उद्योगाच्या प्रगतीचा आलेख हा ‘क्ष ते शून्य’ आणि ‘य ते शून्य’ अशा उभ्या आणि आडव्या दोन्ही पातळीवर मोजावा लागत असतो. आलेखाचे हे दोन्ही बिंदू समान चालावेत, यासाठी प्रत्येक उद्योजक हा कसोशीने प्रयत्नरत असतो. ‘सॅनिओ इलेक्ट्रोफॅब प्रा. लि.’चे सारंग रवींद्र अत्तरदे यांनीही कोरोनाच्या जागतिक महामारीत अनेकविध संकटांचा सामना करत, आपल्या उद्योगाच्या आलेखाचे संतुलन राखले. जिद्दीने आणि धैर्याने त्यांनी आपल्या कर्मचार्यांना सोबत घेऊन कंपनीचे अर्थचक्र गतिमान ठेवले आणि प्रगती साधली. तेव्हा, त्यांच्या कार्याची दखल घेणारा हा लेख...
बाजारात आपल्या उत्पादनाची मागणी वाढविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न हे एकमेक आव्हान कुठल्याही उद्योजकासमोर नसते. कारखान्याचे चक्र सुस्थितीत आणि सुरळीत राखण्यासाठी उत्तम व्यवस्थापन कौशल्याची प्रचिती देणे, हेदेखील उद्योजकासाठी तितकेच आवश्यक असते आणि त्याशिवाय कुठल्याही उद्योजकाला गत्यंतर नाहीच. अडचणी आणि जागतिक संकटाच्या काळात तर हे आव्हान अधिक भीषण स्वरुप प्राप्त करते. कोरोना काळात नाशिक येथील सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘सॅनिओ इलेक्ट्रोफॅब प्रा. लि.’ या सारंग रवींद्र अत्तरदे यांच्या कंपनीलाही याच आव्हानांचा मोठा सामना करावा लागला. मात्र, कर्मचारीवर्गाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत अत्तरदे यांनी या संकटावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे त्यांना ‘उत्कृष्ट व्यवस्थापनकर्ता उद्योजक’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कोरोना काळ हा सर्वांसाठीच अडचणींचा आणि आव्हानात्मक होता. या सामाजिक, आर्थिक संकटांची झळ ही औद्योगिक क्षेत्रालादेखील मोठ्या प्रमाणावर बसली. याकाळात म्हणूनच उद्योजकांची सजगता आणि व्यवस्थापन कौशल्य पणाला लागले होते.
जीवनात आव्हाने काहीही असोत, प्रत्येकाला त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. हा मार्ग काढताना काही निर्णय हे मनाविरोधात घ्यावे लागतात. मात्र, तेच नंतर फलदायी ठरत असतात. संकट काळात आणि समोर आव्हाने उभी असताना निर्णय घेणे हे महत्त्वाचे असते.
‘लॉकडाऊन’मुळे सर्वत्र बंदची स्थिती असल्याने कंपनीत काम करणारा कामगार उपलब्ध होण्यास मोठी अडचण अत्तरदे यांना भेडसावत होती. तसेच, उत्पादनाच्या वितरण प्रणालीचेदेखील आव्हान अत्तरदे यांच्या समोर उभे ठाकले होते. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेताना शासकीय नियमांचे पालन आपल्या कंपनीत प्रत्येकाने करावे व तसेच ते घडावे, याचेही एक आव्हान अत्तरदे यांच्या समोर होते. त्याचप्रमाणे उद्योग-व्यवसाय निरंतर सुरू राहावा यासाठी आर्थिक घडी बसविणे, त्यातच मागणी कमी असणे, त्यामुळे आर्थिक शिस्त मोडू न देणे, अशाही विविध आव्हानांचा सामनादेखील त्यांना या काळात करावा लागला. कामगार वर्गाची उपलब्धता हे इतर आव्हानांपेक्षा एक मोठे आव्हान होते. कारण, इतर आव्हाने ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती. परंतु, कामगारांची अनुपलब्धता हे जसे प्रासंगिक होते, तसेच ते व्यक्तिनिष्ठ आव्हानदेखील होते. कारण, प्रत्येक कामगार आणि त्याचे कुटुंब हे कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यास प्राधान्य देत होते आणि ते स्वाभाविकदेखील होते. त्यामुळे कामावर हजर होण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मतावर अवलंबून होता. त्यामुळे कामगारवर्गाशी बोलून अत्तरदे यांनी त्यांचे कामानुसार वर्गीकरण केले. तसेच, उपलब्ध कामगार व काम यांचे गणित आखत अत्तरदे यांनी आपल्या कारखान्याची कार्यप्रणाली निश्चित केली. तसेच, कामगार उपलब्धतेचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नाशिक व इतर जवळपासच्या नागरिकांशी संपर्क साधत, त्यांना काम उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे जे कंत्राटी कामगार, त्या काळात कंपनीच्या कंत्राटी सेवेत होते, त्यांना कमी न करता त्यांनादेखील कंपनीच्या कामात समाविष्ट ठेवले.
