पाणी प्यायचे तरी किती आणि कधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Water_1  H x W:
 
वरील प्रश्न आपल्यापैकी अनेकजणांना भेडसावतो आणि त्यावर मिळणारी उत्तरंही बऱ्यापैकी वेगवेगळी असतात. त्यामुळे नेमकं पाणी प्यायचं तरी किती, कधी आणि कधी प्यायचं नाही, याविषयी अजूनही मतमतांतरे आढळतात. तेव्हा, उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली असल्यामुळे पुन्हा एकदा हाच प्रश्न मनात येण्यापूर्वी, याविषयी आयुर्वेदशास्त्र नेमके काय सांगते, ते समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा, आजच्या भागात याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
 
रुग्ण-१ : डॉक्टर, रोज सकाळी दोन तास पाणी पितो, तरी शौचास साफ होत नाही. काहीतरी उपाय सुचवा.
 
रुग्ण-२ : डॉक्टर, हिची सर्दीच जात नाही. थंड खात नाही. फळं खात नाही, तरी सदानकदा सर्दी होते.
 
रुग्ण-३ : रोज तांब्यातले पाणी पिते. उलटी काढते, तरी ‘अ‍ॅसिडीटी’ काही पिच्छा सोडत नाही, तर लवकर बरे करा इ.
 
बरेचदा ‘खूप पाणी प्या’ या उपदेशामुळे विविध त्रास उद्भवतात, पण पाणी अधिक प्यायल्यानेही त्रास होतो आणि होऊ शकतो, हे मात्र लक्षातच येत नाही. त्यामुळे आज पाण्याचे आरोग्यावर होणारे फायदे व तोटे जाणून घेऊयात...
 
मनुष्य शरीर हे ७०-८० टक्के जलांशाने बनलेले असते. म्हणून पाणी सतत प्यावे, हा एक मोठा गैरसमज लहानपणापासूनच जनसामान्यांच्या मनात बिंबविला जाते. ७० ते ८० टक्के जलांश म्हणजे पाणी नव्हे, तर शरीरातील विविध स्राव, रक्तातील प्लाझ्मा, विविध अवयवांवरील आवरणातील द्रव भाग, स्वेद, मूत्र इ. सर्वांचा त्यात समावेश आहे. पाणी कधी प्यावे, किती प्यावे, कसे प्यावे, याबद्दलचेही काही नियम आहेत. ते न समजता, न पाळता अधिक पाणी प्यायले तर फायदा होण्याऐवजी उलट त्रासच होतो.
 
आयुर्वेदशास्त्रात उषःकाळी जलपान करावे, असे सांगितले आहे. पण, उषःकाळ म्हणजे नेमके कधी? ‘आपण उठू तेव्हा सकाळ’ असा नियम करून तो पाळू नये. ब्राह्ममुहूर्तावर उठून शौचशुद्धी, मुखशुद्धी झाल्यावर तहान लागल्यास पाणी प्यावे, असे सांगितले आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचे दोन मुहूर्त. एक मुहूर्त हा ४८ मिनिटांचा असतो. म्हणजे सूर्योदयापूर्वी ९६ मिनिटे किंवा एक तास, ३६ मिनिटे आधी हा मुहूर्त सुरू होतो. ब्राह्ममुहूर्त हा एक मुहूर्ताचा असतो, म्हणजे ४८ मिनिटांचा. म्हणजेच, सूर्योदयाच्या पूर्वी एक मुहूर्त ४८ मिनिटे हा संपतो. उदाहरण देऊन आपण समजून घेऊयात. जर ६ वाजता सूर्योदयाची वेळ असेल, तर दोन मुहूर्त आधी म्हणजे ४ वाजून २४ मिनिटे ही वेळ आणि एक मुहूर्तापर्यंत म्हणजे ५ वाजून १२ मिनिटे ही वेळ (४.२४ ते ५.१२ ही वेळ ब्राह्ममुहूर्ताची झाली, जर सूर्योदय ६ वाजताच असेल तर) सूर्योदयाची वेळ रोज बदलते. उन्हाळ्यात सूर्योदय लवकर होतो, तर थंडीत उशिरा असतो. त्यानुसार ब्राह्ममुहूर्ताची वेळही थोडी पुढे मागे होते. या वेळेस उठून ४८ मिनिटांमध्ये प्रात:र्विधी उरकून पाणी प्यायल्यास पित्तवृद्धी होते. आम्लपित्ताचा त्रास असल्यास तो वारंवार होतो. तसेच, ज्यांना कफाचा त्रास असतो, त्यांना सतत सर्दी होते, नाक वाहते, शिंका येतात. तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यावे का? तर त्याचे उत्तर म्हणजे प्लास्टिकपेक्षा अन्य कोणत्याही पात्रातील पाणी चांगलेच. (स्टील, चांदी, तांबे इ.) सकाळी पाणी किती प्यावे? सकाळी उठल्या उठल्या पाणी प्या, असे आयुर्वेदशास्त्र सांगत नाही. ज्या दिवशी तहान लागेल, त्या दिवशी तोंडाला भांडे लावून पाणी प्यावे. (त्यादिवशी आणि त्यावेळी) भूक लागल्यावर जेवावे आणि तहान लागल्यावर पाणी प्यावे. (याच्या विपरित करू नये-म्हणजे भूक लागली असताना पाणी पिणे आणि तहान लागलेली असताना खाणे हे विपरित होय.) असे केल्यास विशिष्ट आजार होतात, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.
 
