समाजभान जपणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2021   
Total Views |

covid yodha _1  

 
व्यवसायाचा व्याप जितका अधिक तितक्याच प्रमाणात सर्वव्यापी संकटाचा सामनाही संबंधितांना करावा लागतो आणि कोरोनाच्या भीषण आपत्तीकाळात डॉ. मिलिंद संपगावकर यांच्याबाबतही तसेच झाले. पण, त्यांनी आपल्या वेळेच्या आणि आर्थिक नियोजनातून उभ्या ठाकलेल्या समस्येवरही मात केली, तसेच कर्मचार्‍यांना दिलासा, आधार देत अन्य समाजबांधवांना मदतीचा हात दिला. डॉ. मिलिंद संपगावकर यांनी कोरोना महामारी पसरलेली असतानाही आपल्या ग्राहकांच्या अडीअडचणींचे निराकरण करत पूर्ण समाधान करण्याचे धोरण अंगीकारले. त्यांच्या प्रवासाची ही यशोगाथा..
 
 
भारतातील विमा क्षेत्रातील एकमात्र उच्चशिक्षित विमा प्रतिनिधी म्हणून ओळख असलेल्या डॉ. मिलिंद संपगावकर यांनी दि. ५ फेब्रुवारी, २००९ रोजी ‘सिद्धी असोसिएट्स कंपनी’ची स्थापना केली आणि ५ जानेवारी, २०१२ पासून कंपनीचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झाले. त्यांची शैक्षणिक पात्रता M.com, M. Phill, Fellow From Insurance Institute of India, Ph.D in Micro Insurance and Co Op Banks,C.-. Inter, GDC-, Certificate of Public Policy Economy from Oxford University, M.S. in Insurance Management from Boston University. संपगावकर दाम्पत्याच्या व्यवसायाचा परीघ ‘सिद्धी असोसिएट्स’पुरताच मर्यादित नाही, तर ‘सिद्धी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी’, ‘रिद्धीज लेडी विंग’, ‘रिद्धीज रिसर्च अ‍ॅण्ड सेंटिमेंट्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ यांसह इतरही अनेक संस्थांची त्यांनी उभारणी केली. ‘सिद्धी असोसिएट्स’सह सर्वच जणांनी कोरोनापासून बचावासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले व यामुळे विमा किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यवसाय सुरू राहिला. मोबाईल फोन, सोशल मीडिया, ग्रुप्स, कॉलिंग अ‍ॅप्सच्या साहाय्याने ‘सिद्धी असोसिएट्स’चे काम या काळात होत होते. तसेच ग्राहकांशीही संपर्क झाल्याने तो तुटण्याचा फारसा काही प्रश्न उपस्थित झाला नाही.
 
त्यातूनच त्यांचे ऋणानुबंध व व्यवसायही टिकून राहिला. ‘विमा पॉलिसी’ नूतनीकरण, ‘पर्सिस्टन्सी’ यावर त्यांनी काम केले. ‘म्युच्युअल फंडा’चे संपगावकर यांनी ऑनलाईन ‘रिडेम्प्शन’ केले. ‘म्युच्युअल फंड एसआयपी’ची नोंदणी ऑनलाईन केली. ग्राहकांना ऑनलाईन ट्रेडिंगचे प्लॅटफॉर्म्स मोबाईल वा संगणकावर उपलब्ध करून दिले. परिणामी, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात डॉ. संपगावकर यांनी सर्वाधिक व्यवसाय केला. मात्र, समोरासमोर बसून प्रशिक्षण दिल्या जाणार्‍या ‘रिद्धीज रिसर्च अ‍ॅण्ड सेंटिमेंट्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’समोर कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या. प्रशिक्षण ठप्प झाल्याने व्यवसायात प्रचंड घट होऊन तो दहा टक्क्यांवर आला. तथापि, कोरोनाच्या संकटामुळे एखादी कंपनी चालली वा एखादी चालली नाही, तरी डॉ. संपगावकर यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले नाही. उलट प्रत्येक कर्मचार्‍याला नियमित वेळी ते दर महिन्याच्या १० तारखेला किंवा त्या दिवशी सुट्टी असेल तर त्याच्या आदल्या दिवशी वेतन दिले व कोरोना-‘लॉकडाऊन’च्या काळातही त्यांनी हा नियम कसोशीने पाळला. कोणालाही वेतनाविना वंचित ठेवले नाही वा कोणाच्याही वेतनात कपात केली नाही वा कोणालाही नोकरीवरून काढून टाकले नाही.
 
