संवेदनशील मनाचा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |

Meher _1  H x W
 
 

‘इंडमार्क समूह’ हा पुण्यातील इतर उद्योगांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, तो व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नरेंद्र रंगनाथ मेहेर यांच्या नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीमुळे. ‘कोविड’ संकटातही साहजिकच मेहेर यांचे हे नेतृत्वगुण प्रकर्षाने दिसून आले. परिणामी, महामारीच्या संकटातून सावरून नव्या व्यावसायिक संधी शोधण्यात त्यांना यश मिळत गेले. कुठल्याही कर्मचार्‍याची एक रुपयाचीही वेतन कपात न करता, त्यांनी आपल्या कर्मचारीवर्गाला कुटुंबाप्रमाणे सांभाळले. तेव्हा, ‘कोविड योद्धा’ म्हणून कार्यरत नरेंद्र मेहेर यांच्या महामारीच्या काळातील कार्यशैलीचा घेतलेला हा आढावा...
 
 
पुण्यातील भोसरी, चाकण तसेच हैदराबाद परिसरामध्ये वसलेला ‘इंडमार्क समूह’ हा ‘इंडमार्क फॉर्मटेक प्रा.लि.’ आणि ‘इंडमार्क पेपर फॉर्म प्रा. लि.’ या दोन्ही कंपन्यांच्या एकूण पाच युनिटसह हैदराबाद येथे ही कंपनी कार्यरत आहे. ‘केबल ट्रे’, ‘युटिलिटी चॅनल्स’, ‘अर्थिंग मटेरियल’, ‘हॉट डीप गॅलव्हनायझिंग’, ‘स्वेअर फायबर ड्रम्स फॉर फार्मास्युटिकल एपीआय पॅकेजिंग’ आदी उत्पादने असणार्‍या या कंपनीची भारतासह युरोपीय देश, आफ्रिका, आशियातील विविध देशांमध्ये निर्यात होते. इतका मोठा पसारा असलेल्या या कंपनीवरही ‘लॉकडाऊन’चा परिणाम जाणवत होता. अचानक उत्पादन थांबवावे लागले होते. कर्मचारी व परिसरातील इतरांनाही या महामारीबद्दल कल्पना नव्हती.
 
 
‘लॉकडाऊन’मध्ये अनेकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अन्य राज्यांतून आलेले कामगार हे त्यांच्या गावी परतू लागले होते. रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे वाहतुकीचे साधन उपलब्ध नव्हते. अन्य राज्यातील मजुरांचा प्रश्न हैदराबाद, भोसरी व चाकणमध्येही तितकाच दाहक होता. अनेकांना थेट मदतीची गरज होती. दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने खायचे काय, असा प्रश्न सर्वांपुढे होता. त्या सर्वांना खाद्यपदार्थ वाटप करण्याचा उपक्रम मेहेर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. मार्चमध्ये त्यांच्या एका कंपनीच्या विस्ताराचे नियोजन सुरू होते. मात्र, ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर अचानक ही योजना ठप्प झाली. साईटवर कामगारही होते आणि त्यांच्या राहण्याखाण्याचा प्रश्नही निर्माण झाला. मेहेर यांनी हा प्रश्नही जातीने लक्ष घालून मार्गी लावला.
 
 
कोरोना काळ संपत असताना हळूहळू उद्योगचक्रे पूर्ववत होऊ लागली होती. त्यावेळेस या सर्व कामगारांनी नेटाने तिथल्या कामाचा पसारा सांभाळला. या साईटवर स्वच्छता ठेवण्यापासून ते संपूर्ण व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी निर्धारित केली. कंपनीत एकूण पाच युनिटमध्ये काम करणार्‍या सर्व कामगारांनीही अशाच प्रकारे जबाबदारीपूर्ण दृष्टिकोन ठेवला होता. संपूर्ण कंपनी ‘लॉकडाऊन-१’मध्ये बंद जरी असली तरीही तेथील यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती आदी कामे नियमितपणे सुरु होती.
 
 
फार्मा क्षेत्राशी निगडित व्यवसाय असल्याने कंपनीला ‘लॉकडाऊन’मध्ये काही अटी-शर्तींसह व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे काही महिन्यांपासून घरीच असणार्‍या कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला. शिस्तबद्ध पद्धतीने सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून कामकाज सुरू करण्यात आले. फार्मा क्षेत्राशी निगडित असलेली जी काही उत्पादने आहेत, अशा उत्पादनांची मागणी वेळेत पूर्ण करण्याचा निश्चय सर्वांनी केला होता. ‘इंडमार्क’च्या यंत्रासंबंधीचे काही युनिट बंद होते. मग आपल्या पगाराचे काय होणार, असा प्रश्न इथल्या कर्मचार्‍यांनाही सतावत होता. मात्र, मेहेर यांनी हा प्रश्नही मार्गी लावला. कुठल्याही कर्मचार्‍याची एक रुपयाचीही वेतन कपात न करता, त्यांनी आपल्या कर्मचारीवर्गाला कुटुंबाप्रमाणे सांभाळले. याचा फायदा असा की, ज्यावेळेस कंपनीला मनुष्यबळाची आवश्यकता होती, तेव्हा हे सर्व कर्मचारी आपल्या कंपनीसाठी काम करायला एका पायावर तयार झाले.
 