शरीराला पाणी हे पचवावे लागते. म्हणजे पाणी प्यायले आणि ते शरीरभर पोहोचले, असे होत नाही. ते आधी पोटात पोहोचते. त्यावर ‘पाचकाग्नी’चे (पचनशक्ती) कार्य होते आणि मग ते शरीरात कार्य करण्यासाठी पसरते. पण, अतिरिक्त पाणी प्यायल्याने पाचक स्राव सौम्य होतात. त्यांची तीव्रता हवी तशी राहत नाही. आगीवर पाणी (खूप प्रमाणात) घातल्यास आग विझते. तसेच काही पाचकाग्नीचे होते. अतिसौम्य, तरल स्राव, मग आहारिय घटकांचे नीट पचन करण्यास असक्षम होतात. तसेच शरीरातील अनावश्यक, मलस्वरूप जलांशाचे मूत्राद्वारे शरीराबाहेर विसर्जन केले जाते. शरीरात वृक्कांद्वारे हे कार्य घडत असते. याला ’ॠश्रेार्शीीश्ररी ऋळश्रीींरींळेप झीेलशीी’ असे म्हणतात. जेव्हा जास्त पाणी प्यायले जाते, तेव्हा वृक्कांवर अधिक कार्याचा ताण पडतो व पुढे जाऊन त्यांच्या कार्यात विकृती उद्भवू शकते म्हणजे ‘अति तेथे माती’ असे शरीराबाबतही घडू शकते.
 
 
पाण्याची शरीराला गरज आहे. पण, त्याची मात्र व्यक्तीसापेक्ष भिन्न-भिन्न आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला लागणारे पाण्याचे प्रमाण हे ऋतूनुसार बदलते. जसे- उन्हाळ्यात तहान जास्त लागते. मग उन्हाच्या उष्णतेपासून बचावासाठी सरबते, रसाळ फळे इ.चा समावेश आपल्या आहारात होतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढू न देता, ते निर्धारीत करणे हे कार्य घामाद्वारे होत असते. म्हणून शरीरातील जलांशाचा वापर अधिक होतो. याउलट थंडीत शरीरातली उष्णता राखून ठेवण्यासाठी शरीरावरील रोमरंध्र बंद राहतात. घामाचे प्रमाण अत्यल्प असते. अशा वेळेस पाण्याची गरज कमी असते. हा बदल ऋतुसापेक्ष तर आहेच, पण त्याचबरोबर प्रदेशावरही अवलंबून आहे. (भौगोलिक प्रदेश) थोडक्यात काय, तर १२ महिने तेवढेच पाणी पिऊ नये. तसेच राहण्याची, कामाची जागा बदलल्यासही पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.
 
जेवताना पाणी किती प्यावे? आयुर्वेदशास्त्राप्रमाणे याचाही नियम सांगितला आहे. आपल्या पोटाचे चार भाग योजावेत. त्यातील दोन भाग आहाराने भरावा. एक भाग जलांश/द्रव आहाराने भरावा आणि एक भाग रिकामा ठेवावा, असे असल्यास पचन व्यवस्थित होऊन शरीराचे पालनपोषण नीट होते. अति, पोटभरेपर्यंत जेवून त्यानंतर तांब्यावर पाणी प्यायल्यास त्याचा परिणाम पचनावर होतो आणि मग ढेकरा येणे, पोट फुगणे, दब्ब होणे, शौचास साफ न होणे किंवा अवेळी होणे इ. त्रास सुरू होतात. एक भाग द्रव आहारामध्ये केवळ पाणीच अपेक्षित नाही. आमटी, डाळ, कढी, सार इ. तसेच ताक व अन्य रसदार पदार्थांचाही समावेश होतो. म्हणजे यावरून एक महत्त्वाचा भाग लक्षात घ्यावा की, शरीराला पाणी पचवावे लागते आहे, त्या स्वरुपात शरीरात ते कार्य करत नाही.
 
जेवताना पाणी थोडे प्यावे. जेवणानंतर साधारण दीड तासाने पाणी प्यावे. असे केल्याने घन आहार व द्रव आहार दोन्हीचेही चांगले पचन होते. तसेच जेवायला बसल्यावर पहिले पाणी पिऊन मग जेवायला सुरुवात करू नये. जेवणापूर्वी पाणी प्यायचे झाल्यास, किमान ३०-४० मिनिटे आधी पाणी प्यावे. जेवताना घन आहारामध्ये थोडी द्रव्यता येण्यासाठी लाळेमधील थोडे पाणी पुरेसे आहे. थंड पाणी सहसा टाळावे. गरम पाणी थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून मग ते पिणेही चुकीचे आहे. पाण्यानेही माणूस आजारी पडू शकतो, हे लक्षात घ्यावे. वरील नियमांचे दैनंदिन जीवनात पालन केल्यास बऱ्याच छोट्या-छोट्या कुरबुरी नाहीशा होतात आणि आरोग्यप्राप्ती होते.
 
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@