सावरकरांवर पुन्हा अन्याय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2021
Total Views |

savarkar_1  H x



स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कालखंड, त्यांनी केलेले साहित्य क्षेत्रातील कार्य, सामाजिक कामे, त्यांचे जागतिक स्तरावरील स्थान, नाशिकमधील सहवास व कार्य या सर्व गोष्टींचा विचार केला तर यामधील कोणत्याही गोष्टीत सावरकरांची इतरांशी तुलनाच होऊ शकत नाही व त्यांचे श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध करण्याची आवश्यकतादेखील नाही, असे असतानाही व नाशिकमधून मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही, साहित्य संमेलन नगरीला सावरकरांचे नाव देण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आलेले आहे.



स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला ‘मारिता मारिता मरे तो झुंजेन,’ ‘या युद्धात मी चापेकरांसारखा अपयशी होऊन बलिदान देईल किंवा शिवरायांसारखा यशस्वी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकावर स्वराज्याचा अभिषेक करेन. जय अंबे, जय दुर्गे’ या भीष्मप्रतिज्ञेचा उल्लेख होताच, आज युवकांना आठवतात ते क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर... स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यलढ्यांमध्ये मतभेद होते ते केवळ विचारांचे, ध्येय मात्र सर्वांचे एकच होते. या वैचारिक लढाईत मवाळ गट हा जहाल गटावर वरचढ ठरला. त्यामुळेच की काय स्वातंत्र्यानंतर जहाल गटामधील अनेक नेत्यांच्या कार्याकडे, त्यागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यांचा इतिहास पुढील पिढीपासून लपविण्याचा प्रयत्न झाला, जनतेपर्यंत खरा इतिहास पोहोचू नये, यासाठी अनेक प्रयत्न झाले.


परंतु, काळाच्या ओघात परिस्थिती बदलत गेली आणि हळूहळू मवाळ गटाकडून केल्या गेलेल्या अनेक गोष्टी, इतिहासाचे विकृतीकरण, खोटा इतिहास प्रदर्शित करणे, महान विभूतींची खोटी बदनामी या सर्व बाबी उजेडात येऊ लागल्या. ज्याप्रमाणे म्हटले जाते की, सूर्य कितीही झाकून ठेवला तरी तांबडं फुटायचं कधी राहत नाही, त्याप्रमाणेच स्वातंत्र्यवीरांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वत:च्या कुटुंबाचीदेखील कधी चिंता केली नाही. आयुष्याचे एका होमात रुपांतर केले, घरादाराची राखरांगोळी होताना स्वत:च्या डोळ्यांनी बघितली. स्वत: बाबारावांसह संपूर्ण कुटुंबास क्रांतिकार्यात झोकून दिले. अंदमानच्या यमयातनांनंतरही त्यांनी अस्पृशयता निवारण, जातिभेद निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. सावरकरांमध्ये ज्याप्रमाणे एक प्रभावी व अमोघ वक्ता, कुशल संघटन कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार, प्रचंड धाडस, अभ्यासूवृत्ती, वाचन, लेखन, भाषाशुद्धी कौशल्य, दूरदृष्टी, सैनिकीकरणाचा दृष्टिकोन, युवकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याची ताकद असे एक ना अनेक गुण त्यांच्या ठायी असल्याने त्यांनी क्रांतिकार्याबरोबरच आपल्यातील साहित्यिकाचा, लेखकाचा, कवीमनाचा, शाहिराचा भावदेखील वेळोवेळी प्रकट केलेला दिसून येतो.



बालपणापासूनच त्यांना ‘फटका’ या काव्यप्रकाराची आवड निर्माण झाल्याने त्यांनी अनेक ‘फटक्यां’ची रचना केली, काव्य रचण्यास खरी सुरुवात ही त्यांच्या बालपणापासूनच झाली. त्यानंतरच्या कालावधीतदेखील त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात भर घालत अनेक ग्रंथ लिहिले, कादंबर्‍यांचे लेखन केले, वार्तापत्रे लिहिली, आत्मचरित्राचे लेखन केले, कथासंग्रह लिहिले, नाटकांचे लेखन केले, महाकाव्यांचे निर्माण केले, स्फुटलेखन केले, इतिहासावर आधारित पुस्तके लिहिली, भाषाशुद्धीचे प्रयत्न करीत असताना, त्या संदर्भातदेखील लेखन केले. साहित्य क्षेत्रात कार्य करीत असलेल्या साहित्यिकांनी सावरकरांना कितीही नाकारायचे म्हटले तरी त्यांच्या साहित्यसंपदेबाबत व साहित्य क्षेत्रातील कामगिरीबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे नंतरच्या काळात सावरकरांकर अनेक नामवंत लेखकांनीदेखील शेकडो पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण झालेत. देशभरात सावरकरांच्या नावे अनेक संस्था व संघटनांकडून विविध पुरस्कार दिले जातात. त्यांच्या साहित्य क्षेत्रामधील या अतुलनीय कामगिरीमुळे १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या २३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील त्यांना बहाल करण्यात आले. या अधिवेशनामध्येच अध्यक्षीय भाषणाप्रसंगी त्यांनी युवकांना ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या,’ हा दिलेला मूलमंत्र त्याप्रसंगी अत्यंत गाजला होता. अशा या आद्यसाहित्यिक स्वातंत्र्यवीरांच्या निधनानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांनीदेखील त्यांच्या ‘मराठा’ दैनिकात १४ लेख प्रसिद्ध करून सावरकरांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.अशा या महान आद्य मराठी साहित्यिकाच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या नाशिकनगरीला ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यजमानपद देण्यात आलेले असून या साहित्य संमेलनाच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच मराठी साहित्यिकांच्या, राष्ट्रभक्तांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.


