तात्यासाहेब शेवाळे गेल्या ३० वर्षांपासून ‘वेल्थ मॅनेजमेंट’ क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘शेवाळे अॅण्ड कंपनी’ १९९० पासून सातत्याने प्रगतीपथावर असून आज या कंपनीने आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. तात्यासाहेब शेवाळे यांच्या नेतृत्वात ‘कोविड’ काळात या कंपनीने उल्लेखनीय कामगिरी केली. कोरोनाच्या संकटामुळे लोकांनादेखील विम्याची आवश्यकता जाणवली होतीच, तसेच आर्थिक नियोजनाचीही गरज वाटत होती. तात्यासाहेब शेवाळे यांनी याच काळात अनेकांशी मोबाईलच्या माध्यमातूनही संपर्क साधला व नंतर प्रत्यक्ष भेटीही घेतल्या. त्यांच्या या कार्याची माहिती देणारा हा लेख..
आज ‘शेवाळे अॅण्ड कंपनी’ विमा, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लानिंग आदी सेवा आपल्या ग्राहकांना पुरविते. आतापर्यंत त्यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून सुमारे आठ हजार कुटुंबांचे ‘वेल्थ अॅण्ड फायनान्शियल प्लानिंग’ करून दिले आहे. ग्राहकांच्या ज्या आर्थिक विषयाशी संबंधित गरजा असतील, त्या पूर्ण करण्याचे काम ते आपल्या कंपनीच्या माध्यमातून करत आहेत. तसेच ‘एमडीआरटी’ या अमेरिकेतील प्रथितयश संस्थेत सुमारे १८ वेळा ‘मुख्य अतिथी’ म्हणून तात्यासाहेब शेवाळे यांना आमंत्रितही करण्यात आले होते.
मात्र, कोरोनाची भीषण आपत्ती जगासह देश व महाराष्ट्रावर कोसळली आणि सर्वसामान्य नागरिकांसह व्यवसाय-उद्योगांचीही घडीही एकाएकी विस्कटली. तात्यासाहेब शेवाळे यांच्यासमोरही कोरोना व त्याला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे विविध प्रश्न उभे ठाकले, आव्हाने निर्माण झाली. तात्यासाहेब शेवाळे यांचा व्यवसाय विमा व आर्थिक नियोजनाशी संबंधित असल्याने जनसंपर्काशिवाय त्यांना पर्याय नव्हताच. ग्राहकांशी समोरासमोर चर्चा करून, संवाद साधून, वेगवेगळी माहिती देऊन विमा आणि आर्थिक नियोजनाचा व्यवसाय केला जातो. पण, कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे त्यात विघ्न आले. तात्यासाहेब शेवाळे यांच्यावर आपला व्यवसायच बंद करण्याची वेळ आली. तथापि, कोरोना किंवा ‘लॉकडाऊन’ असला तरी हातावर हात ठेवून नुसते बसून राहणे कोणालाही शक्य नव्हते. यामुळेच तात्यासाहेब शेवाळे यांनी आधुनिक युगातील डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे ठरवले. संकटावर मात करून डिजिटल माध्यमांचा सुयोग्य वापर करुन, त्यांनी जनसंपर्क सुरु केला व व्यवसायिक कामे तर केलीच, पण धास्तावलेल्या, अडचणीत सापडलेल्या, समस्याग्रस्त लोकांना धीरदेखील दिला.
विमा आणि आर्थिक नियोजनाचा व्यवसाय करत असताना, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून विविध उत्पादनांची माहिती देणे गरजेचे असते. पण, कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे तात्यासाहेब शेवाळे यांच्यासमोरचे सर्वच दरवाजे बंद झाले. तेव्हा त्यांनी डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुष्कळ चर्चासत्रांचे आयोजन केले. लोकांना विम्याचे महत्त्व पटवून दिले, तसेच आर्थिक नियोजनाची गरजही विशद केली. त्यांना जागृत केले व विमा आणि आर्थिक नियोजन किती गरजेचे आहे, हे पटवून दिले. कोरोनाच्या संकटामुळे लोकांनादेखील विम्याची आवश्यकता जाणवली होतीच, तसेच आर्थिक नियोजनाचीही गरज वाटत होती. कारण, कधीही काहीही होऊ शकते, याचे उदाहरण कोरोनाच्या रुपात सर्वांसमक्ष होते. तात्यासाहेब शेवाळे यांनी याच काळात अनेकांशी मोबाईल व फोनच्या माध्यमातूनही संपर्क साधला व नंतर जसजसे ‘अनलॉक’चे टप्पे येत गेले, तसतसे ते लोक शेवाळे यांना भेटत राहिले.
