नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या असहकार्यामुळे राज्यात रेल्वेच्या अनेक प्रकल्पांचे काम ठप्प झाले आहे. मेट्रो कारशेडसाठी प्रकल्प तयार आहे, मात्र राज्य सरकारने ईगोचा मुद्दा पुढे करून केंद्र सरकारची जमीन हडपण्यासाठी कायदा केला आहे, असा घणाघात केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत बुधवारी केला.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक प्रकल्प ठप्प झाले असल्याची माहिती दिली. मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प राज्य सरकारच्या भूमिकेमुळे ठप्प पडला आहे. महाराष्ट्रातील ज्या ठिकाणाहून रेल्वेचा प्रारंभ आहे, ती जागा अद्यापही रेल्वेला मिळालेली नाही.
जमीन न मिळाल्यास काम पुढे सुरु ठेवणे अशक्य आहे. गुजरातमध्ये प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ९५ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे, दादरा – नगरहवेलीमध्येही अधिग्रहण झाले आहे. मात्र, महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या काम न करण्याच्या धोरणामुळे राज्यात केवळ २४ टक्के जमिनीचे अधिग्रहण आतापर्यंत होऊ शकले आहे. गुजरातमध्ये हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम वेगात सुरु असताना महाराष्ट्र सरकारने मात्र त्यात आडकाठी आणली आहे, असे पियुष गोयल म्हणाले.
काही लोक खोटे बोलण्याचे काम करतात असे पियुष गोयल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, विकासाच्या कामातही ते आम्हाला सहकार्य करीत नाहीत, त्यामुळे त्यांच्या इराद्याविषयी नेमके काहीच समजत नाही. महाराष्ट्रात सहकार्य मिळाले तर केंद्र सरकार मुंबई ते नागपूर अशी हायस्पीड रेल्वेही सुरु करण्यासाठी तयार आहे. मात्र, सहकार्य न मिळाल्याने रेल्वेचे अनेक प्रकल्प राज्यात आज ठप्प झाले आहेत. मुंबई मेट्रो कारशेडसाठी तर प्रकल्प तयार आहे. मात्र, राज्य सरकारने आपल्या ईगोमुळे केंद्र सरकारची जमीन हडपण्यासाठी कायदा केला असल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले.