मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जुन्नरमधील ओतूरमध्ये उसाच्या शेतात सापडलेल्या पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्मिलन घडवून आणण्यात आले आहे. आईच्या कुशीत पुन्हा विसावल्याने पिल्लांना नवीन जीवन मिळाले आहे. वन विभाग आणि वाईल्डलाईफ एसओएसच्या पशुवैद्यकांनी ही कामगिरी पार पाडली. उस तोडणीच्या हंगाम सुरू झाल्याने उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत बिबट्याची पिल्लं सापडू लागली आहेत.
ओतूर शहरापासून २५ कि.मी अंतरावर असलेल्या वडगाव कांदली गावामध्ये रविवारी बिबट्याची तीन पिल्ले आढळली. या संपूर्ण परिसरात उसाची शेती असून या शेतीत बिबट्यांचे वास्तव्य आहे. सध्या उस तोडणाची हंगाम सुरू आहे. रविवारी निवृत्ती मुटके यांच्या शेतात उस तोडणीचे काम सुरू होते. दिवसभर सुरू असलेल्या उसाच्या तोडणीचे काम सांयकाळी सपंत असतानाचा मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले आढळल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोटके यांनी दिली. ही माहिती वन विभागाला समजल्यानंतर माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राला यासंदर्भात कळवण्यात आले. वाईल्डलाईफ एसओएस या संस्थेच्या तांत्रिक सहाय्याने चालणाऱ्या या केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर हे वन अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी बिबट्यांची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये दोन नर आणि एक मादी पिल्लू असल्याचे समजले. ती साधारण दोन महिन्यांची होती. त्यांच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास पिल्लाचे आईसोबत पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पिल्लांना बाॅक्समध्ये ठेवून सापडलेल्या ठिकाणांवर ठेवण्यात आले आणि परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले. साधारण तीस मिनिटांनी मादी बिबट्या त्याठिकाणी आली. तिने एक एक करुन तिन्ही पिल्लांना त्या जागेवरुन सुरक्षित ठिकाणी हलवले. ही प्रक्रिया साधारण दोन तास चालली.