मुंबईच्या सीमेवर वसलेले ‘स्मार्ट’ शहर म्हणजे उद्योगांचे ‘ठाणे’ आहे. येथील नानाविध उद्योगांची ‘इस्टेट’ म्हटल्या जाणार्या ठाण्यातील वागळे इस्टेट एमआयडीसीत डॉ. संजय कोयंडे यांची ‘सीसीआरटी ग्रुप’ (CCRT अर्थात सिमेंट, काँक्रीट, रिफ्रॅक्टरी टेस्टिंग अॅण्ड ट्रेनिंग) ही छोटेखानी कंपनी आहे. उपलब्ध तंत्र व क्षमतेने दर्जेदार उत्पादनाच्या निर्मितीतून कणखर भारताच्या निर्मितीचा ध्यास घेतलेली प्रयोगशील असामी म्हणजे डॉ. संजय कोयंडे होय. कोरोना काळातही त्यांनी न डगमगता व्यवसायाची धुरा पेलली. त्यांच्या या उद्यमशीलतेचा लेखाजोखा...]
कोरोना महामारीमुळे बांधकाम व्यवसायाला त्याची सर्वाधिक झळ बसली. गर्दी टाळणे, ‘सोशल डिस्टन्सिंग’मुळे बांधकाम क्षेत्रात महत्त्वाचा घटक असलेल्या मजुरांवर संकट कोसळले. मजूर कामावर येईनात. याचा परिणाम बांधकाम आधारित व्यवसायांवरही झाल्याने कामे मिळेनाशी झाली. उत्पन्नाचे मार्ग खुंटले. यातून मार्ग काढण्यासाठी डॉ. कोयंडे यांनी सोशल मीडियाच्या आधारे कर्मचार्यांशी संवाद साधण्यास सुरुवात करून त्यांना धीर दिला. त्यांना वेतनाची खात्री दिली. मार्चमध्ये जेव्हा ‘लॉकडाऊन’ झाला, त्याच महिन्यापासून कामगारांचा २२ दिवसांचा पगार ‘विदाऊट कट’ म्हणजेच मार्चमधील पूर्ण ३१ दिवसांचा पगार दिला. तसेच, कंपनीतून घेतलेल्या कर्जाचे हप्तेही न कापल्याने कंपनीतील सहकारी व कामगारही आश्वस्त झाले.
डॉ. कोयंडे यांच्या ‘सीसीआरटी ग्रुप’ या कंपनीमध्ये हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते बांधणी या महत्त्वाच्या विषयांवर कामकाज चालते. म्हणजेच बांधकामांचे ‘क्वॉलिटी मॉडरिंग’ केले जाते. ‘सीसीआरटी ग्रुप’ रस्ते बांधणी या कामाशी निगडित असल्याने बांधकामासाठी वापरले जाणारे खडी, रेती, सिमेंट, स्टील आदींसह वापरण्यात येणारी साधने ही योग्य दर्जाची आहेत की नाहीत, हे कंपनीच्या प्रयोगशाळेत तपासून ‘क्वॉलिटी मॅनेजमेंट’बाबत क्लायंटला सांगतात. त्या व्यतिरिक्त बांधकाम व्यवसायाच्या कचर्यापासून तयार केलेले ‘रेडिमेड प्लास्टर’ची निर्मितीही ‘सीसीआरटी ग्रुप’ करीत असून पर्यावरण जतनाला यामुळे काहीसा हातभार लावण्याचे प्रयत्न केले जातात. कामाच्या या वैशिष्ट्यामुळे ‘कोविड’ काळात मुंबई महापालिकेने अत्यावश्यक सेवेसाठी परवाने दिल्याने ‘पेडणेकर असोसिएट’ या क्लायंटसाठी मुंबईतील जवळजवळ ३० पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ या कोरोनाकाळात ‘सीसीआरटी’ने केले.
‘लॉकडाऊन’मध्ये ही खूप मोठी उपलब्धी कामगारांच्या आणि कुटुंबीयांच्या साथीने डॉ. कोयंडे यांनी पार पाडली. विशेष उल्लेख म्हणजे, मुंब्रा बायपासवर रस्त्याच्या मधोमध पडलेले विवर बुजवण्याचे यशस्वी कामही डॉ. कोयंडे यांच्या ‘सीसीआरटी ग्रुप’नेच केले. अशाप्रकारे काम वेग पकडत असताना, या कालावधीचा फायदा घेत कामगारांसाठी मे व जून महिन्यांत ‘लीडरशीप मॅनजेमेंट’, ‘टाईम मॅनेजमेंट’, ‘प्लॅनिंग’ यासारखे प्रशिक्षण दिले. त्यामुळे ‘सोशल नेटवर्किंग’, ‘डिजिटल मार्केटिंग’ची ओळख होऊन कर्मचार्यांमध्ये ‘कनेक्टिव्हिटी’ व ‘पॉझिटिव्हिटी’ राहिली. ‘अनलॉक’नंतर त्याचा लाभ अर्थातच संस्थेलाच झाल्याचे डॉ. कोयंडे सांगतात. ‘सीसीआरटी’ कंपनीने या काळात अनेक विकासकामांसोबतच समाजहिताची कामेदेखील केली.