कंपनीत कोणालाही कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. कंपनीत दाखल होणार्या प्रत्येकाचे या काळात निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. त्याचप्रमाणे कंपनीच्या प्रत्येक विभागात सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रत्येक कर्मचारी व कामगार यांची शारीरिक तापमान नोंद व ऑक्सिजन पातळी यांची काटेकोर तपासणी या काळात करण्यात आली. तसेच, कोणत्याही कर्मचार्यांना कोरोनासदृश लक्षणे जाणविल्यास त्यांना सुट्टी देण्यात येत होती. त्याचप्रमाणे कंपनीतील ३० ते ३५ कामगारांना आर्थिक मदतही त्यांनी देऊ केली. हे सर्व करत असताना अत्तरदे यांनी शासनाचा करभरणादेखील अगदी वेळेत केला. कंपनीच्या प्राप्त महसुलातील काही भाग राखून ठेवण्याचे धोरण अत्तरदे हे अगदी पहिल्यापासून अंमलात आणत होते. तसेच वेळेवर करभरणा केल्याने व आर्थिक निकष हे चांगले असल्याने अत्तरदे यांना शासनाचे कर्ज सहज उपलब्ध झाले. महसुलातील रक्कम बाजूला असल्याने त्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करता येणे शक्य झाले. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून त्यांनी ‘रोटरी क्लब’ला आर्थिक मदत देत, त्यांच्या कार्यात हातभार लावण्याचेदेखील कार्य या काळात केले. कंपनीतील कंत्राटी कामगारांना कंपनी बंद असतानादेखील या काळात अत्तरदे यांनी या काळात वेतन अदा केले. कंत्राटी कामगार हे देखील आपले कार्ययोगदान देत असल्याने, वर्षभर आपल्या घरातील चूल ही पेटत असते. संकटाच्या काळात आपल्या थोड्याशा योगदानाने त्यांच्या घरातील चूल आपल्याला पेटती ठेवता आली. हा प्रसंग जीवनात कायमस्वरूपी स्मरणात राहील, असे अत्तरदे कोरोना काळातील आपल्या जीवनातील भावनिक क्षण नमूद करताना सांगतात. व्यावसायिक तणाव आणि मानसिक ताण यांचे योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी कुटुंबीयांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे अत्तरदे आवर्जून नमूद करतात. कोरोना काळात सुरू असलेल्या व्यवसायाला एक वेगळा आयाम देण्याची, नव्या स्वरूपात काही उत्पादने निर्माण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आगामी काळात व्यवसायवृद्धीच्या दिशेने पावले उचलण्यात येणार असल्याचे अत्तरदे आवर्जून नमूद करतात. संकट काळात असणार्या साधनांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास कार्य कसे अविरत सुरू ठेवता येते, हेच अत्तरदे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. तसेच, कामगार वर्गाप्रति त्यांची असणारी भावना व त्यांच्या कार्याचा आणि अस्तित्वाचा सन्मान करण्याची असणारी वृत्ती यामुळे अत्तरदे यांना महामारीच्या काळात अनेक आव्हानांचा यशस्वी सामना करता आला. सुयोग्य नियोजनाने सर्वकाही शक्य आहे, हेच सारंग अत्तरदे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.