 

covid yodha _1   
 
 
दरम्यान, आपल्या व्यवसायासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तरी डॉ. मिलिंद संपगावकर यांनी सामाजिक बांधिलकीचा वसादेखील जसाच्या तसा सुरू ठेवला. ‘रिद्धीज लेडी विंग’च्या माध्यमातून स्त्रियांसाठीच्या ‘सॅनिटरी नॅपकिन्स’, ‘अ‍ॅडल्ट डायपर’, ‘बेबी डायपर’ यांचे ‘एमआरपी’ किंवा मोफत ‘फ्री होम डिलिव्हरी’चे काम त्यांनी केले. अशा प्रकारे त्यांचे काम सुरू असतानाच कोरोनासंकटाच्या काळात वेगळ्याप्रकारे मदत करण्याची एक आवश्यकताही त्यांना वाटली. पहिल्या टप्प्यामध्ये डॉ. संपगावकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर सामाजिक संस्थांना आर्थिक मदत केली. दुसर्‍या टप्प्यात पोलीस आणि आरोग्य कर्मचार्‍यांना ‘फेसशिल्ड’चे वाटप केले, तर तिसर्‍या टप्प्यात गरीब समाजबांधवांना धान्य, जीवनावश्यक वस्तू घरपोहोच दिल्या. मध्यमवर्गीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत असताना कुठलाही फोटो काढला नाही. यातील उद्देश होता तो म्हणजे, कुठल्याही मध्यमवर्गीय परिवाराचा आत्मसन्मान दुखावला जाऊ नये. डॉ. संपगावकर यांनी रोगप्रतिकारशक्तीवर्धक ‘होमियोपॅथी’च्या गोळ्यांचे वितरण आरोग्य कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये केले.
 
 
 
सोबतच गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना ११ हजार डझन वह्यांचे वाटपही त्यांच्या माध्यमातून करण्यात आले.मदत करताना डॉ. मिलिंद संपगावकर यांना अनेक अनुभव आले. पण, त्यातला एक विशेष म्हटला पाहिजे. पुण्यातील एका गुरुजींना धान्य व औषधांची आवश्यकता असल्याचा एक मेसेज ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला. धक्कादायक म्हणजे, या गुरुजींना या मेसेजमध्ये आपल्याला कोणीही मदत न केल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असेही म्हटले होते. पण, तो मेसेज संपगावकर यांच्यापर्यंत पोहोचला, त्याच दिवशी त्यांनी संबंधित गुरुजींच्या घरी जात त्यांना धान्याचे किट व १५ दिवसांची औषधे दिली. ते पाहून त्यांना अर्थातच आनंद झाला आणि उल्लेखनीय म्हणजे त्यांना अनेकांनी मदत केली व त्याचे फोटो काढले. पण, संपगावकर यांनी कसलाही फोटो काढला नाही, सोशल मीडियावर पोस्ट केला नाही वा मुद्रित माध्यमांतही दिला नाही, याचे त्या गुरुजींनाही आश्चर्य वाटले.
 
 
कोरोनाशी लढताना आणि समाजात मदत करताना कौटुंबिक आधाराचीही आवश्यकता होती. विशेष म्हणजे, डॉ. संपगावकर यांना फेब्रुवारीमध्ये फुप्फुसाच्या संसर्गाचा त्रास झाला होता व ते त्यानंतर मार्चमध्ये नुकतेच ‘आयसीयू’तून बाहेर आलेले होते. पण, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीमुळे त्यांना बाहेर पडणे गरजेचे होते. त्यात त्यांच्या पत्नी व मुलांनीही त्यांना प्रचंड साथ दिली. नातेवाईक, परिवार, मित्रांनी आत्मविश्वास दिला व संपूर्ण कोरोना-‘लॉकडाऊन’ काळात ते केवळ एकच दिवस घरी राहिले; अन्यथा मदतीसाठी, सेवेसाठी ते घराबाहेरच होते. पण, या काळात समाजबांधवांच्या आशीर्वादाने त्यांना कोरोनाची चाचणी करण्याचीही गरज पडली नाही.
 
 
कोरोनोत्तर काळातील योजनादेखील डॉ. संपगावकर यांनी निश्चित केल्या आहेत. विमा क्षेत्रामध्ये ‘एमडीआरटी’ सर्वात मोठा बहुमान समजला जातो व त्यासाठी ४० लाख प्रीमियम किंवा दहा लाख कमिशनचा निकष असतो, जो कोरोना काळात ३० लाख केला गेला व संपगावकर यांनी ९३ वेळा तो तोडला. यंदाच्या वर्षी १०१ वेळा तो तोडण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे. ‘रिद्धीज लेडी विंग’च्या माध्यमातून अधिकाधिक उत्तम सेवा देत ‘सॅनिटरी नॅपकिन’ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे, तसेच वर्षभरात नाशिक, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, मुंबईत व्यावसायिक शाखा सुरू करण्याचे व कर्मचारी संख्या ३०० पर्यंत नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
 
 

"कोरोनासारखे संकट येणे स्वाभाविक आहे. पण, आपण आपले आर्थिक नियोजन केल्यास त्यावर मात करता येते. शिस्त पाळणे, ग्राहकांना दिलेला शब्द पाळणे, कर्जाचे हप्ते, करभरणा वेळेत करणे यातून व्यवसाय वाढतो, तसेच कर्मचार्‍यांच्या वेतनालाही कधी उशीर होत नाही."



 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@