
‘ऑक्सफर्ड-रश्मी सामंत’ प्रकरणी देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावले
नवी दिल्ली: “भारत महात्मा गांधींची भूमी आहे, त्यामुळे वंशभेदाकडे दुर्लक्ष कधीही केले जाणार नाही. ब्रिटनमध्ये बहुसंख्येने भारतीय राहतात आणि त्या देशासोबत भारताचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे योग्य वेळी हा मुद्दा अतिशय स्पष्टपणे मांडला जाईल,” असे प्रतिपादन देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवार, दि. १५ मार्च रोजी संसदेत केले.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभा आणि राज्यसभेत कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकारने केलेली मदत आणि ब्रिटनमध्ये भारतीय रश्मी सामंत यांच्यासोबत ऑक्सफर्ड विद्यापीठात झालेले वंशभेदाचे प्रकरण याविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘ऑक्सफर्ड स्टुडंट युनियन’च्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष म्हणून रश्मी सामंत यांची निवड झाली होती. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आपल्यासोबत वंशभेदामुळे असे केल्याचा दावा सामंत यांनी केला होता.
“भारत ही महात्मा गांधी यांची भूमी आहे आणि त्यामुळे भारत वंशभेदाकडे कानाडोळा कधीही करू शकत नाही. विशेषत: ज्या देशात मोठ्या संख्येने भारतीय राहतात, त्या देशात अशा घटना घडणे हे भारतासाठी गंभीर आहे. युनायटेड किंग्डमसोबत भारताचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे ज्या वेळी गरज पडेल त्यावेळी भारत हा मुद्दा अतिशय स्पष्टपणे मांडणार आहे. संबंधित घटनांकडे भारताचे बारकाईने लक्ष आहे, त्याचप्रमाणे भारत वंशभेदाविरोधात लढा देण्यास नेहमीच सक्षम आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या असहिष्णुतेविरोधात भारत ठाम भूमिका घेईल,” असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने वंशभेदाच्या विरोधात आपली ठाम भूमिका संसदेत मांडणे यास विशेष महत्त्व आहे. कारण सुधारित कृषी सुधारणांविरोधात भारतात झालेल्या कथित आंदोलनाविषयी ब्रिटनच्या संसदेत काही खासदारांनी चर्चा घडवून आणली होती. त्यामुळे आता भारतानेही ब्रिटनमध्ये भारतीयांसोबत होणार्या वंशभेदाविषयी संसदेत निवेदन देऊन एकप्रकारे योग्य तो संदेश देण्याचे काम केले आहे.