सर्वात आधी कंपनीच्या कामगारांची कुटुंबे जगवण्याचा निर्धार करून कंपनीमार्फत अन्नधान्याचे वाटप केले. परराज्यातील कामगारांची वास्तव्याची अडचण सोडवून त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांच्या शिध्याची आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था केली. याशिवाय, अनेक गरजूंना अन्नधान्याच्या किट्सचे वाटप केले. तसेच निराधारांना मदतीचा हात देतानाच, ‘लायन्स क्लब’ व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक क्षमता वाढवणार्या ‘आर्सेनिक अल्बम’ गोळ्या, सॅनिटायझर, मास्क आदी आरोग्यविषयक घटकांचा पुरवठा केला. पावसाळ्याच्या सुरुवातीला ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात सोसायट्यांकडून कामांची परवानगी मिळाली. परंतु, त्याचवेळेस रेल्वे सुरू झाल्याने अन्य राज्यातील कामगार हळूहळू परतू लागल्याने पुन्हा व्यवसाय अडचणीत आला. मात्र, डॉ. संजय कोयंडे यांनी चतुराईने दीडपट मेहनतान्याने स्थानिक मजुरांना हाताशी घेत मिशन फत्ते करून दाखवले.
कोरोना काळात कर्मचार्यांचा कंपनीवर विश्वास होताच. पण, त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील विश्वास दाखवला. वारंवार निर्जंतुकीकरण करून कंपनी सर्वतोपरी काळजी घेत असल्याने कामगारही कंपनीच्या कामासाठी घराबाहेर पडले. त्या सर्वांची काळजी संस्थेने कुटुंबाप्रमाणे घेतली. या काळात कुटुंबानेही मोलाची साथ दिली. बाहेरून घरी गेल्यानंतर एकाच घरात दोन संसार थाटण्याची वेळ आली. पत्नी, मुलगा व सासूने सहकार्याची भूमिका घेत, सर्व काही वेगळी व्यवस्था करून दिल्याने खर्या अर्थाने ‘सोशल डिस्टन्सिंग’ अनुभवली. तुमच्या मागे तुमचं घर उभं राहिले की, आपलं दुसरं घर म्हणजेच कंपनी चांगल्या पद्धतीने हॅण्डल करता येते. सर्वांनीच एवढी साथ दिल्यामुळे कोरोनाकाळातही आमचे कस्टमर ‘रिलायन्स’, ‘एलएनटी’, ‘बिल्डर्स’, ‘डेव्हलपर्स’ आणि सोसायट्यांना सेवा देऊ शकल्याचे डॉ. कोयंडे सांगतात.
या काळात सर्वात महत्त्वाचे आव्हान होते नगद नारायणाचे. ‘सीसीआरटी ग्रुप’वर कोणतेही कर्ज नसल्याने हप्त्यांचा बोजा नव्हता. परंतु, वेळेत सर्व कर व देयके अदा करणे भाग होते. तेव्हा, सरकारी पातळीवर चांगल्या योजना देण्यात आल्याने कंपनीच्या गाड्यांचे कर्ज हप्ते, तसेच कामगारांना कर्जविषयक सहकार्य करण्यात मदत झाली. किंबहुना, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘लॉकडाऊन’ काळातही आवक झाल्याने कर भरण्यासह इतर आर्थिक अडचण उद्भवली नाही. मध्यंतरी कोरोनाचा कहर वाढला होता. मुंबई पाठोपाठ ठाण्यात दररोज रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली होती. तरीही न डगमगता इतक्या मोठ्या महामारीत धैर्याने उभे राहिल्याने डॉ. कोयंडे यांचा आत्मविश्वास बळावला होता.
‘कोविड’काळातही कस्टमरची कामे करणे, कर्मचार्यांची काळजी घेणे, या सर्व गोष्टी दिसून आल्यामुळे लोकांचाही कंपनीवरील विश्वास वाढून आणखी कामे मिळत गेली. पावसाळ्यापूर्वी उरकायची कामे या कालावधीत अनेक सोसायट्यांनी तसेच अन्य संस्थानी करून घेतली. केवळ भारतातच नव्हे, तर भारताच्या बाहेरसुद्धा काम मिळाले. कोरोनाकाळातील मार्केटिंगमुळे ऑस्ट्रेलिया, दुबई या ठिकाणाहून ऑर्डर मिळाल्याने आंतरराष्ट्रीय मार्केट खुले होऊन मोठी संधी उपलब्ध झाली. नुकतीच ऑस्ट्रेलियातील ‘असायनमेंट’ निर्यात करून ‘सीसीआरटी ग्रुप’ने विदेशात गरुडभरारी घेतली आहे. अशाप्रकारे, तंत्र व दर्जा टिकवून व्यवसायवृद्धीसाठी कार्यरत असल्याचे सांगत, डॉ. कोयंडे हे भावी उद्योजकांनीही यात कोणतीही तडजोड करू नका, असे सुचवतात.
प्रत्येक काळ हा व्यवसायासाठीच असतो. कोरोना असेल किंवा कोणत्याही जैविक अथवा वैश्विक संकटात खचून न जाता, सकारात्मक बाजूने विचार करा. कर्मचारी व सहकार्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास हीच मंडळी मार्ग दाखवतील. देशाच्या पंतप्रधानांनी अवलंबलेल्या ‘डिजिटल इकॉनॉमी’चा आम्हाला फायदा झाला. त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला डॉ.संजय कोयंडे यांनी नवीन उद्योजकांना दिला आहे.
"समाज- माध्यमांद्वारे कर्मचार्यांशी संवाद साधल्यामुळे उद्योगाचा पुन्हा श्रीगणेशा करण्याची प्रेरणा मिळाली. समाजातील विविध घटक एकमेकांच्या मदतीला धावून आल्याने आपणही परिस्थितीवर मात करू शकतो, हा आत्मविश्वास दुणावला."