आर्थिक व्यवहार ठप्प पडण्याची चिन्हे दिसताच, तात्यासाहेब शेवाळे यांनी आधीच आपल्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण काळजी घेण्याचे निश्चित केले. आपल्या उद्योगासह कर्मचाऱ्यांच्या वेतनादी खर्चाचे सुमारे सहा महिन्यांचे नियोजन त्यांनी अगदी सुरुवातीलाच करुन ठेवले. लोकांना, ग्राहकांना भेटणार नसल्याने या काळात आर्थिक प्राप्ती होईल अथवा नाही, याची कोणतीही शाश्वती नव्हती. यामुळेच सहा महिन्यांसाठी आर्थिक नियोजन केल्याने कर्मचाऱ्यांनाही हायसे वाटले व त्यांना दिलासा मिळाला. तात्यासाहेब शेवाळे यांनी या काळात आपल्या एकाही कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले नाही वा कोणाच्याही वेतनात कपात केली नाही. कोणालाही कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली.
दरम्यान, आजाराची साथ पसरली की त्याची बाधा कोणाला कधी होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. तात्यासाहेब शेवाळे यांच्याबाबतही तसेच झाले आणि त्यांचा रिपोर्ट कोरोना ‘पॉझिटिव्ह’ प्राप्त झाला. मात्र, या काळात शेवाळे यांच्या मित्रपरिवाराने, ग्राहकांनी, लोकांनी, नातेवाईकांनी, कुटुंबीयांनी त्यांना मानसिक आधार दिला. पुढे, तात्यासाहेब शेवाळे कोरोनाच्या आजारातून बाहेर पडले, पण त्यांना त्या आजाराचा प्रत्यक्ष अनुभव आला होता. त्यामुळे नंतर अनेकदा त्यांच्या ग्राहकांपैकी काहींना कोरोनाची बाधा झाली, त्यावेळी तात्यासाहेब शेवाळे यांनी त्यांना धीर दिला, ‘घाबरण्याचे कारण नाही, तुम्ही आजारातून नक्की बाहेर पडाल,’ असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण केला. ‘कोरोनावर तुम्ही मात करु शकाल, इच्छाशक्ती दाखवली, मन खंबीर ठेवले तर कोणत्याही आपत्तीवर विजय मिळवता येतो,’ असे त्यांनी सर्वांना सांगितले.
कोरोनाची साथ पसरलेली असतानाच, तात्यासाहेब शेवाळे यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत, १०० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यांनाही मानसिक पाठिंबा दिला. त्यांनी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांचे त्यांना रात्री-अपरात्री फोन कॉल्सही यायचे. पण, त्यावेळीही तात्यासाहेब शेवाळे यांनी त्यांना धीर दिला, डॉक्टरांशी संवाद साधला व रुग्णांची काळजी घेतली. आजही त्यांनी रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण त्यांना त्या मदतीसाठी, सहकार्यासाठी धन्यवाद देत असतात.
कोरोनासारख्या संकटाचा सामना कसा करायचा, यावर त्यांनी असे सांगितले की, “कोरोनासदृश्य संकट कधीही अचानकपणे येऊ शकते. त्यावर मात करण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच सर्वच गोष्टींचे नियोजन केले व त्यातही आर्थिक नियोजन महत्त्वाचे. तसेच इतरांना मदत करत राहिलो. पण, अशा आपत्तीकाळात त्याचा सामना करण्यासाठी व्यक्तीकडे राखीव निधी असायला हवा. बचतीच्या वा इतर माध्यमातून भविष्याची तरतूद सर्वांनी केली पाहिजे. सहा महिने, वर्षभर आपला व्यवसाय थांबला तरी आपली आर्थिक क्षमता, आपल्या गरजा पूर्ण करणारी असायला हवी. म्हणजेच तशी आर्थिक तरतूद करून ठेवायला हवी, त्याचे नियोजन करायला हवे.” दरम्यान, तात्यासाहेब शेवाळे गेल्या ३० वर्षांपासून ‘शेवाळे अॅण्ड कंपनी’च्या माध्यमातून व्यवसाय करत आहेत. म्हणजे उद्योगजगतात तात्यासाहेब शेवाळे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत व त्यांनी आर्थिक नियोजन केलेले असल्याने त्यांना कोरोना व ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही त्यावर मात करता आली.
"संकटांना, आपत्तीला न घाबरता व्यक्तीने, उद्योजकाने त्यावर मात करुन उठून धावायला पाहिजे, अशी मानसिकता ठेवल्यास आणि आर्थिक नियोजन केल्यास, नक्कीच प्रत्येक नवउद्योजकाचे किंवा सर्वसामान्य व्यक्तीचेही भविष्य उज्ज्वलच असेल, असे मला प्रकर्षाने सांगावेसे वाटते."