 
‘इंडमार्क समूहा’ने दोन्ही कंपन्यांच्या कर्मचार्‍यांसाठी ‘कोविडभत्ता’ सुरू केला, शिवाय त्यांची कामाच्या ठिकाणी ने-आण करण्याची सोयही केली. कोरोना काळात कच्च्या मालाची उपलब्धता, वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आणि इतर समस्या ‘लॉकडाऊन’मध्ये प्रकर्षाने जाणवत होत्या. मेहेर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या संकटांवर मात केली. कर्मचार्‍यांनी यासाठी आवश्यक ती मदत केली. ही संकटे झेलत कोरोना काळातील आव्हाने पेलून सर्व जण यातून तावून-सुलाखून बाहेर निघाले. अखेर समूहाने या संकटांवर मात केली. ‘इंडमार्क फॉर्मटेक प्रा.लि.’चे सीईओ सिद्धेश नरेंद्र मेहेर आणि ‘इंडमार्क पेपरफॉर्म प्रा.लि.’चे सीईओ स्वप्निल नरेंद्र मेहेर आणि संचालिका राजश्री नरेंद्र मेहेर यांचेही पाठबळ कोरोनाकाळात लाभले.
 
 
‘लॉकडाऊन’मध्ये माणसांना मदत करणारे बरेच हात मदतीसाठी सरसावले होते. मात्र, मुक्या जीवांची उपासमारही मेहेर कुटुंबीयांना अस्वस्थ करुन गेली. मेहेर यांच्या पत्नी व समूह संचालिका राजश्री मेहेर त्यांचे सिद्धेश मेहेर, स्नुषा श्रुती सिद्धेश मेहेर, स्वप्निल मेहेर आणि संपूर्ण कुटुंब-मित्र परिवाराने मिळून रस्त्यावरच्या मुक्या जीवांना खाऊ घालण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केला. हे जीव उपाशी राहू नये, याची काळजी घेण्याचा संकल्प ‘लॉकडाऊन’मध्ये सर्वांनी सोडला होता. निगडीपासून चाकण, भोसरी, नाशिक फाटा, पिंपरी-चिंचवडचा इतर परिसर आदी भागांमध्ये दुपारी २ ते रात्री ११ पर्यंत भटक्या प्राण्यांच्या खाद्याची व्यवस्था केली. पोलीस प्रशासनानेही याकामी त्यांना सहकार्य लाभले. या कामासाठी वाहनाचीही परवानगी त्यांना मिळाली.
 
 
‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि कोरोनापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेत पुणे, भोसरी, चाकण आदी संपूर्ण परिसरातील भटके कुत्रे आणि मांजरींना खाद्यपदार्थ पुरवले जात होते. कुत्र्यांसाठी ‘पेडिग्री’, उकडलेली अंडी आदी अन्नपदार्थांचे वाटप संपूर्ण ‘लॉकडाऊन’मध्ये करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाची दखल स्थानिक वृत्तपत्रे, प्रसिद्धी माध्यमांनीही घेतली. पिंपरी-चिंचवड परिसरात पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, रस्त्यावरील कामगार, बेघर, गरीब गरजूंना थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. ‘दुर्गाटेकडी ग्रुप’, पुण्यातील लघु उद्योजक आणि इतर मित्रमंडळींचे या कार्यात मोलाचे सहकार्य लाभले.
 
 
उद्योजक हा नेहमी लढवय्या असतो, असे मेहेर मानतात. मेहेर यांचीही सुरुवात शून्यातूनच झाली. मात्र, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हा उद्योगाचा डोलारा त्यांनी उभा केला. इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. कोरोना काळ हादेखील त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा. या संकटातून मेहेर यांनी यशस्वीपणे मार्ग काढला. कोरोनाकाळ हा सर्वांसाठी शिक्षणाचा अध्याय होता, असे ते मानतात. कोरोनाकाळात भेडसावणार्‍या बाजारातील समस्या, मागणी-पुरवठा व्यवस्थापन या गोष्टीही शिकता आल्या. कर्जाचे हप्ते, दैनंदिन गरजांसाठी लागणारे वित्त व्यवस्थापन या बाबींचाही या काळात प्रकर्षाने विचार करावा लागला. नवउद्यमींनी यातून धडा घेऊन पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करावेत, या देशाचे देणं आपण लागतो, याचे भान राखून व्यवसाय करावा, असा संदेश मेहेर नवउद्योजकांना देतात.


"स्वतः फार्मा क्षेत्रातील उद्योगात असल्याने कोरोना काळातही कार्यरत राहण्याची प्रेरणा मला ‘कोविड योद्धे’, आरोग्य कर्मचारी यांच्याकडून मिळाली. ज्यानुसार उत्पादनाची मागणी होत होती, तसा आम्ही पुरवठा करणे आमचे कर्तव्य समजत होतो."


@@AUTHORINFO_V1@@