बुलेट ट्रेनविषयी शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : बुलेट रेल्वे प्रकल्प म्हणजे सर्वसामान्यांचे स्वप्न नसून ते पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे, असे महाविकास आघाडी सरकारने म्हटले होते. मात्र, आज त्यांचेच खासदार मुंबई ते नागपुर बुलेट रेल्वेची मागणी करीत आहेत. त्यामुळे दुतोंडीपणाचीही हद्द असते, अशा शब्दात खासदार मनोज कोटक यांनी महाविकास आघाडी सरकारवर बुधवारी लोकसभेत टिका केली.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुंबई – नागपुर बुलेट रेल्वेविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना प्रश्न विचारला. त्यावर भाजपचे उत्तर पूर्व मुंबईतील खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारचा दुतोंडीपणा सभागृहात मांडला.
कोटक म्हणाले, शिवसेनेच्या खासदारांनी बुलेट ट्रेनविषयी त्यांच्या पक्षाची भुमिका सभागृहात मांडली, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यामुळे देशाला बुलेट ट्रेनची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या दुतोंडीपणाची आता हद्द झाली आहे. बुलेट ट्रेन हे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच स्वप्न असल्याची टिका महाविकास आघाडीने केली होती. मात्र, आता त्यांचेच खासदार मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनची मागणी करीत आहेत. आमचे सरकार तर मुंबई ते पुणे, नाशिक या मार्गावरही रेल्वे चालविण्यास तयार आहे. मात्र, सध्या मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या मार्गाचे वांद्रे – कुर्ला संकुलातील प्रस्तावित स्टेशनची जमीन राज्य सरकारने प्रथम रेल्वेला द्यावी आणि विरोधाची भूमिका सोडावी, असेही कोटक यांनी सांगितले.