’बोथरा ग्रुप ऑफ कंपनी’ यांच्या ’बोथरा नर्सरी’च्यावतीने शेतीसंदर्भातील तसेच अन्य वनस्पतींची रोपटी-झाडे, सिंचन प्रणाली संदर्भातील उत्पादने तसेच बागकामाशी निगडित सामग्री पुरविण्याचे काम करते. आशित बोथरा आणि त्यांच्या पत्नी वैशाली बोथरा यांनी आणखी तीन साहाय्यकांसोबत या नर्सरीची मुहूर्तमेढ रोवली. वैशाली बोथरा यांचे शिक्षण याच क्षेत्रातील असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात काम करत, लोकांची तसेच शेतकर्यांची मदत करण्याचे व्रत अंगीकारले. वनस्पतींबद्दल माहिती देणे, शेतीसंबधित संसाधने लोकांपर्यंत पोहोचविणे अशी विविध कामे आत्तापर्यंत त्यांनी केली आहेत. याशिवाय वैशाली बोथरा या एक सक्रिय समाजसेविकादेखील आहेत. कोरोनाचे संकट डोक्यावर असताना, शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा संपर्कही तुटला. पण, वैशाली बोथरा यांनी शेतकरी आणि ग्राहकांमधील दुवा बनून मात्र महत्त्वाची कामगिरी बजावली.
गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. परिणामी, जगभरातील उद्योगधंद्यांना ‘कोविड’ महामारीचा मोठा फटका बसला. एवढेच नव्हे, तर कृषिमाल आणि शेतीसंदर्भातील उत्पादनांवरही या महामारीचा विपरीत परिणाम झाला. हातावर पोट असणारे कामगार, शेतमजूर यांच्यासमोरही दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. देशामध्ये दि. १८ मार्चला संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यानंतर संपूर्ण देश एकाएकी स्तब्ध झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाच, पण त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा कसा, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. या सर्व प्रश्नांमुळे शेतकर्यांबरोबरच सर्वसामान्यांमध्येही भीतीचे, चिंतेचे वातावरण पसरले होते. अशामध्ये वैशाली बोथरा आणि त्यांच्या नर्सरी टीमने यातून मार्ग काढण्याचा विडा उचलला.
सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या कंपनीत कार्यरत कर्मचार्यांचा, राज्यभरात त्यांना शेतमाल पुरवणार्यांसह शेतकर्यांच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला. ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतर काही काळ जसे जमेल तसे आपल्या आसपासच्या कामगारांना त्यांनी मदतीचा हात दिला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हानी टाळण्यासाठी जास्त विचार न करता, तत्काळ क्रिया करत वैशाली बोथरा यांनी योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी सर्वप्रथम सरकारी सेवांशी संपर्क साधला. नर्सरीचे काम ठप्प झाले होते. पण, तिथे काम करणार्या काही शेतकर्यांना त्यांच्या घरी परतण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने बोथरा यांनी काही वाहनांची व्यवस्था केली. पिकवलेल्या शेतमालाचे नुकसान कमी व्हावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मुंबई-पुणे येथील काही हाऊसिंग सोसायट्यांशी संपर्क साधून हा शेतमाल सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. यामुळे शेतकर्यांचा तर फायदा झालाच, याशिवाय मुंबई-पुणे येथील सामान्य नागरिकांनादेखील ताजा शेतमाल घरपोच मिळाला. चिनी उत्पादनांवर बंदी आणि कोरोनाचे संकट यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर’ होण्याचा कानमंत्र देशवासीयांना दिला. वैशाली बोथरा यांनीदेखील ‘आत्मनिर्भर भारता’च्या घोषणेतून प्रेरणा घेत, सर्व शेतकर्यांना संघटित करण्याचा विचार केला.
दळणवळण ठप्प झाल्याने शेतकर्यांना त्यांचा भाजीपाला थेट बाजारात विकण्यास अडचणी येऊ लागल्या. या परिस्थितीत बोथरा यांनी काही शेतकर्यांना एकत्र करत सेंद्रिय शेती करण्यासाठी मदत केली. स्वतः वैशाली बोथरा यांनी सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला आणि त्यानंतर या शेतकर्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. याचा चांगलाच फायदा शेतकर्यांना ‘अनलॉक’च्या कालावधीमध्ये झाला. याशिवाय काम करणार्या कर्मचार्यांना तसेच खेड्यापाड्यातील शेतकर्यांमध्येही त्यांनी कोरोनाबद्दल जनजागृती केली. या कोरोना काळात काही मैत्रिणींना सोबत घेऊन ’डिजिटल वुमेन वॉरिअर’ या संस्थेची त्यांनी सुरुवात केली आणि महिला सशक्तीकरणाचे कार्य हाती घेतले.
वैशाली बोथरा यांनी कुटुंबामध्ये, सोबत काम करणार्या शेतकर्यांमध्ये आणि कर्मचार्यांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीचीऔषधे आणि किराणा सामान पुरविण्याचे कामदेखील केले. विशेष म्हणजे, एकीकडे बर्याच संस्थांनी आणि कंपन्यांनी आपल्या कामगारांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, बोथरा यांनी एकाही कर्मचार्याला कामावरुन कमी न करण्याचा निर्णय घेतला. याउलट या महामारीच्या काळात आणखी शेतकरी बोथरा यांच्या कार्याशी जोडले गेले. ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर अनेक कामगार पायीच आपल्या गावी जाण्यास निघाले होते. यावेळी बोथरा यांनी ’आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ हा विचार करत पायी गावाकडे परतणार्या कामगारांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप केले. त्यांच्या समाजकार्याची माहिती इतरांना समजताच, अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधत मदतीची अपेक्षाही वर्तविली. समाजसेवेचे उद्दिष्ट मनी बाळगलेल्या वैशाली बोथरा यांनी अनेक कुटुंबांना आर्थिक किंवा अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली. नागरिकांकडूनही त्यांना यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्यांच्या या मोहिमेमध्ये राज्यभरातील हजारो शेतकर्यांनी साथ दिली. या समाजकार्यात त्यांचे पती आशित बोथरा यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मोठा वाटा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. कोरोना काळात त्यांनी अधिकाधिक डिजिटल पर्यायांचा वापर केला. प्रत्येक शेतकर्याने डिजिटल पर्याय निवडावा, त्यांच्या मनामध्ये या डिजिटल पर्यायांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच, जास्तीत जास्त शेतकर्यांनी डिजिटल शेतीकडे वळावे, असादेखील त्यांचा मानस आहे. याचा फायदा भारतीय अर्थव्यस्थेला होईलच, याशिवाय भारतीय शेतकर्यांचीदेखील प्रगती होण्यास मदत होईल, असे बोथरा सांगतात. प्रत्येक समस्येमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन हवा. या कोरोनाच्या महामारीने नव्या पिढीसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसे उभे राहावे, याची एक चांगली शिकवण दिल्याचे बोथरा सांगतात.
"समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, त्यामुळे आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या प्रेरणेने आम्ही अनेक शेतकरी कुटुंबांना मदत केली. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला. त्यांच्या प्रत्येक कामाच्या पोचपावतीमुळे त्यांना प्रोत्साहन मिळत गेले."