त्यामुळे सावरकरजन्मभूमी भगूरमधील ‘भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह’ या संस्थेने नुकतेच एक निवेदन देऊन स्वातंत्र्यवीरांच्या विचारांचा जागर व्हावा, त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, म्हणून सहा मागण्यांचे निवेदन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना दिलेले होते. त्यामध्ये सर्वात पहिली मागणी अशी होती की, संमेलनस्थळास ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्यात यावे. मात्र, काल स्वागताध्यक्षांनी जाहीर केले की, या नगरीस ‘कुसुमाग्रज नगरी’ असे संबोधण्यात येईल.या निर्णयाने सावरकरप्रेमींना फारसे आश्चर्य वाटलेले नाही. कारण, स्वागताध्यक्षपद हे ज्यांच्याकडे आहे ते व त्यांची विचाराधारा तसेच त्यांनी घेतलेला निर्णय व त्यासाठी अनुसरण्यात आलेल्या पद्धतीचा विचार केल्यास हे सर्व काही अपेक्षितच होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कालखंड, त्यांनी केलेले साहित्य क्षेत्रातील कार्य, सामाजिक कामे, त्यांचे जागतिक स्तरावरील स्थान, नाशिकमधील सहवास व कार्य या सर्व गोष्टींचा विचार केला तर यामधील कोणत्याही गोष्टीत सावरकरांची इतरांशी तुलनाच होऊ शकत नाही व त्यांचे श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध करण्याची आवश्यकतादेखील नाही, असे असतानाही व नाशिकमधून मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही, साहित्य संमेलन नगरीला सावरकरांचे नाव देण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आलेले आहे. मुळात ‘लोकहितवादी मंडळ‘ व ‘संयोजन समिती’ने साहित्य संमेलनाच्या ठिकाणाचे नाव हे आधीच निश्चित केलेले होते व बैठकीमध्ये सर्वसंमतीचा जो फार्स करण्यात आला, तो पूर्णत: साहित्यप्रेमींची दिशाभूल करणारा आहे. कारण, ज्या बैठकीत हे सर्वसंमतीने ठरल्याचे सांगितले जात आहे, त्या बैठकीस मोजक्याच, ठरावीक व विशिष्ट विचारधारेच्याच साहित्यिक व कार्यकर्त्यांना बोलाविण्यात येऊन त्यांच्यासमोर थेट कुसुमाग्रजांच्या नावाबाबत विचारणा करावयाची व सर्वानुमते नाव ठरविण्याचा आव आणायचा, हे निश्चितीच सावरकरप्रेमींच्या भावना दुखाविणारे आहे.

वस्तुतः कुसुमाग्रजांचे नाव देण्याला कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही व तसा आमचाही आक्षेप नाही. मात्र, साहित्य चळवळीतील ‘मातब्बर’ म्हणवल्या जाणार्‍या व्यक्तींकडून ज्येष्ठता कशी डावलली जाते, एखाद्या व्यक्तीचे कार्य कसे दुर्लक्षित करायचे, महान व्यक्तींची त्यांच्याच जन्मभूमीत व कर्मभूमीत कशी अवहेलना करायची, हे व असे अनेक प्रकार त्यानिमित्ताने नाशिककरांना अनुभवास मिळत आहेत, हेही नसे थोडके.स्वातंत्र्यवीरांच्या जन्मभूमीमध्ये होत असलेल्या या मराठी साहित्य संमेलनात आता किमान संमेलनाच्या एका माजी अध्यक्षाचा अधिकाधिक सन्मान कसा ठेवता येईल? त्यांच्या साहित्यावर आधारित कोणकोणते परिसंवाद ठेवता येऊ शकतील? सावरकरांचे साहित्य क्षेत्रातील योगदान जास्तीत जास्त जनतेपर्यंत कसे पोहोचवता येऊ शकेल? सावरकरांचा शासन स्तरावर यथोचित सन्मान होण्यासाठी काही ठराव मांडण्यात येऊन ते पारित करता येऊ शकतील का? आणि त्यायोगे अजून एका मराठी साहित्यिकाचा गौरव करण्यास शासनास भाग पाडता येईल काय? या सर्व मुद्द्यांचा संयोजक, नाशिकमधील नामवंत साहित्यिक व मराठी साहित्य महामंडळाने विचार करावयास हवा. जेणेकरून तात्यारावांना त्यांच्या मृत्यूनंतर ५५ वर्षांनंतर का होईना न्याय मिळेल.


- मंगेश मरकड
(लेखक भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह, भगूरचे कार्यकर्ते आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा