नाही, असे कळते. निविदेशिवाय, स्थायी समिती मंजुरीशिवाय प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. वरील एकाच कामाचे चार ते पाच तुकडे करून प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या कंत्राटदारांना कुठलीही निविदा प्रक्रिया न करता, सध्या मुंबईभर सुरू असलेल्या वेगवेगळ्या निविदेमध्ये त्यांचा अतिरिक्त कामाचे फेरफार म्हणून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. तशी कामाची पत्रे कंत्राटदारास दिलेली आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून महापालिका आयुक्तांनी कायद्याची पायमल्ली केलेली आहे.
- प्रभाकर शिंदे, महापालिका गटनेते, भाजप
‘आरे बचाव’ची ओरड करणारे पर्यावरणवादी गप्प
‘प्रमोद महाजन कला उद्यान’ वृक्षवल्लींनी नटलेले असून सकाळी आणि संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येने उद्यानात येत असतात. या परिसरातील रहिवाशांसाठी विरंगुळ्यासाठी हे उत्तम उद्यान आहे. भूमिगत टाक्या बांधताना उद्यान उद्ध्वस्त होईल, असा आक्षेप रहिवाशांचा आहे. जवळपास ५०० विभिन्न प्रकारची लाखभर झाडे (बहुतांशी भारतीय), विविध फुलझाडे, तीन सुंदर तलाव, हिरवीगार हिरवळ यांनी बहरलेले हे उद्यान या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाही पर्यावरणवादी मात्र या मुद्द्यावर मूग गिळून गप्प आहेत. आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारताना पर्यावरणवाद्यांनी झाडे तोडण्याच्या नावाखाली कडाडून विरोध केला होता. मात्र, आता संपूर्ण उद्यान उद्ध्वस्त होत असतानाही पर्यावरणवाद्यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उद्यानात टाक्यांचा अट्टाहास कशासाठी? : कालिदास कोळंबकर.
या प्रकल्पाला प्रभातफेरीसाठी येणार्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा विरोध आहे. दादर भागात हे एकच सुंदर उद्यान आहे आणि ते प्रमोद महाजन यांच्या नावाला शोभणारे आहे. उद्यानाच्या बाजूला कामगार स्टेडियमची मोठी जागा आहे. बाजूला ‘पम्पिंग स्टेशन’ची मोठी जागा आहे. तेथे टाक्या बांधायच्या सोडून उद्यानात भूमिगत टाक्यांचा अट्टाहास कशासाठी? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ११० कोटी रुपये खर्च करून ब्रिटानिया येथे ‘पम्पिंग स्टेशन’ उभारण्यात आले. तेथे हिंदमातापासून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली. त्या ११० कोटींचे काय झाले? समुद्राला भरती येते तेव्हा पाणी साचते आणि ओहोटी आली की पाणी अर्ध्या तासात ओसरते. पण करदात्यांच्या पैशांची अक्षरशः पाण्यासारखी उधळपट्टी करून उपयोग काय? विभाग कार्यालयातील अधिकारी मंजुरी घेऊन येतात आणि कामाला सुरुवात करतात. स्थानिकांशी विचारविनिमयही करत नाहीत. याबाबत आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र दिले आहे. त्यासोबत स्थानिकांच्या अडीच हजार सह्यांचे पत्र आहे. हा प्रकल्प प्रमोद महाजन उद्यानांपासून काही अंतरावर असलेल्या पालिकेच्या पर्जन्यजल विभागाची कार्यशाळा असलेल्या मोकळ्या जागेत राबवावा, एवढीच आमची मागणी असल्याचे भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले.
रेल्वेमार्गांचे काय?
‘प्रमोद महाजन उद्यान’ हे दादर पश्चिमेला आहे, तर हिंदमाता, दादर टीटी आदी परिसर हे पूर्वेकडील भागात असून या दोन्ही भागांच्या दरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गाचे विस्तृत जाळे आहे. त्यामुळे या जलवाहिन्या जमिनीखालून टाकण्यात येणार असतील तर याबाबत रेल्वे प्रशासन तसेच या परिसरांतील निवासी तसेच व्यावसायिक इमारतींमधील नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आली का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. केवळ हिंदमाताच नव्हे, तर परळ आणि केईएम रुग्णालय आदी सखल भागांतही दरवर्षी परिसर जलमय होतो. तेथील भागांचे काय, असाही सवाल विचारण्यात येत आहे. उद्यान पूर्ववत करण्याची गोष्ट महापालिका करीत असली, तरी मुंबईतील दुभाजक सुशोभित करण्याच्या नावाखाली पैसे खर्च करून नंतर ते वार्यावर सोडणार्या महापालिकेवर विश्वस कसा ठेवायचा? असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.